जलसंकटावर मात करणारा बेंगळुरू येथील एक पथदर्शी लोकप्रकल्प
एकेकाळी तलावांचे शहर आणि गार्डन सिटी म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर आज एका भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी बेंगळुरूमधील नागरिकांनी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी मिळून एक आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे, ती म्हणजे अ मिलियन वेल्स फॉर बेंगळुरू (A Million Wells for Bengaluru). म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दहा लाख विहिरी या शहरात खोदण्याचा प्रकल्प.
उपक्रमाची पार्श्वभूमी: काळाची गरज
अपुर्या पाणी-पुरवठ्यामुळे लोक भूजलाचा प्रचंड उपसा करू लागले. हजारो फूट खोल बोअरवेल्स खोदल्या गेल्या. त्यामुळे भूजल पातळी अत्यंत खालावली. या पार्श्वभूमीवर, बायोम एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट आणि फ्रेंड्स ऑफ लेक्स यांसारख्या संस्थांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला. शहरात १० लाख विहिरी पुनर्भरण खोदण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
विहीर पुनर्भरण म्हणजे काय?
विहीर पुनर्भरण या प्रकल्पात विहीर साधारणतः १० ते ३० फूट खोल असते आणि तिचा उद्देश पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात उतरवणे हा असतो. घराच्या छतावर किंवा रस्त्यांवर पडणारे पावसाचे पाणी गाळून या विहिरींमध्ये सोडले जाते. हे पाणी थेट उथळ भूजल स्तरात शिरते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि आसपासच्या बोअरवेल्सची पाण्याची पातळी वाढते.
मनु वड्डर समुदायाचे पुनरुज्जीवन
या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे मनु वड्डर या पारंपरिक विहीर खोदणाऱ्या समुदायाचा सहभाग. आधुनिक बोअरवेल्स आल्यामुळे हा समाज आपला रोजगार गमावून बसला होता. अ मिलियन वेल्स या उपक्रमामुळे या कारागिरांना पुन्हा प्रतिष्ठा आणि रोजगार मिळाला आहे. मातीचा पोत बघून कुठे आणि किती खोल विहीर खणायची, याचे उपजत ज्ञान या लोकांकडे आहे. यंत्राच्या साहाय्याऐवजी हाताने विहीर खोदण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे शहराच्या पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.
कब्बन पार्कचा कायापालट
बेंगळुरूच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक कब्बन पार्क हा भाग पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होते. मात्र, या उपक्रमांतर्गत भागात सुमारे ६५ पेक्षा जास्त पुनर्भरण विहिरी खोदण्यात आल्या. परिणामी, आज हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. तसेच आसपासच्या भागातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. अनेक अपार्टमेंट्स आणि मोठ्या आयटी पार्क्सनी हा पॅटर्न राबवून स्वतःची पाण्याची गरज भागवण्यास सुरुवात केली आहे.
या उपक्रमाचे इतर फायदे
बेंगळुरूमध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांवर पाणी साचते. पण पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहण्याऐवजी जमिनीत मुरेल आणि पुराची समस्या कमी होईल. भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या जुन्या विहिरींना पुन्हा पाणी आले आहे. धरणे बांधणे किंवा शेकडो किलोमीटरवरून पाणी आणण्यापेक्षा हा अत्यंत स्वस्त आणि शाश्वत उपाय आहे. हा प्रकल्प सरकारने लादलेला नसून जनतेने स्वतःहून स्वीकारलेला आहे, त्यामुळे पाण्याचा वापर आणि बचतीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.
पुढील आव्हाने आणि मार्ग
आतापर्यंत सुमारे २ ते ३ लाख विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. वाढते डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण यामुळे पाणी मुरण्यासाठी मोकळी जागा मिळवणे हे मोठे आव्हान आहे.या विहिरींची देखभाल करणेही गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये या प्रकारचे प्रकल्प लोकांनी राबविले आहेत. अनेक ठिकाणी सरकारने सुद्धा याला अनुदान दिले आहे. तथापि, बेंगळुरूने दाखवलेला हा मार्ग लोकसहभाग आणि पारंपरिक ज्ञान यांच्या संगमातून जलस्वराज्य कसे मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण आहे. (Image from Wikimedia)
==०==
