जगभर पर्यटकांच्या विरोधात आंदोलने का होत आहेत?
जगभरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यटन वाढण्यामागे अनेक घटक जबाबदार आहेत. अनेक देशांमध्ये लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यामुळे लोकांना प्रवास आणि पर्यटनासाठी अधिक पैसे खर्च करता येत आहेत. विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे विमान प्रवासाचे दर कमी झाले आहेत, ज्यामुळे विमानाने प्रवास करणे अधिक परवडणारे बनले आहे. अनेक देशांनी व्हिसा प्रक्रियेला सुलभ आणि सोयीस्कर बनवले आहे, ज्यामुळे पर्यटकांना व्हिसासाठी अर्ज करणे आणि मिळवणे सोपे झाले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जगभरातील पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणे आणि त्यांचा प्रचार करणे सोपे झाले आहे. लोकांना आता प्रवास आणि पर्यटनाची प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सहजपणे शेअर केले जाऊ शकतात. अनेक नवीन आणि अनोखी पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. लोक आता वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनुभवांवर अधिक पैसे खर्च करण्यास इच्छुक आहेत आणि प्रवास हा एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा उत्तम मार्ग आहे. अनेक लोक आता आरोग्य आणि कल्याणासाठी प्रवास करतात, ज्यामुळे स्पा आणि निरोगी रिट्रीट सारख्या पर्यटन पर्यायांना चालना मिळते. इत्यादी घटकांमुळे जगभरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.
परंतु युरोपमधील बार्सीलोना, इबिझा, मालोर्का, अथेन्स, मलागा इत्यादी शहरांपासून ते भारतातील गोव्यापर्यंत पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक भागात स्थानिक लोक पर्यटकांविरुद्ध अधूनमधून आंदोलने करीत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे मूळ स्थानिकांना पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवांवर परिणाम तर होत आहेच, शिवाय महागाईचाही सामना त्यांना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षी, पर्यटनामुळे शहराला फायदा होतो असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या बार्सिलोनासारख्या शहरात आता कमी होत आहे, तर पर्यटक हानिकारक आहेत असे वाटणाऱ्यांची संख्या वाढत आहे.पर्यटक जास्त प्रमाणात मद्यपान करतात, कचरा करतात, भांडण करतात इत्यादी आरोप तेथील लोक करतात. वास्तविकत: पर्यटन उद्योगातून भरघोस आर्थिक उत्पन्न मिळत असतानाही पर्यटकांच्या विरुद्ध वातावरण का तयार होत आहे, याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
सध्या अनेक युरोपियन देशांमध्ये अतिपर्यटन ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे ‘पर्यटकांनो परत जा’ असा नारा देत स्थानिक लोक आंदोलने करीत आहेत. अशा घटनांतून ट्युरिस्मोफोबिया (पर्यटना विषयी अनाकलनीय भीती) हा शब्दसुद्धा निर्माण झाला आहे. इटलीतील वेनिसमध्ये पर्यटनामुळे जलमार्गांवर ताण आला, स्थानिक व्यापारावर परिणाम झाला, महागाई आणि घरभाडे वाढले. त्यामुळे वेनिसमध्ये "No Grandi Navi" (No Big Ships) या आंदोलनाने मोठ्या क्रुझ शिप्सच्या प्रवेशावर विरोध केला होता. स्पेनमध्ये मॅलोर्का बेटावरच्या पाल्मा शहरात पर्यटनामुळे स्थानिकांच्या घरभाड्यात आणि महागाईत वाढ झाली. स्थानिक लोकांनी "Tourists go home" या घोषणेसह आंदोलने केली. क्रोएशिया मधील डुब्रोवनिकमध्ये पर्यटनामुळे होणाऱ्या गर्दीमुळे ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करणे कठीण झाले आहे. येथे पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंदोलने झाली. नेदरलँड्स मधील आम्सटरडॅममध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना त्रास वाढला. त्यामुळे स्थानिकांनी पर्यटकांच्या वर्तनावर आणि पर्यावरणीय परिणामांवर विरोध दर्शवण्यासाठी आंदोलने केली. पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांच्या महागाईत वाढ झाली. तेथे स्थानिकांनी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी आंदोलने केली. रेकजाविक या आइसलँडच्या राजधानीत पर्यटनामुळे पर्यावरणीय दुष्परिणाम आणि स्थानिक संसाधनांचा ताण वाढला.त्यामुळे पर्यटन विरोधात पर्यावरण संरक्षण आणि संसाधनांच्या योग्य वापरासाठी आंदोलने झाली. चेक प्रजासत्ताक मधील प्रागमध्ये पर्यटनामुळे स्थानिकांना होणाऱ्या अडचणींमुळे आंदोलने झाली. थायलंडमधील कोफी-फि-फि द्वीपांवर पर्यटनामुळे पाण्याचा प्रचंड प्रमाणात वापर झाला व स्थानिकांना पाणी पुरेसे मिळाले नाही, त्यामुळे लोकांनी विरोध केला.
