'बुढ़ी गांधी' यांचे स्वातंत्र्य संग्रामातील आश्चर्यकारक उल्लेखनीय कार्य

Open Media

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटीश पोलीस अधिकारी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार करत होते. मातंगिनी एका चाबुताऱ्यावर उभी होती. हातात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज घेऊन घोषणा देत होती. तेव्हा तिच्या डाव्या हातात गोळी लागली. तरीही ती थांबली नाही. ती पोलीस स्टेशनकडे चालतच राहिली. ते पाहून पोलिसांनी तिच्यावर आणखी गोळ्या झाडल्या. एक गोळी तिच्या दुसऱ्या हातात आणि दुसरी तिच्या डोक्यात लागली. शेवटच्या क्षणीही या महान क्रांतिकारीने ध्वज खाली पडू दिला नाही. मृत्यूच्या वेळीपण तिच्या ओठांवर शब्द होते- 'वंदे मातरम्!' ही कहाणी आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या मातंगिनी हाजरा या एका धाडसी महिलेची! त्यांना बुढ़ी गांधी किंवा ‘बुढ़ी महिला गांधी’ म्हणूनही ओळखले जाते.
वैयक्तिक जीवन
मातंगिनी हाजरा यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1869 रोजी पश्चिम बंगालमधील मिदनापूर परिसरातील तामलुक जवळच्या होगला या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांना बालपणापासून आर्थिक ओढाताण सहन करावी लागली होती. गरिबी आणि पारंपरिक सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण मिळाले नाही. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लहान वयातच ( १२ व्या वर्षी) त्यांचा विवाह करण्यात आला. त्यांच्या पतीचे नाव त्रिलोचन हाजरा होते. ते विवाहाच्या वेळी ६२ वर्षांचे होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्या विधवा झाल्या. त्यांना मुले-बाळे नव्हते. या परिस्थितीत मातंगिनींनी स्वावलंबन, सेवा आणि गावाकडे लक्ष देणे हे कार्य अवलंबिले.
 
समाजकार्यात सक्रीय 
विधवा असूनही मातंगिनी हाजरा यांनी समाजकार्य आणि मानवसेवेत आपले आयुष्य समर्पित केले. त्या गावातल्या गरिबांचा, अनाथांचा व वृद्धांचा सांभाळ करीत होत्या. कधी कुणाला अन्न, कधी औषध किंवा कधी मानसिक आधार देणे हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचे भाग होते. गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळींचा प्रभाव भारतभर दिसू लागल्यावर मातंगिनींनीही गांधींचे तत्वज्ञान आत्मसात केले. स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. खादी वापरणे, चरखा चालवणे, अहिंसा व सत्य या बाबी त्यांच्या आचारविचाराचे केंद्र बनल्या. स्थानिक लोक आणि महिला गटांना त्यांनी एकत्र करून राजकीय जाणीव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी सार्वजनिक कार्यात व आंदोलनात भाग घेण्याचे साहस केले. ही बाब त्या काळच्या सामाजिक-राजकीय दृष्टीने खूपच उल्लेखनीय होती. मातंगिनी हाजरा या ‘बुढ़ी गांधी’ म्हणून लोकांमध्ये ओळखल्या गेल्या. हे आदरसूचक टोपणनाव त्यांच्या गांधीवादी जीवनशैलीचा व देशहितासाठी असलेल्या निष्ठेचा परिणाम होता.
 
