डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाची संघर्षातून आदर्शाकडे वाटचाल


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य, त्यांचे दैनंदिन व्यवहार, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि त्या वस्तूंमागील संघर्षकथा हे सारे मिळून भारतीय सामाजिक इतिहासाचा जिवंत दस्तऐवज बनतात. नागपूरजवळील चिंचोली येथील शांतीवन आणि तेथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल व वस्तुसंग्रहालय ही अशीच एक जिवंत इतिहास जपण्याची चळवळ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील टायपरायटर, फर्निचर, कपडे व दैनंदिन वस्तू या बाबासाहेबांच्या बौद्धिक श्रमांची, त्यांच्या जगण्याची आणि सामाजिक संघर्षाची साक्ष देतात. संविधान लेखनासारख्या ऐतिहासिक प्रक्रियेत वापरलेली साधने पाहणे ही भावनिक अनुभूती इतिहासाशी थेट संवाद साधते. त्यामुळे चिंचोलीतील संग्रहालय हे आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान ठरते.

चिंचोली-शांतीवनाचा वैचारिक अर्थ

चिंचोली हे गाव बाबासाहेबांच्या सहकारी व निकटवर्तीय स्मृतिशेष वामनराव गोडबोले यांच्या कार्यामुळे आंबेडकरी इतिहासात महत्त्वाचे ठरते. बाबासाहेब नागपूर परिसरात असताना येथे वास्तव्यास येत असत अशी परंपरागत स्मृती आहे. त्यांच्या वापरातील काही मौल्यवान वस्तू येथेच जतन करण्यात आल्या. पुढे या वस्तू विखुरल्या जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत आणि त्यांचे शास्त्रीय पद्धतीने जतन व्हावे या उद्देशाने शांतीवनची संकल्पना आकाराला आली. ही जागा स्मारक, अभ्यास, चिंतन आणि प्रशिक्षणाचे केंद्र व्हावे असा विचार सुरुवातीपासूनच होता.

संकल्पना ते उभारणीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास

शांतीवन प्रकल्पाचा इतिहास पाहिला तर तो सातत्यपूर्ण प्रयत्नांचा, अपुऱ्या साधनांचा आणि प्रशासकीय विलंबाचा इतिहास आहे. नागपूरची भारतीय बौद्ध परिषद आणि स्थानिक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या वस्तूंचे संकलन, त्यांचे संरक्षण आणि सार्वजनिक दर्शनासाठी संग्रहालय उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली. सुरुवातीच्या टप्प्यात ही चळवळ प्रामुख्याने स्वयंसेवी पातळीवर चालत होती. त्यामुळे इमारत उभारली गेली पण तिचे अंतर्गत स्वरूप, संग्रहालयीय मांडणी आणि आधुनिक संरक्षण व्यवस्था यांचा अभाव राहिला.

शासन धोरणात शांतीवनचा समावेश

महाराष्ट्र शासनाच्या मान्यवर व्यक्तींची स्मारके बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाच्या स्थळांचा विकास करणे- या धोरणात्मक चौकटीत शांतीवनचा समावेश करण्यात आला तेव्हा या स्मारकाच्या प्रगतीला नवा आयाम मिळाला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी शासन निर्णय काढून या प्रकल्पाला अधिकृत मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली. महाराष्ट्र शासनाच्या १४ डिसेंबर २०२५ च्या शासनादेशात नमूद केल्याप्रमाणे चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल व कल्चरल ट्रेनिंग सेंटरमधील म्युझियम बिल्डिंगच्या इंटीरियर व अनुषंगिक बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

विधी व नियंत्रण आणणारे शासनादेश

या शासन निर्णयाचे महत्त्व केवळ निधी मंजुरीपुरते मर्यादित नाही. शासनाने या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करतानाच, त्याच्या वापराबाबत कठोर अटी घातल्या आहेत. संग्रहालयासाठी तयार होणारी वास्तू कोणत्याही परिस्थितीत विकली जाणार नाही, हस्तांतरित केली जाणार नाही किंवा व्यावसायिक वापरासाठी दिली जाणार नाही ही अट अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच काम सुरू करण्यापूर्वी नकाशे, मांडणी आराखडे आणि विस्तृत अंदाजपत्रक तांत्रिकदृष्ट्या मंजूर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा प्रकल्प स्मारक म्हणून शाबूत राहावा, कोणाच्या खासगी स्वार्थासाठी वापरला जाऊ नये हा यामागील स्पष्ट उद्देश आहे.

प्रशासकीय यंत्रणा आणि जबाबदाऱ्यांचे विभाजन

शासनादेशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. समाज कल्याण विभाग, महानगर आयुक्त आणि पर्यावरण विभाग यांचीही भूमिका निश्चित करण्यात आली आहे. निधीचा वापर, कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याबाबत उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. म्हणजेच हा प्रकल्प काटेकोर प्रशासकीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.

भविष्यातील एक मुख्य आकर्षण

मात्र येथील व्यवस्था अद्याप अपुरी आहे. शांतीवन पूर्ण क्षमतेने उभे राहिले तर ते संविधानिक मूल्यांचे प्रशिक्षण केंद्र, सामाजिक न्यायावर आधारित संशोधनाचे ठिकाण आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल. बाबासाहेबांचा विचार अशा अनुभवाच्या माध्यमातून समजावून देण्याची ताकद या स्थळात आहे.

चिंचोलीतील शांतीवन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय हा प्रकल्प म्हणजे समाजाची सामूहिक स्मृती जपण्याची परीक्षा आहे. शासनाने मान्यता दिली आहे, निधीही मंजूर केला आहे. आता प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक अंमलबजावणीचा. बाबासाहेबांच्या स्मृतींना न्याय देण्यासाठी शांतीवन प्रकल्पाला पूर्णत्व देणे ही काळाची गरज आहे.

===XXX===

शासनादेश पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मान्यवर व्यक्तींची स्मारक बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या स्थळांचा विकास करणे या योजनेअंतर्गत शांतीवन चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींगच्या इंटेरीअर व अनुषंगिक बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांकः सान्यावि-२०२५/प्र.क्र. १४०/ बांधकामे
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १४ डिसेंबर, २०२५.

वाचा :-

१) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. बीसीएच-२०११/प्र.क्र.५२/मावक-७, दि.१४.०३.२०११
२) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. बीसीएच-२०११/प्र.क्र.६१/बांधकामे, दि.३०.३.२०१२
३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सान्यावि-२०१७/प्र.क्र.६२/बांधकामे, दि.११.४.२०२३
४) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. बीसीएच-२०१४/प्र.क्र.६१/बांधकामे, दि.५.११.२०२०.
५) आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांचे दिनांक ०८.१२.२०२५ रोजीचे पत्र क्र. सकआ/मावक/ऐति. स्थळ /२०२५-२६/का-१२/२७६०.
६) महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दिनांक ०८.१२.२०२५ रोजीचे पत्र क्र. का.अ. (प्र.) / ८००.

प्रस्तावना :-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तिचे स्मारके बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे व अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नितीमुल्यांवर आधारित विकास साधणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करण्याविषयीची निकष व नियमावली (लेखाशीर्ष २२२५ ३६३६) या योजनेंतर्गत शांतीवन चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींग इंटेरीअरच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव उचित कार्यवाहीस्तव संदर्भाधीन क्र.६ दि.०८.१२.२०२५ अन्वये शासनास सादर केला होता. विदर्भ विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २००९-१० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी स्व. वामनराव गोडबोले यांच्या चिंचोली येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण, ट्रेनिंग सेंटर, संरक्षण भिंत इत्यादी बांधकामांसाठी संदर्भ क्र.१ व २ अन्वये प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरीत करण्यात आलेला आहे. आता शांतीवन, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींगच्या इंटेरीअर व अनुषंगिक बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तिचे स्मारके बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे व अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नितीमुल्यांवर आधारित विकास साधणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करण्याविषयीची निकष व नियमावली (लेखाशीर्ष २२२५ ३६३६ नवीन लेखाशिर्ष २२२५ G ४१२) या योजनेंतर्गत शांतीवन, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींगच्या इंटेरीअर व अनुषंगिक बांधकामास रू.१४,४५,५२.३९७/- (अक्षरी रु. चौदा कोटी पंचेचाळीस लक्ष बावन्न हजार तीनशे सत्याण्णव फक्त) इतक्या रकमेच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

१) शांतीवन, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींगच्या इंटेरीअर व अनुषंगिक बांधकाम सुरू करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास संबंधित वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच सुरू करावे.
२) ढोबळ स्वरुपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करुनच काम हाती घ्यावे.
३) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र. इएनव्ही-२०१३/ प्र.क्र.१७७/ता.क्र.१, दि.१० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
४) विस्तृत अंदाजपत्रकावर उपभोक्ता विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर यांचे साक्षांकन आवश्यक आहे.
५) सदर बांधकामासाठी कार्यान्वयीन यंत्रणा ही नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर राहील.
६) सदर प्रकल्पाचे/वास्तुचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १०० टक्के अनुदानातून निर्माण करण्यात आले आहे, त्याप्रमाणे इमारतीच्या प्रवेश व्दारावर उपरोक्त बाबीचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
७) शांतीवन, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल व कल्चरल ट्रेनिंग सेंटर येथील म्युझियम बिल्डींगच्या इंटेरीअर व अनुषंगिक बांधकाम करण्याकरीता या प्रकल्पावर सनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संयुक्तपणे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण नागपूर व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची राहील.
८) सदर वास्तुचे हस्तांतरण इतर संस्थेला करता येणार नाही किंवा जागेची व वास्तुची खरेदी-विक्री करता येणार नाही.
९) सदर वास्तुचा उपयोग व्यापारी तत्वावर करता येणार नाही.
१०) शासनाच्या कार्यक्रमासाठी वा उपक्रमासाठी उपरोक्त वास्तुचा विनाशुल्क उपयोग करता येईल.
११) प्रस्तावित बांधकामाची जागा सदर संस्थेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन कामाच्या निविदा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात.

२. सदर प्रकल्पाचे कामकाज शासकीय नियमातील तरतूदीस अनुसरून तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावी.

३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वितरीत करण्यात आलेला निधी उपरोक्त कामावर खर्च झाल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांनी विहित मार्गाने शासनास सादर करावे.

४. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांनी प्रकल्पाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा त्रैमासिक अहवाल आणि वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास व आयुक्त, समाजकल्याण पुणे यांना वेळीच सादर करण्याची दक्षता घ्यावी.

५. सदर लेखाशिर्ष २२२५ G ४१२ अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांनी मंजूर निधी आहरीत करून तो महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे सुपूर्द करावा. तसेच योजनेंतर्गत मंजूर निधीचे वितरण हे संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील अटीच्या अधीन राहून काटेकोरपणे करण्याची जबाबदारी सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांची राहील.

६. प्रस्तुत्तचा शासन निर्णय, वित्तीय अधिकार, नियम पुस्तिका, १९७८, भाग पहिला, उपविभाग-पाच, अ.क्र.१ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परि.क्र. १३४ (१) खाली प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेले अधिकारी व झालेल्या निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१२१४१४१८२४८९२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by HARSHADEEP SHRIRAM KAMBLE
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. विरोधी पक्ष नेता, विधान सभा/विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
४. मा. मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
६. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे
७. महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर
८. प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नागपूर
९. सहाय्यक आयुकत, समाजकल्याण विभाग, नागपूर
१०. अध्यक्ष, भारतीय बौद्ध परीषद, शांतीवन, चिंचोली, नागपूर
११. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
१२. निवड नस्ती (बांधकामे)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!