शिक्षकी पेशातील व्यावसायिक धोके आणि उपाय

शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आणि विचारवंत असतात. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी थेट जोडलेले असते. मात्र या उदात्त व्यवसायामागे काही गंभीर व्यावसायिक धोके Occupational Hazards असतात. ते त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आणि कार्यक्षमता यावर परिणाम करतात.
.
शिक्षकांना दररोज वर्गात मोठ्याने आणि सतत बोलावे लागते. यामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर ताण येतो, आवाज बसणे, घसा खवखवणे किंवा “व्हॉईस डिसऑर्डर” सारख्या विकारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय, वर्गात वापरल्या जाणाऱ्या खडूच्या धुळीमुळे आणि गर्दीच्या बंद वर्गांतील दूषित हवेने श्वसनाचे त्रास, अॅलर्जी आणि दम्याचे विकार होऊ शकतात.
.
फळ्यावर खडूने लिहिणे ही पारंपरिक आणि सोपी पद्धत असली तरी तिच्यातून निर्माण होणारी धूळ अत्यंत सूक्ष्म रासायनिक कणांनी बनलेली असते. हे कण हवेत दीर्घकाळ तरंगत राहतात आणि शिक्षकांच्या श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात. ही धूळ शिक्षकांच्या फुफ्फुस, डोळे आणि त्वचेवर गंभीर परिणाम करते. सूक्ष्म धूळकण फुफ्फुसात जाऊन अॅलर्जिक ब्रॉंकीटिस किंवा सिलिकोसिस अशा गंभीर समस्या निर्माण करू शकतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. खडूच्या धुळीचा स्वरयंत्रावर (vocal cords) परिणाम झाल्यास शिक्षकांचा आवाज कायमचा बदलू शकतो.
.
खडूचे रासायनिक घटक (कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम सिलिकेट, झिंक ऑक्साइड इत्यादी) हे सूक्ष्म कण केसांच्या मुळाशी साचतात. त्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषण मिळणे कमी होते. परिणामी केस कमकुवत होऊन गळती वाढते. शिक्षकांमध्ये फ्रंटल हेअर थिनिंग (माथ्याच्या पुढच्या भागातील केस विरळ होणे) ही समस्या अनेकदा दिसून येते.
.
त्या धुळीमुळे केसांचा नैसर्गिक काळेपणा कमी होतो आणि ते फिकट, जिवंतपणा हरवलेले दिसतात. खडूतील सूक्ष्म घटक केसांच्या नैसर्गिक तेलांचे प्रमाण कमी करतात. परिणामी केस कोरडे, निस्तेज आणि राठ होतात. केसांची लवचिकता कमी होऊन टोकं तुटणे, केस फाटणे अशा समस्या निर्माण होतात.
.
डोळ्यांत धूळ गेल्याने जळजळ, खाज, लालसरपणा निर्माण होतो. त्वचेवर सतत खडूचे कण बसल्याने खाज, कोरडेपणा, अॅलर्जी आणि सूज निर्माण होते. काही शिक्षकांना दीर्घकाळ याचा सामना केल्यामुळे डोळ्यांच्या श्लेष्मल आवरणाचा त्रास होऊ शकतो.
.
ती धूळ त्वचेच्या संपर्कात आल्यास काही व्यक्तींना त्वचेची खाज, कोरडेपणा, चट्टे किंवा सूज निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ हे चालल्यास डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगही उद्भवू शकतो.
.
शिक्षकांना तासनतास उभे राहून शिकवावे लागते. यामुळे पाठीचे, पायांचे आणि कंबरेचे दुखणे, तसेच व्हेरिकोज व्हेन्स सारख्या समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ गैरसोईच्या आसनपद्धतीत बसल्याने मान-खांदा ताण आणि मनगटदुखी यांसारखे विकार उद्भवतात. सतत लिखाण करणे, गृहपाठ तपासणे, उत्तरपत्रिका तपासणे, संगणकावर काम करणे यामुळे मनगट आणि हाताच्या बोटांना त्रास होऊ शकतो. Repetitive Strain Injury (RSI) याची तीव्रता वाढते.
.
शिक्षकांवर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे, निकाल चांगला आणण्याचे आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे मोठे दडपण असते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी, पालक आणि व्यवस्थापनाचे अपेक्षाभंग हे सर्व शिक्षकांवर मानसिक तणाव निर्माण करतात. परिणामी बर्नआउट, चिंता, नैराश्य यांसारखे विकार होऊ शकतात.
.
