चमत्कारांचा व्यापार - डॉ. प्रदीप पाटील
स्वामी, महाराज, बुवा आणि गुरू यांच्या कहाण्याच्या कहाण्या रचल्या गेल्यात व जाताहेत..
या कहाण्या ज्या काळात रचल्या गेल्या त्या काळात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे मेलेला होता आणि आजही तो मारण्याचे काम सुरू आहे! कारण या कहाण्यांमध्ये.. चरित्रांमध्ये.. गाथांमध्ये.. अत्यंत अवैज्ञानिक चमत्कार ठासून भरलेले आहेत!
आजच्या टीव्हीवरील मालिका या गाथा आणि ग्रंथांवर आधारलेल्या असतात, ज्यात ठासून चमत्कार तर असतातच, शिवाय कोणताही मागमूस आणि पुरावा नसलेल्या गोष्टी सतत दाखवलेल्या आढळतात. आणि या सर्व स्वामी, गुरु, महाराज, दादा, मामा, आणि बुवा यांची चरित्रं, त्यांच्या गाथा, त्यांचे प्रवचन आणि त्यांचे ग्रंथ या सगळ्यांमध्ये समान चमत्कार आढळतात!!
चमत्कार केल्याशिवाय कोणताही बुवा आणि महाराज किंवा स्वामी हा प्रचंड प्रसिद्ध झालेला नाही आणि त्याच्या मागे लाखो भोळे लोक भक्त बनून लागलेले नाहीत. चमत्काराला नमस्कार असतो हेच खरे असते.
अशा या चमत्कारांची एक यादी समान तऱ्हेने सगळीकडे आढळते...
सर्वप्रथम दिसते असे की हे महाराज अचानक प्रकट झालेले असतात! त्यांचे जन्म ठिकाण, त्यांचे आधार कार्ड, त्यांचे आई बाबा आणि त्यांचे बालपण हे अत्यंत त्रोटक असते किंवा अजिबातच नसते. म्हणजे ते सामान्य माणसांप्रमाणे हॉस्पिटलमध्ये किंवा आईच्या पोटातून जन्माला आलेले नसतात. याचा अर्थ ते बायोलॉजिकल नाहीयेत. म्हणजेच ते कुठल्यातरी अज्ञात शक्तीने जन्माला घातलेले आहेत. आणि अज्ञात शक्ती कोण हे एकाही भक्ताला माहिती नसते. त्याचे सर्व भक्त मात्र आईच्या पोटातून जन्माला आलेले असतात.
जसे हे सर्व महाराज स्वामी बुवा व गुरु प्रकट पावतात तसेच ते आंतर्धानही पावतात. म्हणजे ते अचानक नाहीसे होतात. कधी काश्मीरात राहत असतात आणि दुसऱ्या मिनिटाला ते कन्याकुमारीला प्रकटतात!! अंतर्धान, पावणे गुप्त होणे, नाहीसे होणे ही सर्व गुरु, महाराज, बुवा आणि स्वामी यांची खासियत आहे. आणि जी संपूर्ण अवैज्ञानिक आहे. असे असते तर भारताला सैन्य दल स्थापन करायची गरजच नाही. हा चमत्कार घेऊन परशत्रूच्या सैन्यामध्ये जाऊन प्रकट होऊन धडाधड सगळ्यांना मारून पुन्हा अंतर्धान पावणे ही आयडिया किती राष्ट्रवादी, राष्ट्रपयोगी व अखंड भारत निर्माण करायला उपयोगी पडेल ! पण तसे नसते हे भक्तांना कोण समजावणार?
या सर्व चमत्कारी बुवांचे स्वामींचे कॉमन चमत्कार म्हणजे ते उठता बसता दारिद्र्य नष्ट करतात. बहुधा अंबानी-अदानी सुद्धा अशा चमत्कारांमुळेच त्याचे दारिद्र्य नष्ट करू शकलेले आहेत...! मायक्रोसॉफ्ट वाले, फेसबुक वाले, आणि ट्विटर वाले उगाचच उद्योग करतात. त्यांनी कष्ट करण्याऐवजी कोणत्यातरी स्वामीचे, गुरुचे, महाराजाचे, आशीर्वाद घेतले असते तर ते सहजच करोडपती झाले असते. अब्जावधी कमावले असते.
अमुक एका गावात जाऊन तेथे कोरड्या आडात पाणी आणले किंवा कोरड्या नदीत पुन्हा जलप्रवाह आणला असे चमत्कार या सर्व बुवांनी केलेले असताना उगाचच धरणे बांधत आम्ही बसलेलो आहोत.
सर्व धर्मातील सर्व बुवा एक महत्त्वाचा चमत्कार करतात तो म्हणजे आंधळ्याला डोळे देतात, बहिऱ्याला ऐकू येईल अशी शक्ती देतात, मुक्याला बोलते करतात. म्हणजे सर्व पंचेंद्रिये ऍक्टिव्हेट करतात. असं जर असेल तर इ एन टी डॉक्टर किंवा कान नाक घसा डॉक्टर यांनी गुरुचरित्र वाचून आपले पेशंट बरे करायला हरकत नाही.
काही बुवा-स्वामी हे चमत्कार करण्यासाठी काही वस्तू वापरतात. उदाहरणार्थ तांब्या, गोटी, दगड, अंगठी, पादुका, जपमाळ, आणि ते अशा वस्तूंमधून चक्क ब्रम्हांड दर्शन घडवतात. म्हणजे अनेक सूर्यमालिकांना ते जन्म देतात. इतकी पाॅवर आहे. हे फक्त धर्म ग्रंथातच किंवा त्यांच्या ग्रंथातच लिहिलेले असते. बाहेर कुठेही ते दिसत नाही किंवा सिद्धही होत नाही.
यांच्यामध्ये आणखीन एक चमत्कार असा आहे की ते धनलाभ करून देतात. अंगणात उकरल्यावर हंडा सापडतो असा दृष्टांत देतात आणि भक्त खुश होऊन असा धनलाभ झाल्याच्या भक्तीत तल्लीन होऊन त्या बुवा स्वामी महाराजाचे पाय धरून आयुष्यभर लीन होऊन जातो.
सगळ्यात भारी चमत्कार म्हणजे हे सर्व धर्मातले सर्व बुवा महाराज, गुरु, स्वामी, रोगमुक्ती करतात. जसे काही आज जगात असलेले सगळे रोग यांनीच शोध लावलेले आहेत.. यांनीच आध्यात्मिक प्रयोगशाळेत औषधे काढलेली आहेत.. यांचेच मंतरलेले इंजेक्शन हे सगळे डॉक्टर वापरतात आणि यांच्या गुरू आदेशाने ऑपरेशन होतात.. असाही मामला आहे की कॅन्सर पासून मधुमेहापर्यंत आणि अज्ञात रोगापासून अज्ञात शक्तीने निर्माण केलेल्या सर्व रोगांचे तारणहार आणि रोगमुक्तीकारक असे हे चमत्कारिक गुरु असतात आणि त्यांच्या गुरुचरित्रांमध्ये त्यांच्या मंत्रामध्ये आणि त्यांच्या प्रवचनांमध्ये हे ठासून सांगितले जाते. आणि भक्तही लगेचच आमचा अमुक रोग बरा झाला, आमचा तमुक रोग बरा झाला, अशा कमेंट्सचा पाऊस पडतात.
एक चमत्कार असा असतो की जिथे आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये स्वामी, महाराज, गुरु, बुवा, यांच्यामुळे यश आले. व्यवसायात त्यांनी मदत केली. असे व्हिडिओ आणि क्लिप्स देखील सध्या जिकडे तिकडे पाठवून दिले जात आहेत. आणि यात सर्व सेलिब्रेटी देखील आहेत. जर अशा बुवा, महाराज, गुरु, स्वामीं मुळे जर यश आले असेल तर अभिनयाचे किंवा इंजिनिअरिंगचे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांचे ट्रेनिंग प्रोग्राम या सर्व महाराज गुरु आणि स्वामींकडे असेल. त्यांच्या मोठ्या इन्स्टिट्यूट असतील तर त्या दिसत नाहीत. त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असतील तर मग आत्ताच्या सर्व शिक्षण संस्था बरखास्त करून त्यांचा एक फोटो समोर लावून विद्यार्थ्यांना रांगेत बसून त्यांची भजनं आणि कीर्तन करून त्यांच्या आशीर्वादातून कोर्स पूर्ण करायला हरकत नाही. म्हणजे निश्चितपणे यश खात्रीशीर, आध्यात्मिक मार्गाने मिळवलेले ठरेल. पण वास्तवात असे काही दिसत नाही घडत नाही आणि असत देखील नाही. उगाचच आपल्या क्लिप्स बनवायच्या आणि व्हायरल करायच्या हा देखील एक धंदाच आहे.
एक चमत्कार असा असतो की पिसाळलेला हत्ती, पिसाळलेला कुत्रा किंवा अत्यंत चिडलेला प्राणी हा अंगावर धावून येताना स्वामी, बुवा, महाराज फक्त समोर उभे राहतात आणि तो प्राणी बुळचटपणे खाली बसतो आणि चक्क नमस्कार करतो. हे अफाटप्राणी विज्ञान बघून खरंतर सर्वच प्राणी तज्ञांनी अशा चरित्रांच्या गाथाच्या गाथा जंगलात नेऊन ठेवायला हव्यात. सगळे कसे छान छान प्राणी 'नाच रे मोरा..' म्हणत नाचायला, गायला, लागतील पण भक्तांना सांगणार कोण?
या सर्व चमत्कारांना स्वीकारावे म्हणून त्याला गोंडस नावे दिली जातात. म्हणजे हे लोकांच्या 'कल्याणासाठी', लोकांच्या 'धारणेसाठी', लोकांच्या 'आत्मिक, परमार्थिक ऐश्वर्यासाठीच' ते स्वामी, बुवा, गुरु, असतात असे वाक्य पेरून भक्तांना ते आणखी खुळे करतात!
चमत्कार हा जगात कोणताही अस्तित्वात नाही. गुरु, महाराज, स्वामी आणि बुवा यांनी केलेले चमत्कार आज कोणीही करून दाखवावेत. विज्ञान आपण सोडून देऊ.
जे कोणी चमत्कार करतात त्याच्या मागे विज्ञान किंवा हातचलाखी असते. त्यामुळे ते लगेचच उघडे पडतात. त्यामुळे आज विज्ञानाने अशा बुवा, महाराज, स्वामी, गुरुंची, बोलती बंद केलेली आहे. चमत्कार सहजगत्या उघडा पाडला जाऊ शकतो. खरे तर जे जे विज्ञानवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे आहेत तेथे सर्व अशा चमत्कारांचा सहज उलगडा करतात. पण भक्त मात्र भूतकाळात होऊन गेलेले तथाकथित चमत्कार उराशी धरून वर्तमान काळात आपले नुकसान करून घेत असतात. त्यापोटी अनेक भक्तांनी आपले प्राण देखील गमावलेले आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या चमत्कारांच्या मालिका टीव्हीवरून चालू झालेल्या आहेत. त्या जोडीने प्रसिद्ध व्यक्ती या चमत्कारांना स्वतःचे वैयक्तिक बिनडोक अनुभव सांगून खतपाणी घालत आहेत.
देश मठ्ठ आणि मंद करण्याचे काम वर्षानुवर्षे असे उद्योग चालविणाऱ्या आणि ग्रंथ उराशी धरून ठेवलेल्या लोकांनी केले आहे आणि हा देश विश्वगुरू बनवण्याच्या दणदणीत थापा मारत आहेत!
-डाॅ. प्रदीप पाटील