मिथकांनी वेढलेला मगध साम्राज्याचा बुद्धकालीन खरा इतिहास
![]() |
| जरासंधाचा आखाडा की चैत्यगृह (Wikimedia Commons) |
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व हरयाणा या भागातील काही जनसमुदाय स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला महाभारतकालीन जरासंधाचा आधार घेत आहेत. त्या पौराणिक कथा वगळल्यास इतर ऐतिहासिक पुरावे याप्रकरणी दिसून येत नाहीत. मात्र ही स्थळे म्हणजे बौद्ध इतिहासाचे पौराणिकीकरण (Mythologisation of Buddhist sites) कसे झाले याचे अत्यंत महत्त्वाची उदाहरणे ठरतात.
राजगीर हे बुद्धकालीन राजगृह
आजचे राजगीर (बिहार) हे प्राचीन राजगृह म्हणून ओळखले जाते. महाभारतात राजगृह हे जरासंधाची राजधानी म्हणून वर्णिलेले असले तरी पुरातत्त्वीय उत्खननांमधून येथे जी शहरे, तटबंदी व वसाहती आढळतात त्या मुख्यतः बुद्ध-बिंबिसार–अजातशत्रू यांच्या काळातील मगध साम्राज्याशी संबंधित आहेत. राजगृह हे भगवान बुद्धांचे महत्त्वाचे निवासस्थान होते. येथे बुद्धांनी अनेक वर्षे वास्तव्य केले, उपदेश दिले आणि प्रथम बौद्ध संगीतीसुद्धा याच परिसरात झाली. त्यामुळे जरासंधाच्या नावाने ओळखले जाणारे हे भौगोलिक क्षेत्र प्रत्यक्षात बौद्ध इतिहासाचे पुरावे ठरतात.
जरासंधाच्या नावावर बौद्ध संस्कृतीचे अवशेष
राजगीर येथील जरासंधाचा आखाडा म्हणून प्रसिद्ध असलेले अवशेष बुद्धकालीन आहेत. याला मणिमाला चैत्य असेही म्हणतात. येथे आढळणारी दगडी रचना आणि खुला चौकोनी परिसर प्राचीन नागरी किंवा धार्मिक संकुलाचा भाग असल्याचे पुरातत्त्वज्ञ मानतात. या परिसरात सापडलेले अवशेष बौद्ध काळातील स्थापत्याशी सुसंगत आहेत. त्यामुळे येथील पौराणिक कथेवर ऐतिहासिक अवशेषांचे नाव लावले असल्याचे स्पष्ट होते.
बिम्बिसाराची भव्य सायक्लोपियन भिंत
राजगीरच्या सभोवताल पसरलेली भव्य सायक्लोपियन भिंत ही मोठ्या दगडांनी उभारलेली तटबंदी आहे. लोककथेत ही भिंत जरासंधाने बांधली असे सांगितले जाते. मात्र पुरातत्त्वीय अभ्यासानुसार ही तटबंदी इ.स.पू. ६–५ शतकातील म्हणजेच बुद्धकालीन मगध राजवटीतील आहे. ही भिंत राजगृहच्या संरक्षणासाठी उभारलेली असून त्या काळातील शहरी नियोजन, व्यापार आणि बौद्ध संघाच्या सुरक्षिततेशी तिचा थेट संबंध येतो. राजगीरच्या प्राचीन शहरसीमेवर असलेल्या काही भग्न प्रवेशद्वारांना “जरासंध का दरवाजा” असे म्हटले जाते. मात्र ही दारे इ.स.पू. ६–५ शतकातील सायक्लोपियन भिंतीचा भाग आहे.
भिक्षूंचे उन्नत आसन
राजगीर परिसरात एका उंच दगडी चौथऱ्यास “जरासंध की बैठक” असे नाव दिले गेले आहे. लोककथेनुसार येथे जरासंध सभा घेत असे किंवा न्यायदान करत असे. परंतु, “जरासंध उंच दगडी चौथऱ्यावर सभा घेत असे” किंवा “न्यायदान करत असे” असा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात, महाभारतात, पुराणांत, हरिवंशात, शिलालेखात किंवा समकालीन ऐतिहासिक स्रोतात आढळत नाही. बिहारमध्ये व राजगीर परिसरात विविध ठिकाणी असे मोठे दगडी चौथरे आहेत. त्यांचा उपयोग बौद्ध संघ सभेसाठी केला जात असे. पाली ग्रंथांत (उदा. विनयपिटक) यात प्रमुख भिक्षुंसाठी यांचा उन्नत आसन (उच्चासन) असा उल्लेख केला आहे.
राजगीर येथील वैभारगिरी टेकडीला काही स्थानिक कथांमध्ये जरासंधाशी जोडले जाते. प्रत्यक्षात वैभारगिरी ही बौद्ध इतिहासातील अत्यंत महत्त्वाची टेकडी आहे. इथे बुद्धांचे निवासस्थान, ध्यानगुहा आणि अजातशत्रू–बिंबिसार काळातील विहार होते. बौद्ध स्मृती झाकोळून टाकणाऱ्या उत्तरकालीन पौराणिक कथनात या अवशेषांना जरासंधाशी जोडण्यात आले.
पहिली बौद्ध परिषद
राजगीर येथील सप्तकरणी लेणीमध्ये बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सहा महिन्यांनी सुमारे पाचशे बौद्ध भिक्षू यांनी पहिली बौद्ध परिषद घेतली होती. राजगीरमधील मणियार मठ हा गोलाकार अवशेष आहे. तो जरासंधाशी जोडला गेला होता; परंतु उत्खननांमधून तो बौद्ध भिक्षू परंपरेशी संबंधित धार्मिक संरचना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे राजगीरमधील गरम पाण्याचे कुंड (हॉट स्प्रिंग्स) हे बौद्ध भिक्षूंनी वापरत असल्याचे उल्लेख पाली ग्रंथांत आढळतात.
जरासंधाचा किल्ला की कुशाणकालीन स्तूप
हरयाणातील कर्नालजवळील असंद येथील जरासंधाचा किल्ला किंवा टिला म्हणून प्रसिद्ध असलेले अवशेष म्हणजे कुशाणकालीन बौद्ध स्तूपाचा पायथा असल्याचे पुरातत्त्व विभागाला आढळून आले. त्याला असंध स्तूप किंवा कुशाण स्तूप असेही म्हणतात. तो सांचीच्या स्तुपापेक्षाही मोठा असावा असे म्हणतात. येथे कुशाणकालीन काळातील अनेक अवशेष, मातीची भांडी आणि नाणी येथे सापडलीत.
इतिहास आणि पुराणकथा
इतिहासाला पुराणकथांपासून वेगळे करून जाणणे आवश्यक आहे- हा मुद्दा भारतीय इतिहासाच्या प्राचीन अध्ययनात वारंवार समोर येतो. महाभारत, रामायण यांसारख्या पौराणिक ग्रंथांचा सांस्कृतिक प्रभाव फार मोठा असला तरी त्यांना थेट ऐतिहासिक स्त्रोत मानण्याबाबत गंभीर संशय उपस्थित होतो. त्याउलट बौद्ध, जैन व पुरातत्त्वीय साहित्य पुराव्यासह ऐतिहासिक मार्ग दाखवतात. यातच बुद्धकालीन बिंबिसार, अजातशत्रू व लिच्छवी-वज्जी संघराज्याशी झालेल्या संघर्षातून भारतीय राज्यव्यवस्थेच्या विकासाचा एक परिपक्व टप्पा आपल्याला दिसतो.
इतिहासाच्या स्रोतशुद्धीची गरज
महाभारतातील जरासंधवध, युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ, कृष्ण–भीम–अर्जुन यांसारख्या पात्रांची उपस्थिती या कथा भारतीयांच्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत. पण त्या पुराणकथात्मक संरचनेत रचल्या गेल्या असल्याने त्यांच्या माध्यमातून मगधचे खरे सामाजिक, राजकीय स्वरूप शोधणे कठीण होते. महाभारताचा सांस्कृतिक पुरावा म्हणून कदाचित उपयोग होऊ शकेल; पण ऐतिहासिक पुरावा म्हणून त्याला अनेक व स्पष्ट मर्यादा आहेत. कालक्रम, वंशावळी, प्रशासनशैली, युद्धांचे अर्थकारण, भूगोल या घटकांची ऐतिहासिक मांडणी महाभारतातून घेणे शक्य नाही.