कधी कधी शिक्षकांना विद्यार्थी किंवा पालकांकडून शाब्दिक किंवा शारीरिक गैरवर्तन सहन करावे लागते. विद्यार्थी, पालक किंवा शालेय व्यवस्थापनाकडून येणारे दडपण किंवा संघर्ष सहन करावा लागतो. शिकवणे, गृहपाठ तपासणे, मीटिंग्ज आणि इतर शालेय उपक्रम यांच्यात समन्वय साधताना वेळेचा अभाव जाणवतो. अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांची मानसिक शांतता आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होतात.
.
खाजगी शाळांमध्ये नियमापेक्षा कमी वेतन, नियमबाह्य करारनिहाय नोकरी, वेळेवर पगार न मिळणे यामुळे शिक्षकांमध्ये आर्थिक असुरक्षितता निर्माण होते. हासुद्धा एक गंभीर व्यावसायिक धोका आहे, कारण त्यातून मानसिक ताण आणि असंतोष वाढतो.
.
भारतामध्ये शिक्षकांसाठी काही व्यापक कायदे त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संरक्षण देतात. असे कायदे शिक्षकांनी वाचायला हवेत. त्यामुळे शिक्षकांचा आत्मविकास वाढेल. शिक्षकांसाठी महाराष्ट्र एम्प्लोइज ऑफ प्रायव्हेट स्कूल्स कायदा आणि नियम आहेत. तसेच माध्यमिक शाळा संहिता इत्यादीद्वारे सरकारी, सर्व खाजगी अनुदानित व विना-अनुदानित शाळांतील शिक्षकांना समान व न्याय्य वेतन, विहित सुट्या व सुरक्षित नोकरीची तरतूद करण्यात आली आहे.
.
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती संहिता, २०२० (OSH Code) यानुसार कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण, वार्षिक आरोग्य तपासणी यांची तरतूद आहे.
.
मानसिक आरोग्य कायदा, २०१७ हा शिक्षकांना सन्मानाने मानसिक आरोग्य सेवा घेण्याचा अधिकार देतो. शिक्षकांना असह्य मानसिक तणाव सहन करावा लागल्यास वैद्यकीय मदत घेण्याचा हक्क आहे.
.
POSH Act, 2013 (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा) हा महिला शिक्षकांना कार्यस्थळी लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण देतो. त्यासाठी प्रत्येक शाळेत अंतर्गत तक्रार समिती असणे आवश्यक आहे.
.
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षकांच्या कल्याण, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि सुरक्षित कार्य वातावरण यावर भर देते.
.
या धोक्यांपासून शिक्षकांना मुक्ती मिळावी यासाठी मानसिक समुपदेशन यांसारख्या उपाययोजना उपयुक्त ठरतात. या समस्यांवर उपाय म्हणून योगा, हलका व्यायाम आणि वेळोवेळी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आरोग्यविषयक उपाययोजना म्हणून शिक्षकाची नियमित वैद्यकीय तपासणी, आवाजाचे व्यायाम, योग्य आसनपद्धती (खुर्ची वगैरे) वापरायला हवी. शिक्षकांना मानसिक तणाव नियंत्रण प्रशिक्षण व समुपदेशन सुविधा द्यायला हवी. कामाचा समतोल भार, वेळेचे नियोजन, सुरक्षितता धोरण याचा विचार व अंमलबजावणी करायला हवी. शिक्षकांना संघर्ष व्यवस्थापन, भावनिक बुद्धिमत्ता आणि वेळेचे व्यवस्थापन यांवर नियमितपणे प्रशिक्षण द्यावे. शिक्षकांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य वेतन आणि आर्थिक सुरक्षा मिळावी, तसेच त्यांना आरोग्य विमा आणि इतर आवश्यक सुविधा पुरवाव्यात. शिक्षकांनी अन्यायाच्या निवारणासाठी आणि आधारासाठी शिक्षक संघटनाचे सक्रीय सदस्य व्हावे, कल्याणासाठी नियम व कायद्यांची माहिती ठेवावी.
.
शिक्षकांच्या वाट्याला येणारे व्यावसायिक धोके हे केवळ वैयक्तिक नाहीत तर संस्थात्मक आणि सामाजिक स्वरूपाचेही आहेत. हे धोके शिक्षकांच्या आरोग्य, कार्यक्षमता आणि अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. त्यामुळे शैक्षणिक संस्था, शासन आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन सुरक्षित, आरोग्यदायी आणि आदरपूर्ण कार्यपरिसर निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांचे संरक्षण म्हणजे शिक्षणव्यवस्थेचे बळकटीकरण होय.

धनंजय आदित्य –

Blog https://www.adinama.com/

Facebook - https://www.facebook.com/adityasir/

 

 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!