Saturday, January 1, 2022

कोण जास्त पाणी पितो?


एकदा गाढवाने उंटाला पाणी पिताना पाहिले. गाढवाला वाटले- उंट उगीच फुशारकी दाखवण्यासाठी इतके पाणी पिऊन दाखवतो आहे. उंटाची खोड जिरवलीच पाहिजे.

गाढव उंटाला म्हणाला, “ तुझ्यापेक्षा मी जास्त पाणी पिऊ शकतो. चल लावतोस का शर्यत?”

गाढवाचे बोलणे ऐकून उंटाला हसू आले. उंट म्हणाला, “ ठीक आहे. तुझ्यापासून सुरुवात कर. पी पाणी. “

गाढव समोरच्या बादलीतील पाणी पिऊ लागला. एक बादली पाणी संपवताना त्याला धाप लागली. त्याच्या नाका डोळ्यातून पाणी उतू जाणार की काय असे वाटू लागले. उंट मनात म्हणाला, “याच्यापेक्षा वीस पट जास्त पाणी मी पिऊ शकतो. पण शर्यत सुरूच ठेवली तर बिचारा गाढव हरेल किंवा मरेल.”

उंटाला गाढवाची दया आली आणि तो गाढवाला म्हणाला, “किती पाणी पितोस रे गाढवा? मी माझी हार मान्य करतो. मी हरलो, तू जिंकलास!” गाढव अतिशय आनंदाने नाचू लागला.

आता गाढव, “ मी उंटापेक्षा जास्त पाणी पिऊ शकतो,” असे सांगत सगळीकडे फिरत असतो. ते ऐकून सगळेजण हसत असतात. गाढवाला मात्र खूप आनंद होतो.