Tuesday, June 2, 2020

साहेब, मला तुरुंगातच ठेवा!

कोरोनाव्हायरसने जगात सर्वत्र हाहाकार उडवून टाकला. उद्योगधंदे, वाहतूक इत्यादी सगळे बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. सर्व देशांच्या सर्व सरकारी यंत्रणा कामाच्या व खर्चाच्या प्रचंड भाराने मोडकळीस आल्या. त्यामुळे सरकारी यंत्रणावरचा ताण कमी करायचा प्रयत्न सरकार करायला लागले. त्याचाच भाग म्हणून सरकारने एक फर्मान काढले की- तुरुंगातील कैदी कमी करायचे, ज्या कैद्यांना पॅरोल किंवा ज्या कोण्या प्रकारे मुक्त करता येईल त्या प्रकारे मुक्त करायचे.
शहरातील तुरूंगात हा आदेश आला आणि कोणाकोणाची सुटका होते याची अटकळ बांधायला सुरुवातपण झाली. ज्यांची वर्तणूक समाधानकारक होती त्यांचा नंबर लवकर लागणार होता. होता होता अकरा वाजले. जेलर साहेबांनी सर्व कैद्यांना तुरुंगातील मधल्या परेड ग्राउंडवर बोलावले. सरकारी आदेश थोडक्यात सांगितला. मुक्त करावयाच्या कैद्यांची पहिली यादी त्यांनी हातात घेतली. साहेब एकेक नाव वाचत होते, आणि त्याबरोबर कैद्यांमध्ये एकेक आनंदाची लहर लहरून जात होती. यादी वाचून झाली. कैदी आपापल्या बराकीमध्ये गेले. पुढच्या तयारीला लागले. जेलरसाहेब त्याच्या कार्यालयात गेले. बऱ्याच औपचारिकता पार पाडायच्या होत्या. कामांच्या याद्या डोक्यात घोंघावत असतानाच त्यांनी खुर्चीत बसकण मारली.

" साहेब... " एक रडवेला आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी मान वर करून बघितले. दरवाजातून तुकाराम डोकावत होता. तुकाराम त्यांचा अतिशय आवडता कैदी होता. कैदी म्हणण्यापेक्षा जणू मित्रच होता. खुनाचा कैदी असूनही चांगली वागणूक व चांगल्या रेकॉर्डमुळे पहिल्याच यादीत त्याचे नाव आले होते. 

" अरे ये तुकाराम! अभिनंदन!! " साहेब सगळा थकवा विसरून खुर्चीतून उठून उभे राहिले. तुकारामपण त्यांच्या केबिनमध्ये परवानगीची वाट न बघता शिरला होता. साहेबांनी त्याच्या खांद्यावर मित्रत्वाची जोरकस थाप दिली. 

" साहेब... " पुन्हा रडक्या आवाजात तुकाराम बोलला. त्याच्याकडून पुढे बोलवत नव्हते. तेवढ्यात त्याचा हुंदका मात्र वातावरणात घुमला.

" अरे तुकाराम, असा रडतोस काय? किती आनंदाची गोष्ट आहे. तुला पॅरोलवर सहा महिन्यासाठी सोडण्यात येत आहे." तुरुंगातील वातावरणाशी घरच्यासारखा रममाण झाल्यामुळे बाहेर जाताना तो जास्तच भावनिक झाला असावा, असे त्यांना वाटले. तुरुंग सोडताना बरेच कैदी भावनिक होतात, हे त्यांनी यापूर्वीही बघितले होते. पण थोड्या वेळात सावरून बाहेरच्या जगात मिसळून जातात , हेही अनुभवले होते. हाही असाच एक प्रकार असावा, असे त्यांना वाटले.

"साहेब, माझं नाव त्या यादीतून काढून टाका साहेब. मला तुरुंगातच ठेवा साहेब." रडत अडखळत तुकाराम काय ते बोलून गेला. एकंदरीत प्रकरण नेहमीसारखे नाही, याचा अंदाज साहेबांना एव्हाना आला होता. साहेबांनी त्याला बळेबळे खुर्चीत बसवले. त्याच्यासाठी पाणी मागवले, चहा मागवला. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावले. पण तुकाराम ऐकायलाच तयार नव्हता. " मला तुरुंगातच ठेवा साहेब..." हा एकच धोशा त्याने लावून ठेवला होता. 