याच्या उलट बौद्ध व जैन साहित्य दिघनिकाय, अंगुत्तरनिकाय, विनयपिटक, महावस्तु, भगवतीसूत्र हे ग्रंथ मगध राज्याच्या आरंभीच्या इतिहासाचा वास्तवदर्शी आराखडा सादर करतात. हे ग्रंथ कालसुसंगत आणि राजकीयदृष्ट्या विश्वासार्ह आहेत असे दिसून येते.
राजसत्तेचा संघटनकर्ता बिंबिसार
बिंबिसार (इ.स.पू. ५४३–४९२) हा मगधचा पहिला प्रबळ ऐतिहासिक राजा मानला जातो. त्याने स्थिर प्रशासन उभारले असे बौद्ध साहित्यातील उल्लेख दर्शवतात. त्याने आर्थिक संसाधनांवर नियंत्रण मिळविले आणि गंगेच्या खोऱ्यातील व्यापारमार्गांवर प्रभुत्व प्रस्थापित केले, राजगृहाला राजधानी बनवली, गौतम बुद्धाला राजकीय आधार दिला, विविध गणराज्यांशी मुत्सद्देगिरीने सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. या उपायांनी मगधचे स्थान उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक म्हणून दृढ झाले.
बिंबिसाराच्या काळात राज्यव्यवस्थेचा पाया अधिक पक्क्या प्रशासकीय स्वरूपाचा झालेला दिसतो. महसूल संकलन, लष्करी संघटना, भौगोलिक आधारावर राज्याची विभागणी करून सक्षम प्रशासन तसेच विवाहसंधींची राजकीय ऐक्यासाठी वापरलेली नीती यातून ऐतिहासिक सुसंगतता दिसून येते. पुराणांतील काल्पनिक युद्धकथांच्या तुलनेत हे वर्णन संयत, व्यावहारिक आणि वास्तववादी आहे.
अजातशत्रूची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा आणि सत्तासंघर्ष
बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याचा काळ (इ.स.पू. ४९२–४६०) हा मगध साम्राज्य विस्ताराचा टप्पा ठरतो. तथापि त्याच्यावर पितृहत्येचा आरोप आहे. बौद्ध व जैन दोन्ही ग्रंथ ही गोष्ट नमूद करतात. मात्र त्यातील तपशील भिन्न आहेत. तरीही मगधच्या राज्यकारभारात अंतर्गत सत्तासंघर्ष तीव्र होता ही गोष्ट त्यातून स्पष्ट होते.
अजातशत्रूने उभारलेली लष्करी शक्ती तत्कालीन समाजाच्या तुलनेत अधिक प्रगत दिसते. बौद्ध ग्रंथात त्याच्या रथ-अस्सध (धनुष्यबाण यंत्र) किंवा महाशिलाकंटक यांसारख्या युद्धयंत्रांचा उल्लेख आहे ज्यातून तंत्रज्ञानाच्या विकासाची जाणीव होते. त्याचा वज्जी-लिच्छवी संघराज्यासोबतचा संघर्ष यातून त्याची विस्तारनीती दिसून येते..
लिच्छवी–वज्जी संघराज्यातील प्रजासत्ताक परंपरा
अजातशत्रूला मोठे आव्हान म्हणजे उत्तर दिशेला वसलेले वज्जी-लिच्छवी गणराज्य. येथे राजसत्तेऐवजी सहमतीवर चालणारी सभा, निवडणूक प्रक्रिया, सामूहिक निर्णय ही वैशिष्ट्ये प्रजासत्ताकाचे प्रारंभिक रूप दर्शवतात. बौद्ध साहित्यातील उल्लेख सूचित करतात की हे लोक स्वतंत्र स्वभावाचे, समृद्ध व सुसंघटित होते. अजातशत्रूला त्यांना थेट पराभूत करणे कठीण होते. त्यामुळे त्याने वस्सकार ब्राह्मणाला मुत्सद्देगिरीद्वारे फूट निर्माण करण्याचे कार्य सोपविल्याचा उल्लेख महापरिनिब्बान सुत्तांत आढळतो.
