धार्मिक कट्टरतेतील एककारणी भ्रम (मोनोकॉझल फलॅसी)
मोनोकॉझल फलॅसी, ज्याला आपण मराठीत एककारणी भ्रम किंवा एकमेव कारणाचा भ्रम म्हणतो. हा एक असा तर्कदोष आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या गुंतागुंतीच्या घटनेसाठी केवळ एकाच कारणाला जबाबदार धरते. वास्तव हे नेहमीच अनेक पदरांनी बनलेले असते आणि कोणत्याही छोट्या-मोठ्या बदलामागे अनेक घटकांचा परस्परसंबंध असतो. मात्र मानवी मेंदूला गुंतागुंत आवडत नसल्यामुळे तो सरधोपट मार्ग (short cut) निवडतो आणि सर्व दोषांचे खापर एकाच कारणावर फोडतो. धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत हा भ्रम प्रकर्षाने जाणवतो. जेव्हा समाज एखाद्या समस्येसाठी फक्त धर्माला किंवा विशिष्ट शिकवणीला जबाबदार धरतो, तेव्हा तो त्यामागील सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाच्या अशा मानसिक-वैचारिक गुंतागुंतीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. अशी विचारपद्धती अत्यंत घातक ठरू शकते कारण ती आपल्याला समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यापासून रोखते आणि आपल्याला एका आभासी सत्याच्या जगात घेऊन जाते, जिथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ एकच शब्द किंवा एकच घटक असतो.
.
एखाद्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे केवळ त्या धर्माच्या शिकवणीमुळे झाले असा निष्कर्ष काढला जातो. यात त्या हल्लेखोराचे वैयक्तिक नैराश्य, त्याला मिळालेले चुकीचे मार्गदर्शन किंवा त्याच्या देशातील राजकीय अस्थिरता अशा बाबींकडे दुर्लक्ष होते.
.
फाळणी केवळ धर्मामुळे झाली असे मानले जाते. प्रत्यक्षात त्यामागे ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा नीती, जातीभेद-धर्मभेद, तत्कालीन नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि संसाधनांचे चुकीचे वाटप अशी अनेक कारणे होती.
.
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकांचे जाळे
.
धार्मिक कट्टरता ही फक्त धार्मिक शिकवणीतून येत नाही. ती अनेक बाह्य घटकांचा परिपाक असते. जेव्हा समाजातील एखाद्या वर्गाला आर्थिक प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, बेरोजगारी वाढते आणि भविष्याबद्दल असुरक्षितता निर्माण होते, तेव्हा ते तरुण सहजपणे कट्टरपंथी विचारांकडे आकर्षित होतात. अशा संघटना त्यांना ओळख देतात तसेच आर्थिक आधार आणि एक प्रकारची सत्ता देखील मिळवून देतात. सत्ता मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी राजकीय नेते जाणीवपूर्वक जनतेचे ध्रुवीकरण करतात आणि धर्माचा वापर शस्त्र म्हणून करतात. तेव्हा कट्टरता ही आपोआप निर्माण होत नाही, ती एक राजकीय साधन आणि उत्पादन म्हणून समोर येते. अन्यायाची भावना आणि आपली अस्मिता आणि अस्तित्व धोक्यात आहे ही भीती कट्टरता पसरवण्यासाठी इंधनासारखे काम करते. अशा परिस्थितीत कट्टरतेचे कारण धार्मिकते सोबत गरिबी, संसाधनांचे असमान वाटप आणि सत्तेची समीकरणे यांच्याशीसुद्धा जोडलेले असते. पण एककारणी भ्रमामुळे अनुयायांचा मेंदू गुलाम होतो व ते घटनेचे बहुआयामी घटक पाहू शकत नाही. युरोप किंवा मध्य पूर्वेतील बेरोजगार तरुण जेव्हा कट्टरपंथी संघटनांमध्ये सामील होतात, तेव्हा त्याची कारणे धर्मासोबतच आर्थिक असुरक्षितता आणि मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणे हेसुद्धा असते.
.
निवडणुकांच्या काळात जेव्हा धर्म संकटात आहे अशा घोषणा दिल्या जातात तेव्हा त्यामागे धार्मिक कळवळा नसून सत्ता मिळवण्यासाठी मतदारांचे केलेले भावनिक ध्रुवीकरण हेही महत्त्वाचे कारण असते. एखाद्या विशिष्ट समुदायाला शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्यांना रोजगाराच्या संधी नसतात तिथे कट्टरता पसरवणे सोपे जाते.