शेवटी साहेबांनी कायदेकानून व नियमांचा आधार घेतला. ते म्हणाले, " ही यादी वरून मंजूर होऊन आली आहे. मलाही त्यात काही बदल करता येणार नाही. त्यातून कोणाचे नाव विनाकारण कमी करता येणार नाही. तुझे नाव इतक्या वरच्या स्तराला आहे, की ते तर मुळीच कमी करता येणार नाही. त्यामुळे तुला येथून जावेच लागेल. बाहेरच्या वातावरणात रूळशील थोड्या दिवसात. मध्येच काहीही मदत लागली तर विनासंकोच सांग हं." ... आणि साहेबांनी मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावला. ते त्यांच्या वेगळ्या कामात लागले.

कागदपत्र, सह्या- अंगठे, सामानांची देवघेव असले सोपस्कार पार पाडून तुकारामची बोळवण करण्यात आली. येतानाचे कपडे घालून तुकाराम बाहेर पडला. थोडे दूर जाऊन एकवार त्याने तुरुंगाकडे वळून बघितले. साहेब दरवाजातून बाय-बाय करत होते. यंत्रवत त्याने हात हलवला. मुकाटपणे रस्त्याला लागला... पाय नेतील तिकडे. 

जाता जाता त्याला माय आठवली. ती तुकारामला खूप खूप शिकवून साहेब बनवणार होती. गावात मोलमजुरी करून तिने तुकारामला शहरात शिकायला पाठवले. तुकारामला एकच नातेवाईक होती, ती म्हणजे माय. पण तुकाराम दहावीला असताना ती पण काहीसं होऊन परलोकी गेली. पाचवीला पुजलेल्या दारिद्र्याने आणि हृदयावर बसलेल्या धक्क्याने तुकाराम नापास झाला. गावात अर्ध्या गुंठ्याच्या जागेवरील झोपडी, एवढीच काय ती त्याची संपत्ती होती. पण कोणीतरी झोपडी सपाट करून ती जागा सुद्धा बळकावली होती. गाव आपलं राहिलं नव्हतं आणि शहर परकं होतं . तरीही काहीतरी खायला प्यायला मिळेल या आशेने तो शहरात परत आला. मिळेल ती कामं करत, कुठेतरी आडोसा शोधत दिवस ढकलत राहिला.

काही वर्षांनी स्थानिक आमदाराच्या एका शाळेत त्याला चपराशाची नोकरी मिळाली. पगार पूर्ण मिळत नव्हता, तरीही रोजीरोटी मात्र भागत होती. खाऊन पिऊन जिवंत राहता येईल, असे स्थैर्य लाभले होते, त्यातच तो खूष होता.

तशातच त्याच्या अल्पसंतुष्ट "सुखी" जीवनाला अंधाराने घेरले. शाळेत बाथरूममध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्यांचा खून झाला. आमदाराच्या दहावीतल्या धाकल्या पोराशी त्याची काही दिवसापासून बिनसाबिनसी सुरू असल्याच पोरं फुसफुसत होते. आमदाराचे चारही पोर गुंडागर्दीत माहीर होते. शिक्षकसुद्धा त्यांच्या वाऱ्याला फिरकत नसत. 

कोणाच्यातरी सांगण्यावरून तुकारामवर आळ घेण्यात आला. पोलीस तुकारामला बेड्या टाकून घेऊन गेले. कोर्टात उभं केलं. कोणीतरी काहीबाही साक्षी दिल्या. "सुटला नाय पायजे!" अशी आमदारांनी त्याच्या देखतच पोलिसांना तंबी दिली होती. काय झाले आणि काय होते आहे, हे तुकाराम मला काही कळत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं. त्याचा मेंदू बधीर झाला होता. कोठडीत असतांना, "मी खून केला नाही," इतकच बोलल्यावर पोलिसांनी इतकं चोपलं होतं, की आता ते शब्दही त्याच्या घश्यातच सुकून जायला लागले. कोणी काही विचारलं तरी तो थरथरत निव्वळ टुकूटुकू बघत राहायचा. कोणाच्या मदतीची आशा नव्हती. गुमान बळीचा बकरा बनणे एवढेच काय ते त्याच्या हातात होते. कोर्टाच्या काही वाऱ्या झाल्यावर त्याची या तुरुंगात रवानगी झाली.

दोन वेळचं पोटभर जेवायचं, दिलं ते काम निमूटपणे करायचं, दिलेल्या कोठडीत रात्री आडव व्हायचं... एकदा अचानक त्याच्या मनात विचार आला, "अरे, यासाठी तर सगळी धावपळ करत होतो. येथे कोणतीही धावपळ न करता सगळे मिळते." त्या विचारांसरशी त्याची मरगळ अगदी झटकून गेली. त्याची दुनियाच बदलून गेली. त्याला तुरुंग हे आपलं घर आणि तेथील लोक आपले रक्ताचे नातेवाईक वाटायला लागले. तो तेथील प्रत्येक गोष्टीत अत्यंत आपुलकीने भाग घ्यायला लागला. असं सगळं काही सुरळीतपणे चाललं असताना, अचानक कोरोनाचं संकट कोसळलं. कोरोनानं इतकं सुखासमाधानाचं जीवन त्याच्यापासून हिसकावून घेतलं.... 

