गरबा अर्थात नाचणे गाणे हा 'देव, धर्म, जाती विरहित' निखळ सांस्कृतिक कार्यक्रम असावा
मानवी जीवनातून सांस्कृतिक कार्यक्रम वजा केले तर जीवन रूक्ष होऊन जाईल. आपण जीवनातून सांस्कृतिक कार्यक्रम काढून टाकले तर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा विचार केला पाहिजे. निव्वळ गरबा हे कर्मकांड नाही.
काला घोडा उत्सवला आपण कर्मकांड म्हणत नाही. त्याचा सांस्कृतिक प्रवाह नव्या पिढीच्या कृतिशीलतेने पुढे जात आहे. गरबा सुद्धा नव्या पिढीच्या दृष्टीने वळणे घेत पुढे जात आहे.
वाढदिवस साजरा करणे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला गॉड ब्लेस यु हे गाणे चिटकवून अंधश्रद्धा आली आहे. तरी आपण ती चालवून घेतो. कारण वाढदिवसाच्या समारंभाच्या मजबूत सांस्कृतिक पायाने त्या गाण्याला भक्कम मजबूती दिली आहे.
त्याचप्रमाणे गरबा या सांस्कृतिक उत्सवाला धर्म, देवी, मूर्ती, पूजा, आरती, पुराणकथा इत्यादीचा आधार काढून टाकला तर तो निव्वळ निखळ सांस्कृतिक कार्यक्रम होऊन फुलू शकतो.
गणपती दान करण्याच्या छोट्याश्या कृतीने समाजात काहीतरी परिवर्तन निश्चितच घडले. आपण अंधश्रद्धा सोडल्या त्या एकदम मोठ्या अंधश्रद्धा सोडल्या नाहीत. कमरेचा दोरा तुटला तर काहीतरी भयानक अरिष्ट होणार आहे यां विचाराने गाळण उडायची. पण एक साधा दोरा सोडण्याची व तोडण्याची हिंमत पुढील अनेक निरर्थक गोष्टी सोडण्याच्या धैर्याला पायाभूत आधार देऊन गेली. धर्म, देवी, मूर्ती, पूजा, आरती, पुराणकथा इत्यादीचा समावेश नसलेला गरबा ही एका परिवर्तनाची पायाभरणी होऊ शकते.
समतेच्या गरब्यात धर्म, जात, देवी, मूर्ती, पूजा, आरती, पुराणकथा, अंधश्रद्धा इत्यादीचा समावेश नसावा, ही सार्थ अपेक्षा आपण ठेवू शकतो. या गोष्टी वगळून साजरा केलेल्या नाच गाण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध असण्याचे काही कारण नाही असे वाटते. शिस्त, नैतिकता, प्रदूषणाचा अभाव, सुसंस्कृतता इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव त्यात करणे नास्तिक लोकांना किंवा अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या लोकांना मुळीच कठीण जाणार नाही.
- धनंजय आदित्य.