.
ईश्वरी सत्तेचा भ्रम आणि अपरिवर्तनीयतेचा अट्टाहास
.
धार्मिक कट्टरतेच्या गाभ्याशी असलेला एक महत्त्वाचा वैचारिक पैलू म्हणजे धर्म आणि त्यातील तत्त्वे ही प्रत्यक्ष ईश्वराकडून आली असून त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही हा टोकाचा विश्वास होय. जेव्हा एखादी व्यक्ती मानवी बुद्धीने तयार केलेले नियम किंवा प्राचीन परंपरांना अंतिम आणि पवित्र मानू लागते, तेव्हा तिथे विवेकाची दारे बंद होतात. जे लिहिले आहे तेच सत्य आहे आणि त्यात बदल सुचवणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे, ही धारणा व्यक्तीला एका वैचारिक तुरुंगात बंदिस्त करते. यातूनच मग तथाकथित गुन्हेगाराला शिक्षा देण्याची विकृत मानसिकता जन्म घेते. कट्टरपंथी व्यक्ती स्वतःला ईश्वराचा आणि ईश्वरी आज्ञेचा रक्षक समजू लागते आणि ईश्वराच्या नावाखाली हिंसा करणे हे आपले कर्तव्य मानू लागते. या प्रक्रियेत तिला हिंसेत पवित्रता आणि त्या बदल्यात मिळणाऱ्या दैवी बक्षीसाची किंवा परलोकातील सुखाची विकृत आणि आंधळी लालसा तिला अधिक आक्रमक बनवते. कट्टर व्यक्तींचा असा एककल्ली विचार ऐतिहासिक संदर्भ, राज्याचे कायदे, मानवी मूल्ये आणि मानवी उत्क्रांतीला त्याप्रकरणी पूर्णपणे नाकारतो. हा या भ्रमाचा सर्वात धोकादायक भाग आहे.
सती प्रथा किंवा तिहेरी तलाक यांसारख्या प्रथांना जेव्हा काही लोक ईश्वरी आदेश मानून पाठिंबा देतात, तेव्हा ते काळाप्रमाणे होणाऱ्या मानवी हक्कांच्या बदलाला नाकारत असतात. एखाद्या लेखकाने, कलाकाराने किंवा चित्रकाराने धर्मावर टीका केली तर ईश्वराचा अपमान झाला म्हणून त्या व्यक्तीवर हल्ला केला जातो. ही कृती त्या व्यक्तीच्या सृजनता या मूल्यांना पूर्णपणे विसरून केली जाते. यात कट्टर व्यक्तीला टीका आणि अवमान यातील भेद काळात नाही.
.
मानसिक विकासाचा अभाव आणि वैचारिक अपरिपक्वता
.
मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, कट्टरता ही व्यक्तीच्या अपूर्ण मानसिक वाढीचे लक्षण ठरते. मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार- मानवी नीतिमत्ता ही टप्प्याटप्प्याने विकसित होत असते. कट्टरपंथी व्यक्ती मात्र अनेकदा अशा स्तरावर अडकलेली असते जिथे नियम हे केवळ पूर्णपणे काळे किंवा पूर्णपणे पांढरे / only black or white असतात. अशा व्यक्तींना जगातील वैविध्य किंवा ग्रे शेड्स समजत नाहीत; त्यांच्यासाठी जग केवळ विश्वासू आणि पाखंडी अशा दोन भागांत विभागलेले असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा भावनिक विकास खुंटतो- तेव्हा ती दुसऱ्याच्या वेदना किंवा विचार समजून घेण्याची क्षमता, म्हणजेच एम्पथी (Empathy) गमावून बसते. ही मानसिक स्थिती व्यक्तीला अधिक हिंसक भूमिकेकडे ढकलते. तिला स्वतःच्या विचारांच्या पलीकडे दुसरे काहीही दिसत नाही. ही वैचारिक जडता तिला स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ मानण्यास प्रवृत्त करते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा एक मोठा अडथळा असतो.
.
लहानपणापासूनच मुलांच्या मनात आपलाच धर्म श्रेष्ठ म्हणून आपण स्वर्गात आणि बाकीचे सर्व नरकात जाणार असे बिंबवले गेले तर मुलाचा मानसिक विकास एकांगी होतो आणि तो दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार (Empathy) करू शकत नाही.