" घे बाबा, खाऊन घे! कुठं निघालासा?" कोणीतरी त्याच्या समोर कागदाच्या प्लेटमध्ये दोन छोट्या भाकरीवर झुणक्याचा पेंदा घेऊन उभं होतं. तो धुंदीतून भानावर आला. किती चाललो, कुठपर्यंत आलो याचा काही थांगपत्ता नव्हता. पाय दुखावल्यासारखे वाटत होते. घसाही कोरडला होता. कोण काय बोलतंय, हे त्याला काही कळलं नव्हतं. "अरे, घे ना रे!" समोरचा जरा गुरगुरलाच! त्याने यंत्रासारखा हात समोर केला. जे मिळालं ते घेतलं. काही सामाजिक संस्था गरिबांना अन्नदान करीत होत्या. तो समोरच्या रिकाम्या टपरीच्या फडकुळावर जाऊन बसला. बराच वेळ तसाच बसून राहिला. काही पुढचा विचार नाही, काही मागचा विचार नाही. अगदी निर्विकार! होता होता सूर्य कलला. अंधार पडला. पोटात कालवाकालव झाली. तसं त्याचं लक्ष झुणका भाकरकडे गेलं. शांतपणे खाल्ल्यावर त्याला जरा बरं वाटलं. एव्हाना आपण बसस्थानकाच्या परिसरात असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. बसस्थानकावर जाऊन तो सार्वजनिक नळाचं पाणी भसाभसा प्याला. आणि तिथल्या दगडी बाकड्यावर त्यानं स्वतःला झोकून दिलं.

डास झोपू देत नव्हते, पण दुसरा काही पर्याय नव्हता. तशातच कधीतरी त्याच्या कुल्ल्यावर कोणीतरी सपकन काठी मारली. "हे चल उठ. झोपण्याची जागा आहे का ही?" एक पोलिसवाला त्याला दम भरत होता. तुकाराम मुकाट्यानं उठला. बाहेर चालू लागला. रात्र अर्धी उभारली होती. तशातच रस्त्यावरची पंधरा-वीस कुत्री मागे लागली. कुठे पळून जाणार? त्याने तिथेच बसकण मारली. भुंकणारी कुत्री आता मात्र त्याच्या अवतीभवती गोंडा घोळवू लागली. या नव्या मित्रांत त्याचं मन जरा पाझरलं. थोड्या वेळाने कुत्री आपल्या मार्गाला लागली. तुकारामही शेजारच्या दुकानाच्या पायरीवर आडवा झाला. 

"चोर चोर चोर..." गलका ऐकून तो उठून बसला. पहाटेची वेळ असावी. लोकांनी त्याला करकचून धरले. काय काय ते विचारायला लागले. काय बोलावे, तेच तुकारामला कळेना. तो भेदरल्यासारखा पाहतच राहिला. लोकांनी त्याला उचलून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेले. योगायोगाने इन्स्पेक्टर हजर होतेच. लोकांनी त्याच्या नावाने काय काय ते पुराण मांडले. तुकाराम मख्खपणे कोपऱ्यात बसून होता.

" काय रे, तू चोरी केलीस?" इन्स्पेक्टर साहेबांनी एक फटका हाणून त्याला विचारले. " होय साहेब." साध्या-सरळ शब्दात तुकाराम कबूल झाला. 

“काय चोरलस?" 

"दागिने चोरले साहेब.. ..." आतापर्यंतच्या लोकांच्या बोलण्यावरून तुकारामने परिस्थितीचा अंदाज लावला होता व त्याप्रमाणे उत्तरे देत होता. 

" कशासाठी चोरलेस?"

" लहानपणापासून सवय आहे साहेब. चोरी करायची मजेत राहायचं." तुकारामने ठोकून दिले. 

" कोणत्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून चोरलेस?"

" तळमजल्यावरच्या साहेब!" 

"आं? चोरी तर पहिल्या मजल्यावर झाली!" तुकारामचे उत्तर चुकलं होतं. 

" कोणकोणते दागिने होते?"

" माहित नाही साहेब, जे मिळाले ते उचलले..." 

"दागिन्याचा डबा कुठे आहे?"

" लोक मागे लागले होते म्हणून कुठेतरी फेकून दिला..." 

" अरे, पण दागिने पिशवीत होते... तू डबा कसाकाय फेकलास?" आता मात्र इन्स्पेक्टरचं डोकं फिरायला लागलं. ते लोकांना म्हणाले," आम्ही चौकशी करतो. याला कोठडीत डांबून ठेवतो. तुम्ही उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या."

