उष्णतेमुळे एअर कंडिशनर्स धोकादायक व निरुपयोगी ठरतील
![]() |
थंड निवाऱ्याचा हक्क -
कामगार, बेघर लोक, कमी उत्पन्न असणारे लोक, मध्यम वर्गीय लोक आणि असंघटित मजुरांना प्राणघातक उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो आहे. त्यांना विजेची वाढती बिले भरणे किंवा बिघडलेले ए.सी पुन्हा-पुन्हा दुरुस्त करणे परवडत नाही. अमेरिकेत उन्हाळ्यात लोकांना थंड निवारा देणे ही स्थानिक आणि राज्य सरकार यांची जबाबदारी आहे. उन्हाळ्यातील थंड निवारा हा तेथील लोकांचा कायदेशीर अधिकार मानला आहे. आपल्या संविधानात देखील सुरक्षित व चांगले जीवन जगणे हा मुलभूत अधिकार आहे. यानुसार उष्ण वातावरणात थंड निवाऱ्याचा हक्क सुद्धा येतो. पण हा अधिकार मागायचा कोणाकडे?एअर कंडिशनर्सच्या तांत्रिक मर्यादा-
तापमान वाढत असताना, एअर कंडिशनर्सला अधिक ऊर्जा वापरून घर थंड ठेवावे लागते. तापमान 40°C पेक्षा जास्त झाल्यास, एअर कंडिशनर्सची कार्यक्षमता कमी होते आणि ते घर थंड करण्यासाठी पुरेसे प्रभावी राहत नाहीत. एअर कंडिशनर्समध्ये कंप्रेसर हा एक प्रमुख मुख्य घटक आहे. अधिक उष्णतेच्या वातावरणात, कंप्रेसरला अधिक काम करावे लागते, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते.एअर कंडिशनर्सच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करण्यासाठी EER (Energy Efficiency Ratio) आणि COP (Coefficient of Performance) सारख्या मापदंडांचा वापर केला जातो. तापमान वाढत असताना EER आणि COP कमी होतात, त्यामुळे एअर कंडिशनर्सची कार्यक्षमता कमी होते व त्यांना जास्त वीज वापरावी लागते. वाढत्या तापमानामुळे एअर कंडिशनर्स ची मागणी वाढेल. यामुळे विजेची मागणी लक्षणीयरीत्या वाढेल, ज्यामुळे विजेची कमतरता निर्माण होईल आणि ग्रीडवर ताणसुद्धा येईल. उच्च तापमानामुळे एअर कंडिशनर्स स्वतःच बंद होतात. याप्रमाणे ते बंद पडणे (उदा.Thermostat) हे त्यातील सुरक्षा यंत्रणेचे एक अंग असते. त्यामुळे ए.सी.चा अपघात किंवा स्फोट होऊन यंत्रणेचे नुकसान होत नाही. एअर कंडिशनर्स विशिष्ट तापमान मर्यादेत कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. जेव्हा बाह्य तापमान या मर्यादेपेक्षा जास्त होते, तेव्हा एअर कंडिशनर्सचे डिझाईन प्रभावीपणे काम करू शकत नाही किंवा काम थांबवतात.