https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=12632275

स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय 
सुमारे १९०५ पासून त्या महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. १९३० च्या दशकात शारीरिक स्थिती कमकुवत असूनही हाजरा तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच त्या अस्पृश्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यात मग्न झाल्या. १९३५ मध्ये तामलुक प्रदेशात भीषण पुरामुळे कॉलरा आणि देवी या रोगाचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा त्यांनी रोगाची लागण झालेल्या लोकांची सेवा-सुश्रुषा केली. १९३० च्या सविनय विनयभंगाच्या चळवळीपासून ते १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनापर्यंत मातंगिनी हाजरा सक्रिय राहिल्या. त्यानी स्थानिक राष्ट्रीय चळवळींमध्ये, तामलुक आणि आसपासच्या भागातल्या इतर आंदोलनात स्वतःला झोकून दिले. मीठाच्या सत्याग्रहात त्या अग्रेसर होत्या. त्यांनी अ‍ॅलिनन मिठागरावर मीठ तयार करून ब्रिटिश सरकारच्या मिठाचा अन्याय्य कायदा तोडला. त्यात त्यांना अटक झाली होती. त्यानंतर 'चौकीदारी कर बंधा' (चौकीदारी कर रद्द करा) या चळवळीत भाग घेतला. त्या वेळी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्यांना शिक्षा करण्यासाठी खास न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. या बेकायदेशीर स्थापनेचा निषेध करण्यासाठी घोषणा देत न्यायालयाच्या इमारतीकडे कूच करत असताना मातंगिनी यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि बहरामपूर तुरुंगात डांबण्यात आले. सुटका झाल्यानंतर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्य बनल्या. स्वतः खादी कातण्याचे कामही करू लागल्या. १९३३ मध्ये त्यांनी सेरामपूर येथील उपविभागीय काँग्रेस परिषदेत भाग घेतला. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये त्या जखमी झाल्या. बंगालचे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जॉन अँडरसनच्या सभेत त्यांनी जॉन यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

भारत छोडो आंदोलनात नेतृत्व 
१९४२ मध्ये तामलूक परिसरात समांतर सरकार (ताम्रलिप्त जातीय सरकार) स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हे सरकार दोन वर्षे चालले. २९ सप्टेंबर १९४२ रोजी तामलुक पोलीस स्टेशन ताब्यात घेण्यासाठी समर परिषद (युद्ध परिषद) ने स्थापन केलेल्या विद्युत वाहिनीच्या स्वयंसेवकांच्या पाच तुकड्यांपैकी पैकी एका तुकडीचे त्यांनी नेतृत्त्व केले. स्थानिक नेतॄत्वात आणि स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यात त्यांचा प्रभाव खूप वाढला. त्यांनी अत्यंत धाडसाने एक निर्णायक पाऊल उचलले. ते म्हणजे त्यांनी तामलुकमधील पोलीस स्टेशन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने सुमारे सहा हजार लोकांचा (मुख्यतः महिला स्वयंसेवकांचा) मोर्चा नेला. त्यात त्या स्वतः अग्रभागी होत्या. हा मोर्चा “छोडो भारत” चळवळीतील महत्त्वाच्या कृतींपैकी एक ठरला.
 
स्वातंत्र्याच्या आंदोलनात शहीद 
तामलुक पोलिस स्टेशनच्या दारात मोर्चा पोहोचल्यानंतर ब्रिटिश पोलीसांनी १४४ कलम लागू करून मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. अशा कठीण प्रसंगी मातंगिनी सर्वात पुढे चालत होत्या. त्या हातात तिरंगा धरून ठेवत होत्या आणि पोलीसांना ठामपणे ‘अहिंसक मोर्च्यावर गोळीबार करू नये’ अशी विनंती करत होत्या. परंतु पोलीसांनी गोळीबार केला. प्रथम त्यांच्या पायात गोळी लागली. तरीही त्या पुढे जात राहिल्या. दुसरी आणि तिसरी गोळी त्यांच्या हातात व डोक्यात लागली. तरीही त्यांनी तिरंगा सोडला नाही. शेवटी त्या रक्ताने माखून गेलेला ध्वज हाती धरून मृत्यू पावल्या. (२९ सप्टेंबर १९४२) त्या वेळी त्यांचे वय ७२ वर्षे होते. "छोडो भारत" चळवळीच्या त्या पहिल्या शहीद ठरल्या. त्यांच्या मृत्यूचा प्रसंग लोकांसाठी आणि चळवळीसाठी खूप भावनिक ठरला. त्यापासून अनेकांना आंदोलनाची प्रेरणा मिळाली.

मातंगिनी हाजरा यांच्या शाहिदीचे परिणाम फार मोठे होते. त्यांच्या मृत्यूमुळे स्थानिक राष्ट्रीय सरकार आणि विद्रोहक चळवळींना अधिक प्रोत्साहन मिळाले. लोकांमध्ये ब्रिटिश राजविरुद्धची निष्ठा दृढ झाली. त्यांच्या शौर्यामुळे अनेकांनी राष्ट्रीय सेवेत आणि चळवळींत सामील होण्याचे ठरवले. त्यांच्या आदर्शाने स्थानिक समुदायाला लढाऊ आणि संघटित ठेवले.

