बौद्ध साहित्यातील जातक कथांचे जगभरातल्या साहित्यात अमूल्य योगदान
![]() |
सांची स्तुपावर कोरलेली सम जातक कथा |
बौद्ध साहित्यातील सर्वात जुन्या साहित्य प्रकारांपैकी जातक कथा हा एक प्रकार आहे. समाजाला काही नैतिक बोध देण्यासाठी या कथांची गुंफण केल्याचे दिसते. अशा प्रकारच्या इसापाच्या कथा, मुल्ला नसिरुद्दीनच्या कथा, पंचतंत्रातील कथा इत्यादी आपल्याला आठवतात. जातक कथा या गौतम बुद्ध व सदाचरण याला पायाभूत मानून तयार केल्या आहेत. परंतु त्यात बुद्धाऐवजी बोधिसत्व या संकल्पनेचा उपयोग केला आहे. जातक म्हणजे "जन्मगाथा," "जन्माशी संबंधित गोष्टी" यात प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या कल्पित मागील जन्मातील गोष्टी येतात. या कथा इ.स.पूर्व ५०० च्या सुमारापासून आढळतात. वास्तविक या कथा दंतकथा किंवा लोककथा या स्वरूपातील आहेत.
बुद्ध म्हणजे "जागृत" किंवा "ज्ञानप्राप्त." बौद्ध धर्मात बुद्ध हा पूर्ण ज्ञान प्राप्त करून दुःखातून मुक्त झालेला असतो. त्याचप्रमाणे सामान्य व्यक्ती दु:खमुक्त होऊ शकेल याविषयी बुद्ध प्रबोधन करतो. बोधिसत्व म्हणजे "ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असणारा" व ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरून चालणारा. बोधिसत्व हा लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही करतो. बोधीसत्वाच्या विविध भूमिका वठवतांना एका भूमिकेतील उद्देश सफल झाला की दुसऱ्या भूमिकेसाठी दुसरा जन्म घेण्याची कल्पना वापरली आहे. या भूमिका व्यक्ती, पशू, पक्षी इत्यादींच्या मार्फत दाखवल्या आहेत. थोडक्यात जातक कथांमध्ये बोधीसात्वांचे रूपक वेगवेगळ्या माध्यमातून सादर केले आहे.
सध्या जातक ही कथा-वांग्मयातील एक शैली बनली आहे. जातक कथांमध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या कलाकारांचा समावेश होतो. ते एकमेकांशी संवाद साधतात. त्यांना विविध प्रकारच्या अडचणी येतात. अशा वेळी बोधिसत्व हे पात्र त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हस्तक्षेप करते आणि कथेचा शेवट आनंदी होतो. अर्थात यात सुखात्म शैली वापरली आहे. जातक कथामध्ये बौद्ध परंपरेसाठी बुद्धत्वाच्या दीर्घ मार्गावर आवश्यक ती मूल्ये, कृती, आणि पद्धती वापरल्या जातात. ते बुद्धाचे महान गुण स्पष्ट करतात आणि नैतिक धडे शिकवतात.
जातक कथा या मौखिक परंपरेने एका पिढीकडून समोरच्या पिढीकडे प्रसारित झाल्या आहेत. जातक कथांचे वर्णन बौद्ध वास्तुकलेमध्ये विविध स्तूप, विहारे, लेणी यात कोरून ठेवले गेले आहे. ते कोरीव काम लोकप्रिय बौद्ध कलेतील एक महत्त्वाचे घटक आहेत. सुरुवातीच्या जातक कथा पाली भाषेत धम्मलीपीमध्ये लिहिल्या गेल्या. त्यानंतर संस्कृत भाषेत व नागरी लिपीत लिहिण्यात आल्यात.
जातक कथा विविध बौद्ध पंथांच्या संग्रहातील विनयपिटक आणि सूत्रपिटकांमध्ये लिहिलेल्या आहेत. अनेक कथा वेगवेगळ्या पंथांच्या नियमांमध्ये जवळजवळ सारख्याच स्वरुपात दिल्या आहेत. त्यावरून असे दिसते की त्या पंथांमध्ये मतभेद होण्यापूर्वीच्या काळापासूनच्या आहेत. जातकाचा सर्वात जुना भाग पाली परंपरेच्या अगदी सुरुवातीच्या भागांपैकी मानले जातात. म्हणजे इ.स. पूर्व पाचव्या शतकातील आहेत. तर नंतरचे भाग इ.स.च्या तिसऱ्या शतकापर्यंतच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते.
जातक कथाचे अनुकरण अनेक पारंपारिक भारतीय दंतकथा आणि लोककथा यांनीदेखील दिसून येते. त्या कथा गैर-बौद्ध पण आहेत. ही जातक शैली भारताबाहेर सुद्धा पसरल्याचे दिसून येते. भारतीय पुराणकथा आणि महाभारत सारख्या महाकाव्यांवरही जातक कथांचा प्रभाव दिसतो.
