'चेलुवी' : मुलीचे फुलझाड बनते तेव्हा... निसर्गाची आणि स्त्रीत्वाची भावस्पर्शी लोककथा


'चेलुवी' हा १९९२ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केला आहे. (हा चित्रपट नंतर कन्नड भाषेतही डब करण्यात आला). मुख्य भूमिकेत असलेल्या सोनाली कुलकर्णी यांचा हा पहिला चित्रपट. सोबत सुषमा, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पर्यावरण संवर्धन यावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट कर्नाटक राज्यातील फुलणारे झाड- एका स्त्रीची कहाणी या पारंपारिक लोककथेवर आधारित आहे. हा चित्रपट निसर्ग, स्त्री आणि सामाजिक शोषण यावर गंभीर भाष्य करतो.

संवेदनशील लोककथेवर आधारित चित्रपट

'चेलुवी' ही गरीब कुटुंबातील तरुणी आहे. ती आपल्या आई आणि बहिणीसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. एका साधूने दिलेल्या मंत्रामुळे चेलुवीला एक गुप्त आणि जादुई शक्ती प्राप्त होते. ती स्वतःचे रूपांतरण एका सुगंधित फुलांनी बहरलेल्या झाडात करू शकते. पैसे मिळवण्यासाठी ती या मंत्राचा उपयोग करते. तिच्या झाडाला भरपूर सुगंधी फुले येतात. तिची बहीण अत्यंत काळजीपूर्वक ही फुले गोळा करते. दोघीही ती फुले विकून पैसे आणतात. शहरात विकते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे शक्य होते.

चेलुवीची शक्ती हीच तिची वैरी

चेलुवीचे हे रहस्य गावातील जमीनदाराचा मुलगा कुमार याला समजते. फुलांच्या सुगंधावर आणि चेलुवीच्या सौंदर्यावर मोहित होऊन तो तिच्याशी विवाह करतो. लग्नानंतर ते दोघेही हे रहस्य लपवतात. परंतु कुमारची लहान बहीण श्यामा चेलुवीकडून हे रहस्य जबरदस्तीने वदवून घेते व तिला फुलझाड बनायला भाग पडतात. फुलांच्या मोहापायी आणि लहान असल्यामुळे तिचे मित्र झाडाच्या फांद्या तोडतात. त्यामुळे चेलुवीचे मानवी रूप विकृत होते आणि ती झाडाच्या बुंध्यासारखी होऊन जाते. तरीपण तिच्या फांद्या एकत्र करून तिला मानवी रूप देण्याच्या आशेने कुमार चेलुवीच्या झाडाच्या बुंध्याच्या स्वरूपाला घेऊन जंगलात येतो. पण नवी हवेली बांधण्यासाठी कुमारचे वडील तेथील जंगल पूर्णपणे कापून टाकतात. चेलुवीला आधार मिळण्याची उरलीसुरली आशाही नष्ट होते. कुमारला मात्र नवी पत्नी सहज मिळते.

चित्रपट देत असलेले संदेश, बोध आणि तात्पर्य

'चेलुवी' हा केवळ एक लोककथेवर आधारित चित्रपट नाही तर तो अनेक महत्त्वपूर्ण संदेश देणारा बोधपट आहे. हा चित्रपट पर्यावरण आणि स्त्री यांच्यातील सखोल संबंधांवर प्रकाश टाकतो (पर्यावरण स्त्रीवाद – Ecofeminism यावर). चेलुवीचे फुलणारया झाडामध्ये रूपांतर होणे हे स्त्रीची आनंद निर्मितीची प्रतीक आहे. शिवाय स्त्रीत्वाची प्रजनन क्षमता, कोमलता आणि निसर्गाची देणगी याचे प्रतीक आहे.

चेलुवी- पारंपरिक शोषणाची बळी

जेव्हा चेलुवीची शक्ती केवळ उपजीविकेचे साधन म्हणून वापरली जाते तोपर्यंत ठीक असते, पण जेव्हा ती लालसेपोटी फुले तोडणे आणि शोषणामध्ये वापरली जाते, यात तिची विटंबना होते. हे माणसाचे निसर्गाबद्दलचे शोषक दृष्टिकोन दर्शवते. यात स्वार्थापोटी निसर्गाचा नाश केल्याचे दिसते. चित्रपट भारतीय समाजातील स्त्रीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करतो. ती नेहमी दुसऱ्यांसाठी फुलते, इतरांसाठी त्याग करते, परंतु तिला स्वतःसाठी फुलण्याचे (जगण्याचे) स्वातंत्र्य कधी मिळणार? हा तो प्रश्न.

पालकांनी आणि मुलांनी निश्चित बघावा

हा चित्रपट मुलांना निसर्गाविषयी आदर, वस्तूंचा लोभ न करणे आणि संवेदनशीलतेचे महत्त्व शिकवतो. चित्रपटातील रूपकात्मक कथा पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि निसर्गाचा ऱ्हास करण्याचे गंभीर परिणाम अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करते. गिरीश कर्नाड यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि सोनाली कुलकर्णीचा पदार्पणातील उत्कृष्ट अभिनय यामुळे ही एक उच्च दर्जाची कलाकृती आहे. मुलांना आपल्या भारतीय लोककथांची आणि त्यांच्यातील गहन तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा चित्रपट एक उत्तम माध्यम आहे. हा चित्रपट आजही अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा आहे. हा चित्रपट दूरदर्शन सिनेमाने यूट्यूबवर अपलोड केला आहे. हा चित्रपट पालकांनी आणि मुलांनी निश्चितपणे बघायला हवा व त्यावर चर्चा करायला हवी.
===X===

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!