मायक्रोस्लीप: अचानक येणारी क्षणभऱ्याची धोकादायक झोप
एक क्षण. डोळे मिटले फक्त काही सेकंदांसाठी आणि आयुष्य मात्र कायमचे काळवंडले. ही धोकादायक झडप म्हणजे- मायक्रोस्लीप -म्हणजेच क्षणभराची झोप- हा शब्द ऐकताना तो किरकोळ वाटतो, पण वास्तवात त्याने कित्येक जीव घेतले आहेत. आपल्या आजूबाजूला, महामार्गांवर, रेल्वे ट्रॅकवर, अगदी आकाशातही या क्षणिक झोपेचे गंभीर परिणाम घडले आहेत.
.
२०१७ मध्ये भारतातील यमुना एक्सप्रेसवेवर एका बसचालकाला फक्त काही सेकंद झोप लागली आणि बस दरीत कोसळली आणि २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात २०२३ मध्ये कोल्हापूर-निपाणी महामार्गावर ट्रकचालकाच्या झोपेमुळे झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. अमेरिकेत २००९ साली एअर फ्रान्स ४४७ च्या विमान अपघाताच्या प्राथमिक कारणांपैकी एक कारण म्हणजे पायलटची क्षणाची झोप आणि मेंदूची प्रतिक्रिया मंदावणे होते. जपानच्या शिन्कान्सेन रेल्वेच्या इतिहासात एकदा चालकाला फक्त काही सेकंद झोप लागली आणि संपूर्ण ट्रेन काही किलोमीटरपर्यंत नियंत्रणाविना धावत राहिली.
.
२०१६ मध्ये मुंबई-नाशिक महामार्गावर, ट्रकचालकाच्या मायक्रोस्लीपमुळे झालेल्या अपघातात सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली, जणू चेन रिऍक्शन झाली. जागतिक स्तरावर पाहता, १९८६ मधील चेर्नोबिल अणुऊर्जा दुर्घटनेतील अभियंत्यांच्या झोपेच्या थकव्याला आणि मायक्रोस्लीप एपिसोडला दोषी ठरवले गेले आहे. तसेच १९८९ मधील एक्सोन वाल्डेझ या तेलवाहू जहाजाची दुर्घटना आणि २०१३ मधील न्यूयॉर्क रेल्वे दुर्घटना या दोन्ही घटनांमध्ये ड्रायव्हर किंवा पायलटच्या झोपेमुळे नियंत्रण गमावल्याचे आढळले. काही सेकंदांचा हा झोपेचा काळ कधी कधी हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण बनतो.
.
मायक्रोस्लीपचा गडबडघोटाळा.
मायक्रोस्लीप म्हणजे मेंदूच्या काही भागांचा अतिशय क्षणभर, काही सेकंदांसाठी निष्क्रिय होऊन झोपेच्या अवस्थेत जाणे. या दरम्यान व्यक्ती बाहेरून जागी दिसते, परंतु तिचा मेंदू "ऑटोमॅटिक पायलट" मोडवर जातो. अशावेळी डोळे काही वेळ मिटतात, दृष्टी स्थिर राहते, लक्ष विचलित होते आणि प्रतिसाद देण्याची क्षमता हरवते. ही अवस्था इतकी सूक्ष्म असते की व्यक्तीला स्वतःलाही जाणवत नाही की ती झोपली होती.
.
मायक्रोस्लीपची कारणे
या स्थितीमागे अनेक घटक कारणीभूत असतात. झोपेची अपुरी मात्रा, चुकीच्या वेळी झोप घेणे, रात्री उशिरा जड जेवण करणे, झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा टी.व्ही. स्क्रीनकडे टकटक पाहणे, तसेच अल्कोहोल किंवा निद्राजनक औषधांचे सेवन करणे हे सर्व झोपेच्या गुणवत्तेला बाधा आणतात.
.
पण आश्चर्याची बाब म्हणजे ज्या व्यक्तींना झोपेची कमतरता नसते त्यांनाही मायक्रोस्लीपचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः नीरस, एकसुरी, पुनरावृत्ती होणारे काम करताना- जसे लांब पल्ल्याचे वाहनचालक, शासकीय कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड्स, संगणक ऑपरेटर यांचे काम चालू असतांना मेंदूचे लक्ष सुटते आणि तो क्षणभर ‘ऑफ’ होतो.
.
वैज्ञानिक दृष्टीने पाहता मायक्रोस्लीपच्या वेळी मेंदूमध्ये जागृती नियंत्रित करणाऱ्या भागांतील क्रियाशीलता कमी होते व झोपेशी संबंधित भाग सक्रीय होतात. ही अवस्था झोप आणि जागेपण यांच्या सीमारेषेवरची असते. येथे शरीर जागे असते; पण मन झोपलेले असते.
.
धोके आणि परिणाम
मायक्रोस्लीपचे परिणाम अनेकदा प्राणघातक ठरतात. सतत लक्ष आवश्यक असलेल्या कामांमध्ये- जसे वाहन चालवणे, विमान उडवणे, यंत्रसामग्री हाताळणे, शस्त्रक्रिया करणे इत्यादीमध्ये क्षणभराची झोपही गंभीर अपघाताला आमंत्रण देते. अनेकदा या झोपेची जाणीवच होत नाही. अपघातानंतर संबंधित व्यक्तीला हे पटत नाही की ती त्या काही क्षणांसाठी झोपली होती.
.
आरोग्याच्या दृष्टीने पाहता, झोपेचा विकार स्लीप एपनिया मायक्रोस्लीपशी जवळून संबंधित आहे. या विकारात झोपेत श्वास काही काळ थांबतो आणि त्यामुळे सलग झोप पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा, झोपेचे झटके आणि लक्ष विचलन वाढते. तसेच काही औषधांचे दुष्परिणामही मायक्रोस्लीप वाढवतात.
.
उपाय आणि प्रतिबंध
मायक्रोस्लीप टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे योग्य, पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप घेणे. प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान ७ ते ८ तास अखंड झोप घ्यावी. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा संगणक वापरणे टाळावे, झोपण्यापूर्वी शांत वातावरण निर्माण करावे. वाहनचालकांनी लांब प्रवासात दर दोन तासांनी थांबून १०–१५ मिनिटे विश्रांती घ्यावी.
.
संशोधन सांगते की २० मिनिटांचा छोटी झोपदेखील मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि अपघाताची शक्यता कमी होते. कंपन्यांनी आणि वाहतूक संस्थांनी कामगारांच्या झोपेच्या आरोग्याची नियमित तपासणी ठेवावी. आज अनेक देशांत थकवा शोधण्याच्या यंत्रणा वापरल्या जातात. यात चालकाच्या डोळ्यांची हालचाल आणि झोपेची चिन्हे ओळखून अलार्म दिला जातो. भारतातही अशा यंत्रणांची आवश्यकता वाढत आहे.
.
मायक्रोस्लीप म्हणजे केवळ थकव्याची झोप नव्हे, तर मानवी मेंदूची एक धोकादायक प्रतिक्रिया आहे. ती काही सेकंदांची असते, पण तिचे परिणाम वर्षानुवर्षे भोगावे लागतात. आपण जागे आहोत, पण मेंदू थकला आहे... हे आधुनिक जीवनशैलीचे दु:ख आहे.
.
समाज म्हणून आपण “कामाच्या वेड्या” संस्कृतीत जगतो; झोप ही आपल्यासाठी कमकुवतपणाचे लक्षण ठरते. पण खरे म्हणजे झोप हीच आपली जागृती टिकवणारी शक्ती आहे. मायक्रोस्लीपची जाणीव होणे म्हणजे मानवाने स्वतःच्या मर्यादा ओळखणे. कारण — जीवनात काही क्षण झोप लागली तरी चालते; पण वाहन / यंत्रे चालवताना तो झोपेचा क्षण म्हणजे मृत्यूचा दरवाजा असू शकतो.
- धनंजय आदित्य