सुत्तपिटकमध्ये आलेल्या गद्य जातकांमध्ये बोधिसत्व हे मागील जन्मातील उच्च पदावरील व्यक्ती म्हणून चित्रित केले जातात. विनयपिटीकातील सुत्तामध्ये अधिक वैविध्यपूर्ण जातकांचा समावेश आहे, त्यात बोधिसत्व हे प्राण्यांच्या रूपातही चित्रित केले आहे.
जातक मूळतः प्राकृत भाषांमध्ये आणि नंतर संस्कृतच्या विविध प्रकारांमध्ये मध्ये प्रसारित केले गेले. त्यानंतर ते मध्य आशियाई भाषांमध्ये उदाहरणार्थ खोतानीज, टोचारियन, उइघुर आणि सोग्दियन यात अनुवादित केले गेले. तसेच तिबेटी आणि चिनी बौद्ध सिद्धांतांसाठी चीनी आणि तिबेटी भाषेत भाषांतर करण्यात आले. ते चिनी भाषेत अनुवादित झालेले पहिले ग्रंथ होते. कांग सेंघुई ( इ.स. 247) हे जातकांच्या पहिल्या चिनी अनुवादकांपैकी एक होते. विविध भारतीय बौद्ध परंपरांमध्ये जातकांचे वेगवेगळे संग्रह आहेत. सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद पंथीय जातकत्थवना.
नंतरच्या बौद्ध परंपरेत जातक कालांतराने संस्कृतमध्ये रचले गेले. यापैकी सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा संस्कृत जातक ग्रंथ म्हणजे आर्यासुराची जातकमाला.यामध्ये ३४ जातक कथांचा समावेश आहे. नंतरच्या लेखकांनी त्यांचे अनुकरण केले. काहींनी स्वत: च्या जातकमाला (मुख्यतः हरिभट आणि गोपाददत्त) लिहिल्या. जातकमालांचा प्रभाव अजिंठा गुंफा संकुलात दिसून येतो. पाली परंपरेत नंतरच्या रचनेतील अनेक गैर-प्रामाणिक जातक देखील आहेत. त्यांना "अधिकृत" जातक कथांमधून साहित्याचा एक वेगळा वर्ग मानला जातो.
चंद्रातील ससा, माकड आणि मगर, बडबड्या कासव, खेकडा आणि बगळा इत्यादी जातक-कथा पंचतंत्र , संस्कृत नीति-शास्त्रात जाऊन प्रसिद्ध आहेत. पुढील कथा जातक-कथा मधून घेतल्या आहेत.
सिंहाच्या कातडीतील गाढव ( सिहचम्मा जातक )
कोंबडा आणि मांजर ( कुक्कुट जातक )
माकड राजा ( महाकपी जातक )
मूर्ख, डरपोक ससा ( दादभ जातक )
कोल्हा आणि कावळा ( जंबू-खडक जातक )
सिंह आणि वुडपेकर ( जावासाकुण जातक )
डुक्कराचा हेवा करणारा बैल ( मुणिका-जातक )
रोमक कबुतराची कथा ( रोमाका जातक)
सोनेरी पिसे असलेला हंस ( सुवांशहंस जातक )
राजा दशरथ (दशरथ जातक)
बडबड्या कासव ( कचपा जातक )
बौद्ध शिकवणींचा प्रसार करण्याचा एक मार्ग म्हणून जातक कथा महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचा उपदेश, विधी, उत्सव आणि विविध प्रकारच्या कलांचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे.
जातकांचे चित्रण करणारे सर्वात जुने पुरातत्व शोध म्हणजे भारहुत स्तूपाचे रेलिंग तसेच सांची (इ.पू. 2रे - 1ले शतक) येथे सापडलेली शिल्पे आहेत. ज्यात शिलालेखांचाही समावेश आहे. यानंतर, अजिंठासारख्या अनेक बौद्ध स्थळांवर जातक दिसतात. तसेच सिल्क रोड साईट्सच्या भित्तिचित्रांमध्ये तांगपूर्व काळातील (सु. ४२१-६४० सीई) जातक कथा आढळतात. बर्मी बौद्ध धर्मात जातक चित्रणाची विस्तृत परंपरा आहे, आनंद मंदिरात ५५४ कथा आहेत.
असंख्य भारतीय बौद्ध पुरातत्व स्थळांमध्ये जातकांची चित्रे आहेत. उदाहरणार्थ - अजिंठा लेणी, अमरावती, बाग लेणी, भरहुत, कानगनहल्ली, मथुरा, नागार्जुनकोंडा, सांची. जातक चित्रे असलेली भारताबाहेरील इतर प्राचीन स्थळे - बोरोबुडोर , डुनहुआंग ( मोगाओ लेणी ), पोलोन्नोरुवा , अनुराधापुरा , बागान शहर आणि नाखोन पथोम यांचा समावेश आहे.
अशाप्रकारे जातक कथांनी भारतीय व जगभरच्या साहित्यात अमूल्य योगदान दिले आहे.
#adinama #jatak-katha #literature #pali-text #आदिनामा #जातक-कथा #साहित्य