Friday, March 5, 2021

कॉपी करणार नाही; कॉपी करू देणार नाही...


परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅगा जवळ ठेवू नयेत, असा शाळांचा लिखित आणि अलिखित नियम आहे. जवळच कशाला- परीक्षेच्या खोलीत/ वर्गात सुद्धा ठेवू नयेत. वर्गाच्या बाहेर ठेवाव्यात.काही शाळांच्या व बोर्डाच्या परीक्षांत तर शाळेच्या इमारतीच्या बाहेर मैदानात ठेवाव्या... असे संकेत आहेत. मध्यंतरी विद्यार्थी बुटात, पायमोज्यात कॉप्या आणतात... असा शोध लागल्याने पायमोजे व बूट वर्गाच्या बाहेर काढावेत असा फतवा जारी झाला.त्यानंतर विद्यार्थी शर्ट- पॅन्ट इत्यादीमध्ये आतल्या बाजूने कॉप्या लपवतात… असे रहस्य उघडकीस आले. पण त्यावर असला कोणताही फतवा जाहीर झाला नाही!
… तर कोविडच्या ओसरणीच्या काळात मोठ्या हिमतीने आणि शक्य तितक्या सुरक्षाव्यवस्था पाळून शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी-पालक- शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित सहकार्याने सगळे काही आलबेल चालले. कोणतेही अघटित घडले नाही. काही दिवस शाळा नीट चालल्यावर लेखी घटक चाचणी जाहीर झाली.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी सवयीप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्कूल बॅगा वर्गाच्या बाहेर ठेवल्या. तेथे व्हरांड्यात पुरेशी जागा नसल्याने बॅगा दाटीवाटीने व एकावर एक अशाही ठेवण्यात आल्या. सुरक्षेच्या बाबतीत जागरूक असलेल्या शिक्षकांच्या लक्षात ती बाब आली. लगेच विचार विनिमय झाले आणि विद्यार्थ्यांना सूचना दिली गेली की विद्यार्थ्यांनी बॅगा आपल्या बेंचच्या बाजुलाच ठेवाव्यात. एका बेंचवर एक विद्यार्थी व त्याच्या बाजूला खाली त्याची बॅग असे वर्गाचे चित्र काही मिनिटातच तयार झाले.

पेपर संपला. परीक्षा संपली. बाजूलाच बॅग व त्यात पुस्तके, वह्या, गाईड्स असतानाही कोणीही कॉपी केली नाही किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. नाही म्हणायला वर्गातील सी. सी. टीव्ही कॅमेऱ्याची व पर्यवेक्षकांची करडी नजर विद्यार्थ्यांवर सतत रोखलेली होतीच.

काकाजीना त्यांची जुनी निवासी शाळा आठवली. शिक्षक- कर्मचाऱ्यांची काहीशी कमतरता व कामांची बेसुमार भरमार, आठवड्यातून सातही दिवस व दिवसातून 24 तास कामाचे- जबाबदारीचे ओझे डोक्यावर! तशात कुठून तरी वेळ काढणे, कसातरी वेळ वाचवणे आवश्यक होतेच. मग परीक्षेच्या वेळी शिक्षक टाचणे काढणे, पेपस तपासणे, पाठाची तयारी करणे, नोंदी भरणे, कुठल्यातरी पुस्तकाचे वाचन करणे इत्यादी कामे उरकून टाकत. तीन- चार इयत्तांचे विद्यार्थी आलटून-पालटून बसवलेले असत. शिक्षक वर्गात आले की टेबलावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ठेवून देत. विद्यार्थी त्या घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या जागेवर बसत. पेपर पूर्ण झाल्यावर रीतसर आणून नंबरवार रचून ठेवत. शिक्षक त्यांच्या कामात असोत की जरा वर्गाबाहेर जावोत, विद्यार्थी प्रामाणिकपणे पेपर्स सोडवत, चुकूनही कॉपी न्यायची किंवा दुसऱ्याच्या पेपरमध्ये डोकावण्याची दुर्बुद्धी कोणालाही होत नसे.

दिवसभऱ्याच्या संपर्कामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून, वादावरून, समस्येवरून बोलणे व्हायचे. त्या बोलाबोलीतून बरेच संस्कार पण व्हायचे. शाळा पेपर पुरवते, शिक्षक पेपर तपासतात; पण विद्यार्थी स्वतःच स्वतःची परीक्षा घेत असतात. स्वतःला काय येत नाही, हे शोधायचे व त्या उणिवा पूर्ण करायच्या याचे परीक्षा एक माध्यम आहे, एक साधन आहे. एक परीक्षा ही पुढच्या परीक्षेच्या तयारीची पायरी असते. बोर्डांच्या किंवा सार्वजनिक परीक्षांची तयारी असते. परीक्षेत कॉपी करणे म्हणजे स्वतःशीच बेइमानी करणे आहे, स्वतःचीच फसवणूक आहे. त्यात मार्कांचा तात्पुरता फायदा दिसत असला तरी त्याने आयुष्यभऱ्याचे नुकसान होते. असली काहीबाही मूल्ये विद्यार्थ्यांवर शक्य त्या प्रकारे बिंबवली गेली होती. कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांची कानउघडणी होत नव्हती, तर शक्य त्या उपायोजना केल्या जात होत्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना गाईड्स दिल्या तरी ते कॉपी करणार नव्हते. त्यामुळे कडक पर्यावेक्षक, पोशाखाची किंवा बूट- मोज्याची तपासणी, बॅगांची बाहेर पाठवणी... असल्या तथाकथित उपाययोजनांची गरज नव्हती. पर्यवेक्षक हे पोलिसी अवतारात येत नसून मित्रत्वाच्या भूमिकेत वावरायचे.

काही वर्षांनी काही विद्यार्थ्यांना मार्कांचा संसर्ग झाला, काकाजी व त्यांचे जवळजवळ सर्व सहकारी इतर शाळांमध्ये विखुरले गेले. नियमाप्रमाणे शिस्तबद्ध व कडक पर्यवेक्षण सुरू झाले. नियमाप्रमाणे मार्कांच्या परीक्षा सुरू झाल्या. (काल्पनिक)

- धनंजय आदित्य.

1 comment: