पर्यावरण संवर्धनासाठी मिनिमलिझमची तीव्र गरज
![]() |
| PxHere |
जागतिक तापमान वाढीचे परिणाम दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. बेताल पाऊस, ढगफुटी, महापूर, ठिकठिकाणी तुंबणारे पाणी, भूस्खलन इत्यादी संकटे तापमान वाढीने बिघडलेल्या पर्यावरणाची निष्पत्ती आहे. मानवाने विकासाच्या नावावर पर्यावरणाची जी अपरिमित हानी केली, निसर्गाची अपरिमित लूट केली - त्याचे परिणाम या संकटांच्या रूपाने आपण भोगतो आहोत. हे संकट अगदी आपल्या नाकातोंडापर्यंत येऊनही त्यावर गंभीर्याने विचार व कृती केली जात नाही. ‘युज अँड थ्रो’ च्या जमान्यात आपण नको तितक्या वस्तूंचा उपयोग करतो व तपमान वाढीस हातभार लावतो. आपण वापरत असलेल्या वस्तूंच्या निर्मितीसाठी व वाहतुकीसाठी ऊर्जेचा वापर होतो. यामुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) निर्माण होतो व पृथ्वीच्या तापमानात वाढ होत जाते. अशा वस्तूंचा वापर कमी करणे म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनास मदत करणे होय.
विसाव्या शतकात जगभर - कमीत कमी वस्तू वापरत, किमान गरजा भागवत आयुष्य व्यतीत करणे यासाठी मिनिमलिझम नावाच्या चळवळीला सुरूवात झाली. कलेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या चळवळीने आपल्या जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श केला. पर्यावरणाच्या या चिंताजनक परिस्थितीत तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूंचा उपयोग टाळणे, आपल्याला अगदी अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू वापरणे, आपल्या गरजा कमीत कमी ठेवणे हे उपायही आवश्यक आहे. मात्र आपला खरेदीचा आणि खर्चाचा वाढता धोशा संपत नाही. आपल्या खरेदीपैकी खरी गरज कशाची आणि त्याची उपयुक्तता आहे का, घेतलेले समान पुरेसे वापरले जाते काय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
20 व्या शतकाच्या मध्यात, जागतिक युद्धानंतर विविध मालाची मागणी वाढली. याआधी, लोक वस्तूंचा कमीत कमी पुरवठा आणि त्यांचा मर्यादित वापर यासह जगत होते, अगदी दैनंदिन गरजांसाठीही. जसजसा उपभोगवाद वाढला, तसतसा कमालवाद व चंगळवाद शिगेला पोहोचला. प्लास्टिक, वीज, पेट्रोलियम पदार्थ, धातू, पोलाद, काच, सौंदर्य प्रसाधनं, चप्पल, चामड्याच्या वस्तू, परफ्युम्स, गॅजेट्स, सीडीज, पेनड्राईव्हज आदी डिव्हाईसेस आणि काँक्रीट यांसारख्या नवीन वस्तू सुलभतेने मिळू लागल्या.
1960 च्या दशकात न्यूयॉर्क भागातील मिनिमलिझम ही संकल्पना आता साधेपणा आणि उपयुक्तता या मूल्यांसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. मिनिमलिझम म्हणजे कंजुषपणा नाही, तर आवश्यक तिथेच खर्च करणं, केलेला खर्च उपयुक्त असेल असं पाहणं. कमीत कमी आणि आवश्यक तेवढ्या संसाधनांसह, वस्तूंसह आपलं आयुष्य जगणं म्हणजे मिनिमलिझम. मिनिमलिझम म्हणजे वंचितपणा किंवा जबरदस्तीचा त्याग नव्हे.यात वस्तूंची सजगपणे निवड करणे हेसुद्धा येते. मिनिमलिझम म्हणजे आपल्याला खरोखर ज्यांची गरज आहे अशाच वस्तूंचा साठा करणं, अशाच वस्तू खरेदी करणं. आपल्या घरात अशा असंख्य गोष्टी असतात ज्या आपण गरज नसतांना विकत घेतो, त्या वस्तूंची गरज निर्माण करतो, कारण नसताना उगीच त्या वस्तू घरात ठेवतो.वस्तू कमी करा म्हणजे पैसे खर्च करू नका असे नाही. उलट वस्तू कमी असतील तर असलेल्या गोष्टींचा चांगला उपभोग घेता येईल.
मिनीमॅलीझम (Minimalism) म्हणजे किमान गोष्टींमधून कमाल परिणाम प्राप्त करणे. कमीत कमी संसाधनांचा अधिकाधिक वापर आणि त्यातून आनंदात जगणे म्हणजे मिनिमलिझम. निरर्थक किंवा अनावश्यक गोष्टींचा त्याग करून, ती जागा उपयुक्त आणि आवश्यक गोष्टींसाठी उपलब्ध करून देणं म्हणजे मिनिमलिझम. मिनिमलिझम ही एक विचारधारा आहे, जीवनाकडे बघण्याचा व अनुसरण्याचा एक मार्ग आहे. कमीतकमी वस्तूंचा वापर करून जगणारी ही एक जीवनशैली आहे. यासाठी कृती करताना तीन मुद्द्यांचा विचार होणे गरजेचे आहे. एक म्हणजे चांगल्या परिस्थितीतल्या पण वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर करणे, टाकून द्यायच्या वस्तूंचे वर्गीकरण करून योग्य उपयोग करणे किंवा विल्हेवाट लावणे.
मिनिमलिझम यात पुढील चार गोष्टींचा विचार करता येतो. यातील पहिला म्हणजे- रिड्यूस. म्हणजे घरातल्या वस्तू कमी करणे हा त्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. ही मिनिमलिझमची पहिली पायरी आहे. मिनिमलिझमची दुसरी पायरी आहे रीयुज. वस्तू आहे त्या स्वरूपात शक्य तितके जास्त दिवस वापरणे हे या तालुक्यातील आहे. यात वस्तू स्वतः वापरणे शक्य नसेल तर इतरांना वापरायला देता येते. मिनिमलिझमची तिसरी पायरी आहे रिसायकल. जवळ असलेल्या वस्तूंमध्ये काहीतरी बदल करून त्यांना पुन्हा शक्य तितके काळ वापरणे हे आता अपेक्षित आहे. मिनिमलिझमची चौथी पायरी आहे रिफ्युज. ज्या वस्तूची आवश्यकता नसेल, किंवा दुसऱ्या वस्तू मुळे या वस्तूची गरज भरून निघत असेल तर ती खरेदी करण्यास नकार देणे, हे यात अभिप्रेत आहे.
आता मध्यमवर्गाला समोर ठेवून बाजारपेठ निर्माण केली जात आहे. नको असलेल्या गरजा निर्माण केल्या जात आहेत. त्यात वस्तूंचा वापर उगीच वाढतो आहे. अशा लुटारू बाजारपेठेपासून दूर होणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात अधिकाधिक वस्तूचा संचय व त्यामुळे जीवनातील वाढणारी गुंतागुंत यामुळे मिळणारा आनंद आणि समाधान कमी होते असा मानणारा एक विचार उदयास आला आहे. कमीत कमी गोष्टींचा वापर करून त्यातून कमाल उपयुक्तता मिळवणे म्हणजेच मिनीमॅलीझम (Minimalism) होय. उर्जाबचतीसाठी देखील आपल्याला जीवन जगताना मिनिमलिझम या तत्त्वाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आदिवासी लोक जीवन जगताना अतिशय कमी वस्तूंचा उपयोग करतात, निसर्गाला हानी पोहोचेल अशा कृती टाळतात. त्यामुळे मिनीमॅलीझमच्या जीवनशैलीचा अभ्यास करणारे समाजशास्त्री तज्ञांना अपरिहार्य पणे आदिवासी संस्कृती व जीवनशैली यांचा अभ्यास करावा लागत आहे. मिनिमलिझम हे नेहमीच आदिवासींच्या जीवनाचे मुख्य तत्वज्ञान राहिले असूनही त्यांना त्याबद्दल त्याना कधी कधी माहितीही नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते याचा गवगवासुद्धा करत नाहीत.