वाढत्या पर्यटनामुळे निश्चितच काही फायदे होत आहेत पण त्यासोबतच पर्यटनाचे तोटे व नकारात्मक परिणाम देखील पर्यटन स्थळांना व तेथील लोकांना भोगावे लागत आहेत. पर्यटनामुळे पर्यावरणाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो. हॉटेल, रिसॉर्ट्स आणि इतर पर्यटन विकासासाठी जंगले आणि इतर नैसर्गिक अधिवास नष्टसुद्धा होऊ शकतात. पर्यटकांच्या गर्दीमुळे वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांवर तणाव येतो. हिमालयातील पर्यटनामुळे काही वन्यजीवांच्या प्रजातींच्या संख्या घटल्या आहेत. पाण्याचा वापर, वीज वापर, खाद्यपदार्थ यांची मागणी वाढते. पर्यटक वाहतूक, निवासाची आणि ऊर्जेची वाढती मागणी यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होऊ शकते. पर्यटनामुळे नैसर्गिक अधिवासांची रचना बदलते, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते. समुद्र काठच्या पर्यटनासाठी उभारण्यात आलेले रिसॉर्ट्स आणि इतर पर्यटन स्थळांमुळे किनारपट्टीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडले आहे.
पर्यटक मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतात, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनावर ताण येतो आणि नैसर्गिक परिसंस्थेवर वाईट परिणाम होत आहेत. पर्यटनस्थळांवर पर्यटनामुळे निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक कचरा आणि घाण यामुळे नद्या, तळी, आणि समुद्र यांचे प्रदूषण होते. मुंबईतील बीचवर स्वच्छता मोहिम अधूनमधून राबवावी लागते. पर्यटनासाठी विमान, गाड्यांचा वापर वाढल्यामुळे वायुप्रदूषण होते. उदाहरणार्थ, पेरू येथील माचू-पिचू येथे हवाई प्रवास आणि वाहन वाहतूक वाढल्यामुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांसाठी कोच बस, टुरिस्ट शॉप्स, नवीन हॉटेल आणि अल्प-मुदतीसाठी भाड्यावर दिल्या जाणाऱ्या अपार्टमेंटचे दर वाढवले जात असल्याने स्थानिकांनासुद्धा त्याच गोष्टींसाठी जास्तीचा खर्च करावा लागतो.
पर्यटनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींवरसुद्धा वाईट परिणाम होतो. पर्यटन वाढल्याने स्थानिकांसाठी निवास, अन्न आणि वाहतूक यासारख्या मूलभूत गोष्टींचा खर्च वाढू शकतो. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्याने स्थानिक संस्कृतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, स्थानिक कला आणि परंपरांचे व्यावसायिकीकरण होऊ शकते. पर्यटकांशी स्पर्धा झाल्याने आणि पर्यटनातून मिळणाऱ्या फायद्यांचे वितरण असमान झाल्याने स्थानिक समुदायांमध्ये सामाजिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. पर्यटनामुळे सांस्कृतिक ठिकाणांवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, वेनिस शहरातील पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक लोकांना शहर सोडून जावे लागत आहे, ज्यामुळे स्थानिक संस्कृतीवर परिणाम होत आहे.
