अॅनेकडोटल फॅलेसी : अत्यल्प अनुभवांच्या आधारे उभा राहणारा भ्रम
. आजच्या माहितीच्या युगात प्रत्येकाला आपले अनुभव जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही वैयक्तिक घटना काही तासांत जगभर पोहोचते. या सर्व प्रक्रियेत आपण एक मोठी गोष्ट विसरतो- प्रत्येक अनुभव सार्वत्रिक सत्य नसतो. पण तरीही आपण त्या अत्यल्प अनुभवांवरून व्यापक निष्कर्ष काढतो, मतं तयार करतो आणि निर्णय घेतो. हा विचाराचा चुकीचा प्रकार ‘अॅनेकडोटल फॅलेसी’, म्हणजेच वैयक्तिक उदाहरणांवर आधारित भ्रम म्हणून ओळखला जातो. . एखाद्या गोष्टीविषयी ठोस संशोधन वा पुरावे न तपासता, एक-दोन उदाहरणांवर आधारलेला निष्कर्ष मांडणे हे या भ्रमाचे मूळ आहे. “माझ्या नातवाने तो सिरप घेतला आणि लगेच सर्दी बरी झाली; म्हणजे ते औषध प्रभावी आहे”, असा तर्क त्याचे उत्तम उदाहरण होय. हा निष्कर्ष व्यक्तिगत अनुभवावर आधारित असल्यामुळे आकर्षक वाटतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो अपूर्ण आणि चुकीचा आहे. एका व्यक्तीचा तात्पुरता अनुभव संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही- हे या भ्रमाचे महत्त्वाचे अधोरेखन आहे. . मानवी मानसशास्त्रात या प्रकारचा भ्रम खोलवर रुजलेला आहे. आपल्या मेंदूला आकडेवारी आणि संशोधनापेक्...