सर्व लोक घरी गेल्यावर इन्स्पेक्टरने तुकारामला स्वतः जवळच्या खुर्चीत बसवले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, " हे बघ, तू चोर वगैरे नाही आहेस. चोर असे वागत नसतात, असे बोलत नसतात. पण तू त्यांच्या तावडीत सापडलासंच कसा? चोरीची खोटी कबुली दिलीच कशी? आणि कशासाठी?"

तुकाराम खाली मान घालून गप्प बसला होता. काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. साहेबांनी स्पेशल कॉफीची ऑर्डर दिली. ग्लासभर कॉफी रिचवल्यावर त्याला तरतरी आणि हिंमत आली. त्याने लहानपणापासून आतापर्यंतच्या इतिहासाची सारी उजळणी धाडधाड करून टाकली.

" असं! म्हणजे तुरुंगात जाण्यासाठी तू चोरीची खोटी कबुली दिली. अशाने कोणी तुरुंगात जातात कारे? तू खून केला नाहीस, तू चोरी केली नाहीस, तू कोणताही गुन्हा केला नाहीस, साध पाखरूही मारलं नाहीस... तरी अपराधीपणाचं जीवन स्वतःहून स्वीकारतो आहेस! कमाल आहे!" साहेब म्हणाले. 

" जाऊ द्याना साहेब. जगात असा कंटाळा आलाय. या जगात सगळ्यात चांगली जागा असेल तर ती म्हणजे तुरुंग. तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल, तर मला तुरुंगात पाठवण्याची सोय करा. मी तुमचा आभारी राहील." 

" अरे तुझ्यावर अन्याय झाला आहे. न केलेल्या खुनाबद्दल तुरुंगात खितपत पडला आहेस. तुला न्याय मिळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, उलट गुलामगिरीचे जोखड खांद्यावर लादून घेतोय. तुझी ती शाळा माझ्याच एरियात येते. चल, तुझी फाईल पुन्हा काढतो. चांगली चौकशी करून गुन्हेगाराला शिक्षेच्या कठड्यावर उभा करू." 

" नको साहेब. मी एक साधा माणूस. कुठं रोजीरोटीची सोय होत असेल तर बघा. लय उपकार होतीलं." तुकारामचा एकच धोशा सुरू होता. 

" आम्हाला एका मदतनीसाची गरज आहे. ती छोटीशी नोकरी तुला देऊ शकतो .टेम्पररी. पण तुझ्यावर झालेल्या अन्यायाच काय?"

" खूप उपकार होतील साहेब. जीव तोडून काम करीन. पण ते न्याय-अन्याय सोडून द्या साहेब. ते न्याय वगैरे मोठ्या माणसांसाठी असतात. मोठ्या माणसांना जिंकायचं असतं. आम्हाला जिंकण्यासारख काहीच नाही, आणि हरण्यासारखंही काहीच नाही. आम्ही जिवंत राहिलो तीच मोठी संपत्ती आमच्यासाठी."

आता मात्र साहेब वैतागले. चिडले. ओरडले. " समाजातील गुन्हेगारीला गुन्हे करणारे तेवढे जबाबदार नसतात, खरे जबाबदार असतात गुन्हे सहन करणारे. तुझ्यासारखे.. गुलाम. गुलाम प्रवृत्तीचे, गुलाम मानसिकतेचे. तुझ्यासाठी उगीच वेळ घालवला मी. निघ येथून. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी तुझं भलं करणार नाही." साहेबांनी खुर्ची विरुद्ध दिशेला वळवून घेतली. कपाळावर हात घेऊन बसून राहिले. त्यांना बहुतेक बराच मानसिक त्रास झाला असावा. 

बराच वेळ भयाण शांततेत गेला. थोड्या वेळाने साहेबांनी खुर्ची वळवली. तुकाराम उभाच होता. साहेबांनी दुर्लक्ष केले. खुर्चीतून उठून निमूटपणे बाहेर जायला लागले. 

तेवढ्यात तुकाराम जोरात ओरडला, " साहेब!" आवाज चांगलाच भारदस्त आणि करारी होता. क्षणभर साहेब गोंधळलेच. थबकून थोडे सावरले. " साहेब..." तेवढ्यात करारी आवाजात तुकाराम पुन्हा ओरडला. " साहेब, मी न्याय मिळवणार."

तुकारामची नजर साहेबांवर रोखलेली होती, स्थिर होती. साहेबांना गहिवरून आलं होतं. बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती. 

- धनंजय आदित्य. 

No comments:

Post a Comment