एअर कंडिशनर्स मधील घातक वायू -
एअर कंडिशनर्स हवा थंड करण्यासाठी शीतक द्रव वापरतात. वातावरणाचे तापमान वाढल्याने शीतक द्रवाला तापमान कमी करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. एअर कंडिशनर्सची कार्यक्षमता वातावरणाच्या तापमानानुसार कमी होते. वाढत्या उष्णतेमुळे एअर कंडिशनर्सची कार्यक्षमता कमी होऊन ते निरुपयोगी ठरू शकतात. तापमान वाढल्यास शीतकांच्या / रेफ्रिजरंटच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो. हे घटक शीतकांच्या / रेफ्रिजरंटच्या उष्णता शोषण आणि त्याचे उत्सर्जन यावर वाईट परिणाम करतात. तापमान वाढल्याने शीतक द्रवांचे लिकेज वाढते. अधिक मागणीमुळे शीतक द्रवाची टंचाई निर्माण होईल व त्यांच्या किमती वाढतील. एअर कंडिशनर्स मध्ये वापरली जाणारी शीतके (refrigerant) हे ग्रीनहाउस गॅस आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बन, हाइड्रोफ्लोरोकार्बन, हाइड्रोकार्बन, अमोनिया ही शीतके कोणत्या ना कोणत्या बाबतीत धोकादायक आहेत. त्यांच्या लिकेजमुळे वातावरणात ग्रीनहाउस गॅसची पातळी वाढते आणि तापमान वाढीला हातभार लागतो.एअर कंडिशनर्सचे पर्यावरणावर घातक परिणाम
एअर कंडिशनर्सला अधिक वीज वापरावी लागल्यामुळे, घराचा विजेचा खर्च लक्षणीयरीत्या वाढतो. वाढत्या तापमानामुळे, ऊर्जा संसाधनांवर ताण येऊ शकतो. वाढलेल्या उष्णतेमुळे ऊर्जा वापर अधिक होतो, ज्यामुळे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन वाढते. ज्यामुळे हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय समस्या उद्भवतात. हे उत्सर्जन तापमान वाढवते, ज्यामुळे एक घातक चक्र तयार होते. वाढत्या तापमानामुळे एअर कंडिशनर्समुळे होणारे पर्यावरणीय नुकसान अधिक गंभीर होऊ शकते.उंच इमारती, सिमेंटचे रस्ते, विकासाच्या नावावर सतत होणारी वृक्षतोड इत्यादी मुळे शहरे ही उष्णतेची बेटे (urban heat islands) बनली आहेत. शहरांमध्ये उष्णतेच्या बेटांमुळे वातावरणीय तापमान वाढते. यामुळे शहरात एअर कंडिशनर्सची कार्यक्षमता आणखी कमी होते.
एअर कंडिशनर्सचे आर्थिक दुष्परिणाम -
तापमान वाढल्यामुळे एअर कंडिशनर्सला अधिक ऊर्जा लागते, ज्यामुळे विजेचा खर्च वाढतो. खास करून विजेचे दर वाढल्याने गरीब आणि मध्यम-वर्गीय लोकांच्या जीवनावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. कोळसा, पेट्रोल, डीझेल, एल.पी.जी. सारखे वायू अशा जीवाश्म (Fossil) इंधनाद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आपण खूप उपयोग करतो. म्हणजेच ही वीज निर्माण करणाऱ्या ठिकाणी आपण हवा घाण करतो. त्यामुळे आपले वातावरण गरम होण्यास मदत होते. आपल्या देशात कार, गाड्या, ए.सी. यांच्या विक्रीवर, वापरावर योग्य तसे नियंत्रण नाही. नियोजनाशिवाय वाढत्या मागणीमुळे विजेची, इंधनांची बिले वाढण्याची समस्या निर्माण होते. वाढत्या उष्णतेमुळे यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीचे खर्च वाढतात.पृथ्वी निर्मनुष्य करायची काय?
नवीन तंत्रज्ञानामुळे उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी उन्नत progressed / रेफ्रिजरंट्स आणि अधिक कार्यक्षम कंप्रेसर्स तयार केले जात आहेत. ते कमीत कमी वीज वापरतील यासाठी संशोधन करण्यात येत आहे. पण एवढे काही करूनही उष्णता वाढीच्या वेगात अशी वेळ येईल की एअर कंडिशनर्स वापरूनही ते कुचकामी ठरतील, बरेच एअर कंडिशनर्स अगदी भंगारात फेकून द्यावे लागतील. त्याही पुढची पायरी म्हणजे कित्येक लोक उष्माघाताने मरण पावतील. अति उष्णतेमुळे घरात बसता येणार नाही व घराबाहेर जाता येणार नाही. उष्णतेमुळे लोकांचे घरात मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. तापमान वाढीच्या बाबतीत मानवाच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे पृथ्वी निर्मनुष्य होण्याचीही वेळ येऊ शकते. ही उपकरणे वापरू नयेत असे म्हणायचे नाही; पण त्यासोबतच जागतिक तापमान वाढ रोखण्यास जास्त आणि युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील.- धनंजय आदित्य
Photo- Creative Commons - https://www.pexels.com/photo/photograph-of-broken-air-conditioners-11256510/ + https://pixabay.com/illustrations/question-interrogation-point-fire-1018843/