.
सोशल मीडियावरील एखाद्या साध्या विनोदाने किंवा टिप्पणीने विचलित होऊन हिंसक प्रतिक्रिया देणारे लोक- हे मानसिक अपरिपक्वतेचे नमुने आहेत. अशा व्यक्तीला टीका आणि अपमान यातील विभाजन रेषा समजत नाही.
.
अतार्किक विचारसरणीचे विश्लेषण
.
अल्बर्ट एलिस यांच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी (REBT) नुसार, माणसाच्या राग आणि हिंसक वृत्तीचे मूळ त्याच्या मस्ट-अर्बटरी (Must-urbatory) विचारात असते. कट्टरपंथी व्यक्तींच्या मनात जगातील सर्व गोष्टी माझ्या धर्माप्रमाणेच चालल्या पाहिजेत किंवा कोणीही माझ्या श्रद्धेचा अनादर करता कामाच नये अशा “ पाहिजेच (Must/Should)” या अटींवर आधारित अतार्किक विचारसरणी असते. जेव्हा या अटी पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्यांच्यात ऑफुलरायझिंग (Awfulizing), म्हणजे गोष्टींना अतिशय भयानक किंवा असह्य समजण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आर.ई.बी.टी. सांगते की व्यक्तीला डिमांडिंगनेस विवेकापासून दूर नेते. जोपर्यंत व्यक्ती आपल्या विचारांमधील हे अनिवार्यतेचे मस्ट काढून टाकत नाही, तोपर्यंत ती लवचिक आणि विवेकनिष्ठ बनू शकत नाही. कट्टरता हा खरं तर एक मानसिक आजार असून तो विवेकी विचारांच्या अभावामुळे अधिक बळावतो.
.
माझ्या धर्माचा आदर सर्वांनी केलाच पाहिजे (Must), अन्यथा त्यांना जगण्याचा अधिकार नाही. हा मस्ट चा विचार अर्थात डिमांडिंगनेस व्यक्तीला हिंसक बनवतो. जर कोणी माझ्या धर्माबद्दल काही चुकीचे बोलले, तर ती जगातील सर्वात भयानक (Awful) गोष्ट आहे आणि ती मी सहन करूच नये. अशा विचारांमुळे व्यक्ती अतिशय टोकाचा राग व्यक्त करते (ऑफुलरायझिंग). जर मी देवाची ही विशिष्ट पूजा केली नाही, तर मी एक पापी आणि निकृष्ट माणूस आहे. अशा विचारातून स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल टोकाचा पूर्वग्रह (सेल्फ-डाउनिंग) निर्माण होतो.
.
बहुकारणी दृष्टिकोनाची गरज
.
धार्मिक कट्टरता ही समस्या एका सरळ रेषेत नसून ती अनेक धाग्यांनी बनलेली एक गुंतागुंत आहे. जेव्हा आपण म्हणतो की कट्टरता म्हणजे केवळ धार्मिक वेड आहे, तेव्हा आपणही मोनोकॉझल फलॅसी चे बळी ठरतो. ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आर्थिक प्रगती, राजकीय पारदर्शकता, ऐतिहासिक संवाद, आणि आर.ई.बी.टी. सारख्या मानसशास्त्रीय तत्त्वांच्या आधारे विवेकी शिक्षणावर भर द्यावा लागेल. जसे- धार्मिक दंगली थांबवण्यासाठी केवळ शांतता कमिटी स्थापन करून चालत नाही, तर त्या भागातील बेरोजगारी आणि अफवा पसरवणारी सोशल मीडियाची यंत्रणा यावरही काम करावे लागते.
.
कोणत्याही घटनेमागे कारणांची विविधता आणि साखळी असते- हे मान्य करणे ही चिकित्सक विचारशक्तीची पहिली पायरी आहे. जोपर्यंत आपण धर्माला ईश्वरी आदेशाच्या चौकटीतून बाहेर काढून एक मानवी उत्क्रांतीची प्रक्रिया म्हणून पाहत नाही आणि स्वतःच्या विचारांना आव्हान देत नाही, तोपर्यंत ही विकृती संपणार नाही. वास्तव हे आपण विचार करतो त्यापेक्षा नेहमीच अधिक गुंतागुंतीचे असते आणि ही बहुआयामी गुंतागुंत स्वीकारणे हा मानवीय प्रगतीचा मार्ग आहे.
.
--- धनंजय आदित्य