पर्यटनामुळे काही आर्थिक दुष्परिणामही लोकांना सहन करावे लागतात. पर्यटन उद्योग- हवामानातील बदल, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक मंदी यासारख्या बाह्य घटकांवर खूप अवलंबून असतो. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पर्यटनातून मिळणारे फायदे अनेकदा मोठ्या कंपन्या आणि श्रीमंत लोकांमध्ये केंद्रित असतात, तर स्थानिक समुदाय आणि कामगारांना त्याचा फायदा कमी मिळतो. पर्यटनावर खूप जास्त अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था इतर उद्योगांच्या विकासामध्ये अडथळा आणू शकतात.
याप्रमाणे आपल्याला पर्यटनामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असले तरी पर्यटन उद्योगावर बंदी घालणे शक्य नाही. पर्यावरणामुळे होणाऱ्या फायद्यांना सोडून देणे शक्य नाही. आज पर्यटन ही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला आहे. पर्यटनामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, गाईड सेवा, हस्तकला, आणि विक्री या क्षेत्रांत अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकांकडून मिळणाऱ्या खर्चामुळे देशाला विदेशी चलनाची प्राप्ती होते, ज्यामुळे देशाच्या आर्थिक आरोग्यास मदत होते.स्थानिक समाज, अर्थव्यवस्था, संस्कृती, पर्यावरण, आणि शैक्षणिक क्षेत्रांना मोठा लाभ होतो. पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते, जसे की हस्तकला विक्री, स्थानिक खाद्यपदार्थ, आणि लोकल ट्रान्सपोर्ट. पर्यटनामुळे विविध संस्कृतींमध्ये आदानप्रदान होते, ज्यामुळे जागतिक एकात्मता वाढते.पर्यटनामुळे स्थानिक लोकांची जीवनशैली सुधारते, कारण पर्यटकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण होतात. पर्यटनामुळे पर्यटकांना विविध ठिकाणांचे आणि संस्कृतींचे ज्ञान मिळते. पर्यटनामुळे ऐतिहासिक स्थळे पाहून विद्यार्थ्यांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पर्यटक आणि संशोधकांना विविध ठिकाणांचे संशोधन करण्याच्या संधी उपलब्ध होतात.
चांगल्या आणि शाश्वत पर्यटनासाठी विविध उपाययोजना केल्या जाऊ शकतात. हे उपाय पर्यावरण, समाज, आणि अर्थव्यवस्था या तिन्ही घटकांच्या हिताचे भले झाले पाहिजे यासाठी व्हावेत. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाद्वारे पर्यटनाचे फायदे अधिकाधिक वाढवता येऊ शकतात. पर्यटनस्थळांवर कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी प्रणाली राबवावी, जसे की कचराकुंड्यांची स्थापना, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्नवीनीकरण. पर्यटकांना कचरा न फेकण्याची आणि कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची जाणीव करावी. पर्यटनस्थळांवर पाणी, वीज, आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. नैसर्गिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात. पर्यटकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पर्यटन स्थळांवर स्थानिक संस्कृती, परंपरा, आणि जीवनशैलीचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. स्थानिक कलाकारांना, हस्तकला विक्रेत्यांना, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावे. पर्यटन विकास प्रकल्पांमध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवावा. स्थानिक लोकांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, आणि अन्य उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन द्यावे. स्थानिक उद्योजकांना पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी सहकार्य करावे.
निकोप पर्यटनासाठी पर्यटकांना पर्यावरणाचे महत्त्व आणि संरक्षणाचे उपाय यांची माहिती देण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करावे.चांगल्या आणि शाश्वत पर्यटनासाठी विविध उपाययोजना केल्या जाऊ शकतात. हे उपाय पर्यावरण, समाज, आणि अर्थव्यवस्था या तिन्ही घटकांच्या हिताचे संरक्षण करतात. स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी “पर्यटन व पर्यावरण शिक्षण” कार्यक्रम राबवावे. पर्यटकांना स्थानिक पर्यावरण, संस्कृती आणि समाजाच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवाव्यात. शाश्वत पर्यटन धोरण तयार करावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. पर्यटनासाठी कायदेशीर नियम आणि नियंत्रणे तयार करावी. योग्य नियोजन, व्यवस्थापन, आणि स्थानिक सहभागाने पर्यटनाच्या फायद्यांचा उपभोग घेताना त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