Matangini Teacher's Training Institute

वारसा आणि स्मरण 
स्वातंत्र्यानंतर मातंगिनींचा वारसा जपला गेला. जनतेत त्यांना “गांधी बुढ़ी” म्हणून आदर मिळत राहिला. त्यांचा आदर्श लोकांनी घ्यावा यासाठी त्यांच्या नावाच्या शाळा, महाविद्यालये, रस्ते आणि स्मारके निर्माण करण्यात आली. खास करून तामलुकमध्ये ज्या ठिकाणी त्या शहीद झाल्या त्या जागी त्यांचे स्मारक उभारण्यात आले. कोलकात्याला त्यांच्या नावाचा लांबलचक रोड आहे. 2002 मध्ये “छोडो भारत” चळवळीच्या 60 व्या वर्षानिमित्त पोस्टाच्या पाच रुपयांच्या तिकिटावर त्यांचे चित्र छापण्यात आले. 1977 मध्ये कोलकात्यात त्यांची प्रतिमा उभी करण्यात आली. २०१५ मध्ये, पूर्व मेदिनीपूरमधील तामलुक येथे शहीद मातंगिनी हाजरा यांच्या नावे सरकारी महिला महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. पश्चिम बंगाल राज्यातील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील तामलुक येथील पंस्कुरा-हल्दिया मार्गावरील रेल्वे स्टेशनला ‘शहीद मातंगिनी रेल्वे स्टेशन’ हे नाव देण्यात आले. पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील तामलुक उपविभागात एका प्रशासकीय विभागाचे (ब्लॉकचे) नाव मातंगिनी हाजरा यांच्या नावावरून ठेवण्यात आले. होगला गावात त्यांच्या जन्मस्थळी, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक झोपडीवजा स्मारक स्थापन करण्यात आले. चत्रा येथे Matangini Teacher's Training Institute स्थापण्यात आले आहे. मेदिनापूर येथे Matangini Govt.College Of Nursing आहे.

Facebook
Matangini Hazra Balika Vidyalay

आजही प्रेरणादायक 
मातंगिनींचे जीवन आणि त्यांच्या कार्याने लोकांमध्ये आदर्श तत्त्वे ठेवली. पहिले तत्त्व म्हणजे त्यांचे निर्भय धैर्य. समाजात वृद्धावस्था ही निष्क्रीयता समजली जाते. परंतु त्यांनी सिद्ध केले की वाढत्या वयाच्या टप्प्यातही आपण सक्रीय राहू शकतो. दुसरे तत्त्व म्हणजे त्यांची सेवा नीती. त्यांनी नेहमीच गरीब आणि दुर्बलांकडे लक्ष दिले. हे त्यांचे कार्य राजकीय आंदोलनाला नैतिक मजबुतीही देत होते. तिसरे तत्त्व म्हणजे गांधीवादातील निष्ठा. अहिंसा, सत्य आणि स्वावलंबनाचे मूल्य त्यांनी आयुष्यात मार्गदर्शक मानले. या गुणांमुळे त्यांची कथा आजच्या पिढ्यांनाही प्रेरणा देते.

Photo By Post of India - https://colnect.com/en/stamps/stamp/158283-Tamralipta_Jatiya_Sarkar_-_Matangini_Hazra-Politics_Government-India, GODL-India, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=98713736
पोस्टाचे तिकीट 

आज मातंगिनी हाजरा यांची कथा फक्त ऐतिहासिक घटना नाही; तर ती सामाजिक आणि नैतिक धडे देणारी शौर्यगाथा आहे.  त्यांच्या आयुष्यातून आपण शिकतो की- संघर्षात उमेद, सेवाभाव आणि धैर्य आवश्यक आहे. भीतीला हरवूनही उच्च तत्त्वांचे रक्षण करणे शक्य आहे. त्यांचे कार्य पुढच्या पिढ्यांना देशसेवेसाठी प्रेरित करीत राहतील.

- धनंजय आदित्य 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!