धार्मिक कट्टरतेतून कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण वास्तव


गढीदौलतची काळी रात्र

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गढीदौलत गावात अलीकडेच घडलेली घटना मानवी संवेदनशीलतेला हादरवून टाकणारी आहे. घराबाहेर जाताना केवळ बुरखा न घातल्याच्या कारणावरून एका इसमाने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची निर्घृण हत्या केली व त्यांचे मृतदेह घरातच पुरून ठेवले. ही घटना धार्मिक कट्टरता, रूढीवादी विचार आणि टोकाची नियंत्रण मिळवण्याची प्रवृत्ती यांचे भयावह मिश्र
ण होते. जेव्हा धर्माचा अतिरेकी अर्थ डोक्यात भिनतो तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात हे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. पण येथे धार्मिक कट्टरता कौटुंबिक आपुलकीचे बंध टराटरा फाडून टाकते हे भयंकर वास्तव आपणास दिसते.

जगभरातील रक्तरंजित इतिहास

भारतात 'ऑनर किलिंग'च्या नावाखाली अनेकदा रक्ताचे नातेवाईकच शत्रू बनल्याचे दिसते. मुस्लीम तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे दिल्लीतील अंकित सक्सेना (२०१८) या हिंदू तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी रस्त्यावर गळा चिरून हत्या केली. तेलंगणातील अमृता राव या तरुणीच्या उच्चवर्णीय हिंदू वडिलांनी (२०१८) आपल्या मुलीच्या दलित पतीची (प्रणय पेरूमल्ला) सुपारी देऊन हत्या केली. अलीकडे (२०२५) कर्नाटकात मान्य पाटील या तरुणीने दलित तरुणाशी आंतरधर्मीय प्रेमसंबंधामुळे तिच्या वडिलांनी मुलीची हत्या केली. केरळमधील हादिया या तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याने (२०१७) तिच्या घरच्यांनी या प्रकरणास लव्ह जिहादचा रंग फासून तिचा केलेला छळ हे प्रकरण जगभर गाजले. केवळ भारतातच नव्हवे, तर जागतिक स्तरावरही ही समस्या गंभीर आहे. अमेरिकेतील नूर अल-मालेकी (मूळ इराकी) या तरुणीची तिच्या पित्याने कारने चिरडून हत्या केली (२०१९) कारण त्याने ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्यास तिने नकार दिला होता. इंग्लंडमधील बनाझ महमोद (२००६) या तरुणीने तिच्या पसंतीच्या मुलाशी प्रेम केल्यामुळे इराकी कुर्दिश कुटुंबाने तिची गळा आवळून हत्या केली होती. कॅनडातील अफगाण वंशाच्या मोहम्मद शाफियाने १९ वर्षीय झैनब, १७ वर्षीय सहर आणि १३ वर्षीय गीती व पत्नी ५२ वर्षीय रोना मुहम्मद उमर, यांची हत्या केली (२००९) कारण त्यांनी पाश्चात्य कपडे घातले होते आणि मुलीचे प्रियकर होते. पाकिस्तानमधील कंदील बलुच या तरुणीने (२०१६) सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे 'कुटुंबाची बदनामी' झाली या कारणास्तव तिच्या भावाने तिची गळा दाबून हत्या केली होती. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

हिंसेची खोलवर रुजलेली मुळे

धर्म म्हणजे ईश्वराकडून आलेले अपरिवर्तनीय तत्त्वांचे कडबोळे असा अर्थ धार्मिक लोकांच्या डोक्यात भिनतो तेव्हा त्याव्यतिरिक्त वेगळा विचार स्वीकारण्याची लवचिकता नष्ट होते. या भयावह हिंसेमागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे समाजात खोलवर रुजलेले कट्टर आचार विचार होत. त्याला पितृसत्ताक विचारांची जोड धर्माच्या जोखडातून मिळते. या विचारसरणीमध्ये स्त्रियांना केवळ पुरुषाच्या आज्ञा पाळणाऱ्या दुय्यम व्यक्ती मानले जाते. तेव्हा स्त्रियांवर जाचक बंधने लादली जातात. स्वतःच्या धर्माच्या गोष्टी जशाच्या तशाच पाळल्या पाहिजेत अशी जबरदस्ती व्यक्ती स्वतःवर व दुसऱ्यांवर करू लागते. धार्मिक गोष्टींची चिकित्सा करणे त्यांना असहनीय होते. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर कोणतेही विचार किंवा आचार पाळणाऱ्या लोकांना जगण्याचा अधिकार नाकारला जातो. या हिंसेची जगभरातील उदाहरणे पाहता ही कट्टरता किती खोलवर रुजलेली आहे याची प्रचिती येते.

सामाजिक दबाव आणि मानसिकतेचा प्रभाव

धार्मिक कट्टरतेतून होणाऱ्या हिंसाचारात सामाजिक दबाव आणि बहिष्काराची भीती या गोष्टीही मोठी भूमिका बजावतात. अनेकदा कुटुंबाला समाजाकडून वाळीत टाकले जाण्याची किंवा धर्माच्या नावाखाली अपमानित होण्याची भीती वाटते. या भीतीपोटी स्वतःच्याच घरातील लेकी-सुनांवर अत्याचार केले जातात. यासोबतच, अशा हिंसक व्यक्तींचे मानसिक आरोग्य ढासळलेले असते. त्यातच त्यांना मिळालेले कट्टरतेचे शिक्षण आगीत तेल ओततात. ज्या व्यक्ती बालपणापासूनच कट्टर धार्मिक वातावरणात जगतात त्यांची विचारक्षमता खुंटते. अशा मानसिकतेत सहिष्णुतेला जागा उरत नाही. धर्मबाह्य वाटणाऱ्या साध्या मुद्द्यावरूनही ते हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

कायदेशीर सुरक्षा कवच आणि सामाजिक उपाययोजना

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय कायद्यात अत्यंत स्पष्ट आणि कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येसाठी फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असून, घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा २००५ महिलांना कायदेशीर सुरक्षा देतो. याव्यतिरिक्त, पीडितांच्या पुनर्वसनासाठी 'सखी वन स्टॉप सेंटर' आणि 'स्वाधार गृह' यांसारख्या सरकारी योजना कार्यरत आहेत. कायद्यासोबतच सामाजिक पातळीवरही अनेक संस्था कट्टरतेविरुद्ध लढा देत आहेत. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मजलीस यांसारख्या संस्था कायदेशीर मदतीसोबतच समाजातील रूढीवादी विचार बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वैचारिक बदलाची गरज

धार्मिक कट्टरतेतून होणारा कौटुंबिक हिंसाचार हा केवळ कायद्याने थांबवता येणार नाही. त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे. स्त्री ही कोणाची 'मालमत्ता' नसून ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, हे स्वीकारणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला 'कौटुंबिक विषय' म्हणून दुर्लक्षित करू, तोपर्यंत अशा हिंसक घटना घडतच राहतील. खऱ्या अर्थाने सुरक्षित समाज घडवण्यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना आणि सहिष्णुतेचे शिक्षण घराघरात पोहोचवणे हा यावर प्रभावी मार्ग आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!