भारताच्या राष्ट्रपतींना डॉ. सुरेश खैरनार यांचे खुले पत्र: सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून घोषित करा
आदरणीय राष्ट्रपती महोदया,
मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपल्या देशात ३ जानेवारी हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून घोषित करावा. या दिवशी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती आहे. हा ऐतिहासिक दिवस अधिकृतपणे 'शिक्षक दिन' म्हणून ओळखला जावा अशी मी मनापासून प्रार्थना करतो.
सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिला आणि शूद्रांसाठी शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी मनुस्मृतीविरुद्ध बंड केले. त्यात श्लोक ९.१८ मध्ये म्हटले आहे: “स्त्रियांसाठी मंत्रांसह कोणताही स्वतंत्र संस्कार विधी नाही; हा धर्मातील निश्चित नियम आहे. स्त्रिया शक्तीहीन आणि मंत्रांशिवाय आहेत.”मनुस्मृती असा आदेश देते की स्त्रियांसाठी विवाह हाच वैदिक संस्कार आहे. गुरूंकडून शिक्षणाची आवश्यकता नाही. पतीची सेवा करणे हेच तिचे गुरुकुल आणि घरकाम हाच तिचा होम आहे. हजारो वर्षे अशा आज्ञांमुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे घट्ट बंद राहिलेत.
पेशवाईच्या सनातनी विचारांचे केंद्र पुणे येथे सुमारे १८० वर्षांपूर्वी ज्योतिबा फुले आणि त्यांच्या जीवनसाथी सावित्रीबाई फुले यांनी या विचारसरणीविरुद्ध उघडपणे बंड केले. ही हिंदू समाजात सुमारे १७५ वर्षांपूर्वी सुरू झालेली एक गहन सामाजिक क्रांती होती.
सावित्रीबाई दररोज महिलांना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना सनातनी लोकांनी त्यांच्यावर चिखल, शेण आणि दगडफेक केली. त्या आपले मळलेले कपडे बदलून शिकवणे सुरू ठेवत असत. किती विलक्षण चारित्र्यबळ! आज लोक किरकोळ टोमण्यांमुळे शाळा सोडतात; त्यांनी शारीरिक हल्ला आणि अपमानाचा सामना केला तरीही शांतपणे आपले ध्येय पुढे चालू ठेवले. केवळ एक असामान्य व्यक्तीच हे करू शकते. या आधुनिक सावित्रीने- सावित्रीबाई फुले यांनी त्याच निष्ठेने महिला, शूद्र आणि पीडितांपर्यंत शिक्षण पोहोचवले. त्या आधुनिक युगाच्या सावित्री होत्या.
आज तुम्ही एक आदिवासी महिला म्हणून सर्वोच्च घटनात्मक पदावर आहात. जर सत्ताधारी पक्षाला वाटत असेल की हे केवळ त्यांच्या राजकीय शहाणपणामुळे झाले आहे, तर तो त्यांचा गैरसमज आहे. आजही त्यांची मूळ संघटना आरएसएस ही डॉ. बी. आर. आंबेडकरांनी संविधान सभेत ते सादर केले तेव्हा संविधानाला विरोध करत होती. त्यानंतर लवकरच तत्कालीन आरएसएस प्रमुख एम. एस. गोळवलकर यांनी घोषित केले की- संविधानामध्ये "भारतीयत्वाचा" अभाव आहे. ते केवळ उसनवारीने घेतलेल्या गोष्टींची एक जोडणी आहे असा युक्तिवाद करत त्यांनी मनुस्मृती हीच भारताची खरी प्राचीन राज्यघटना असल्याचे म्हटले.
आजही काही नेते मनुस्मृतीचे उदात्तीकरण करतात. ती मनुस्मृती स्त्रियांना चार भिंतींच्या आत घरगुती कामांपुरते मर्यादित ठेवते. सावित्रीबाई फुले यांनी १७५ वर्षांपूर्वी महिला आणि शूद्रांसाठी शाळा उघडून ही व्यवस्था मोडून काढली आणि शिक्षण अखंड सुरू राहावे यासाठी त्यांनी अथक छळ सहन केला. त्यांच्या संघर्षामुळेच तुमच्यासारख्या महिला आज राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. त्यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त महिला आणि शूद्रांच्या पहिल्या महान मुक्तिदात्या सावित्रीबाई फुले यांना ही एक विनम्र आदरांजली.
आमचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून आम्ही नम्रपणे सादर करतो की खरा शिक्षक दिन ३ जानेवारी रोजी साजरा केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महिला आणि शूद्रांसाठी भारतातील पहिल्या शाळा स्थापन केल्या. शिक्षक दिनाची सुरुवात त्यांच्या वारशाने झाली पाहिजे.
शहरे आणि योजनांची नावे बदलणे हा ऐतिहासिक न्यायाचा पर्याय होऊ शकत नाही. एक आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून तुम्हाला सक्षमीकरणाचा लांबचा प्रवास माहीत आहे. म्हणून मी नम्रपणे विनंती करतो की शिक्षक दिन ३ जानेवारी रोजी साजरा करावा.
अनेक भारतीयांना अजूनही फुले दांपत्याच्या कार्याची पूर्ण माहिती नाही. जातिव्यवस्थेचा नायनाट करण्यापासून ते प्रतिगामी परंपरांना आव्हान देण्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १७५ वर्षांपूर्वी महिला आणि शूद्रांसाठी शाळा स्थापन करण्यापर्यंत त्यांच्या कार्याची व्यापकता आहे. १८८२ पूर्वी महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला शिक्षणासंदर्भात एक सविस्तर व प्रगतीशील निवेदन सादर केले होते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव गावात झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि नंतर त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये (१८४५-४७) शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले. १ जानेवारी १८४८ रोजी- स्वातंत्र्यापूर्वी ९९ वर्षे आधी त्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली आणि शिकवायला सुरुवात केली.
त्यांच्या पहिल्या सहा विद्यार्थिनींमध्ये चार ब्राह्मण, एक धनगर आणि एक मराठा मुलगी होती. त्या काळासाठी ही एक विलक्षण सामाजिक क्रांती होती. काही महिन्यांतच महारवाडा आणि रास्ता पेठ यासह आणखी शाळा सुरू झाल्या. १८५२ मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याचा औपचारिकपणे गौरव केला. यासंबंधी पुणे ऑब्झर्व्हर या नियतकालिकाने म्हटले की सावित्रीबाईंच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सरकारी संस्थांमधील विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त होती.
सावित्रीबाई ६६ वर्षे जगल्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले. १८९० मध्ये ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण केले. त्यांचे 'अमर जीवन' हे चरित्र प्रकाशित केले, सत्यशोधक परिषदांचे नेतृत्व केले आणि लेखन व संघटन कार्य सुरू ठेवले.
१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ असताना त्यांनी अनेक प्लेगग्रस्त रुग्णांसह एका दलित तरुणाला स्वतः रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांनाही या रोगाची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. त्या खऱ्या अर्थाने वर्गविहीन, जातिविहीन आणि लिंगभेदविरहित भविष्याच्या निर्मात्या होत्या.
बंगालमध्ये महिलांच्या शिक्षणाची सुरुवात जवळपास एक दशकानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांची इतिहासात भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षणाच्या मूळ प्रवर्तक म्हणून ओळख आहे.
माननीय राष्ट्रपती महोदय, मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबरऐवजी ३ जानेवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची नम्र विनंती करतो.
साभार,
डॉ. सुरेश खैरनार
१ जानेवारी, २०२६
नागपूर
भाषांतर- धनंजय आदित्य.
मूळ लेख -