संपत्ती, स्थिती आणि भौतिक संपत्तीवर आधारित उपभोगवादी मुल्ये जगण्यातील सोपेपणा कमी करून चिंता आणि नैराश्य यात वाढ करतात. अति उपभोगवादामुळे दुःख, चिंता आणि नैराश्य वाढू शकते. तथागत गौतम बुद्धाने दु:खाचे मूळ तृष्णा हे सांगितले आहे. तृष्णा म्हणजे मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा.तृष्णेच्या निरोधाने दु:खाचे निराकरण होते. बुद्धाने त्यासाठी अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग दिला आहे. अष्टांग मार्गात जणू मिनिमलीझम उलगडून दाखवला आहे. त्यात आठ गोष्टींच्या सम्यक (आवश्यक तेवढ्या) पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. जैन धर्मातील पंचमहाव्रते ही देखील या दृष्टीने बघण्यासारखी आहेत. त्यातील अपरिग्रह म्हणजे गरज नसलेल्या द्रव्यांचा संग्रह करू नये. याचा अर्थ मिनीमलीझम आहे हे आपल्या सहज लक्षात येते.
भारतातील मिनिमलीझम वेगळ्या स्वरुपात पुढे येतो. ‘जास्तीत जास्त कमवा - खरेदी करा - टाकून द्या - नव्या गोष्टी खरेदी करा’ या चक्रातील ‘टाकून द्या’ या भागाला भारतीय मानसिकतेचा विरोध आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अजूनही ‘वस्तू जपून ठेवा, कधी ना कधी उपयोगात येईल’ या समजुतीचा घट्ट पगडा आहे. येथे मध्यमवर्गीय लोक काही जवळचे चांगले, वापरू शकण्याच्या अवस्थेतले कपडे टाकून देत नाही. मात्र क्रेडिट-डेबिट कार्ड्सचा वाढता वापर, सोपी कर्जे, मॉल्स, डबल इन्कम, लहान कुटुंबे, उच्च मध्यमवर्गीयांना अतोनात खरेदीचा जो रोग जडतो आहे त्यामुळे जगण्यातला सोपेपणा, सहजपणा परत आणण्यासाठी मिनिमलिझममध्ये आधार घेणे आवश्यक आहे. एकेकाळी पारंपरिक भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानल्या गेलेल्या मिनिमलिझमचे आजच्या भारतीय समाजात ‘जुगाड-मिनिमलिझम’चे नवे रूप बनले आहे. पारंपरिक भारतीय जीवनशैलीतले ‘साठवा, काटकसर करा, पुनर्वापर करा’ हे सूत्र आजही कार्यरत आहे
मिनिमलिझम संकल्पनेची मुळं भारतीय तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेली आहेत. भारतीय समाजात ‘मिनिमलिझम’ संकल्पना कमी आर्थिक गटातील वर्गात ‘जुगाड’ या नावाने चालत राहते. नको असलेली, निरुपयोगी झालेली वस्तू टाकून न देता, तिचं एका वेगळ्या, उपयोगाच्या वस्तूमध्ये रूपांतरण करून काम चालवून नेण्याचा हा ‘जुगाड’ मिनिमलिझम संकल्पनेला एका वेगळ्या, उपयुक्ततेच्या पातळीवर नेतो. कल्पकता, तंत्रज्ञान, उपयुक्तता, काटकसर, पुनर्वापर या सर्वांचा ‘जुगाड’मधे उपयोग केला जातो. तरीही भारतात मिनिमलिझमच्या संकल्पनेकडे बघण्याची मानसिकता पूर्णपणे सकारात्मक नाही. काही बाबतीत तिला कंजुषी हे टोपण लावण्यात येते. तर काही ठिकाणी गरिबी, मजबुरी याचा जामा नेसवला जातो. त्यावर उपाय म्हणजे मिनीमलीझम, किमानता, साधेपणा, काटकसर, या तत्वाला प्रतिष्ठा मिळवून देणे होय.
धनंजय आदित्य.