मगध साम्राज्यातील पुरातत्त्व
बिंबिसार-अजातशत्रू या दोन पिढ्यांनी निर्माण केलेले मगध साम्राज्य पुढे मौर्य, शुंग, कान्व, गुप्त अशा शतकानुशतके चाललेल्या साम्राज्य परंपरेचे केंद्र बनले.
राजगृह, पाटलीगृह (पाटलीपुत्र), नालंदा परिसरातील पुरातत्त्वीय अवशेष हे या विकासक्रमाचे साक्षीदार आहेत. मौर्यकालीन पुरातत्त्व, अशोकाच्या शिलालेखातील मगधविषयक संदर्भ, बुद्धकालीन संघराज्यांचे भूगोल... हे सर्व पुरावे मगधाच्या इतिहासाचा पायाभूत आराखडा तयार करतात.
यातून एक गोष्ट निर्विवादपणे पुढे येते- मगधचा आरंभ महाभारतकालीन जरासंधासह जोडण्याची परंपरा सांस्कृतिक असली तरी ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य वाटत नाही. या संदर्भात बौद्ध, जैन साहित्य व पुरातत्त्वीय पुरावे अधिक काटेकोर, कालसुसंगत आणि परस्परांना आधार देणारे आहेत.
मिथकांपलीकडील वास्तविकतेचे पुनर्मूल्यांकन
आजच्या ऐतिहासिक अभ्यासात काही लोक महाभारतासारख्या ग्रंथांना ऐतिहासिक संदर्भ मानतात. पण त्यातून संस्कृती, कल्पनाविश्व आणि राजकीय आदर्शमय कथा यांचे दर्शन घडते. मगध साम्राज्याचा प्रारंभ आणि त्याचे खरे नायक शोधण्यासाठी आपल्याला सूत्रग्रंथ (निकाय, विनय), जैन आगमे, पुरातत्त्वीय शोध, अर्थशास्त्रीय उल्लेख, लोहमुद्रा, नाणे, भूगोल इत्यादी अधिक स्थिर व प्रमाणित आधारांकडे पाहावे लागते.
बिंबिसार आणि अजातशत्रू ही दोन नावे मगधच्या या ऐतिहासिक पायाभरणीचे आधार आहेत. त्यांच्या राज्यकाळाचा मागोवा घेताना भारतीय राज्यसंस्थेच्या विकासाचा एक उत्क्रांत टप्पा आपल्या नजरेसमोर उभा राहतो. राजसत्ता विरुद्ध संघराज्य, धर्मविचार विरुद्ध राजनिती, भू-संपत्तीचा प्रश्न, तंत्रज्ञान आणि सामर्थ्याची वाढ, कूटनीती व युद्धनीती यांची सरमिसळ यात दिसून येते.
पुराणकथा व इतिहास यांचे तारतम्य
मगधचा इतिहास हा आपण प्राचीन भारताकडे कसे पाहतो यावरील एक कसोटी आहे. मिथकांच्या छायेत आपणास भासणारा जरासंध नव्हे; तर बौद्ध व जैन वाङ्मयातून समोर येणारे बिंबिसार व अजातशत्रू इत्यादी व्यक्ती हे खऱ्या इतिहासाचे प्रतिनिधी आहेत हे लक्षात घ्यावे लागते.
आजच्या सामाजिक–राजकीय चर्चेत, जेव्हा इतिहासाचे संदर्भ तोडले-मोडले जातात, तेव्हा मगध साम्राज्याची पुराव्यावर आधारित कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते की पुराणकथा व इतिहास या दोन भिन्न गोष्टी आहेत; पुराणकथा काही लोकांना व लोकसमुहाला प्रेरणा देतात, तर इतिहास आपल्याला वास्तव दाखवतो.
===XXX===
