झापडबंद माकडांच्या ज्ञानपराङमुख विळख्यातून समाज वाचवण्यासाठी...
ज्ञान हे मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती संकलित करणे नसून, ती माहिती समजून घेणे, तिचे विश्लेषण करणे आणि तिचा उपयोग आपल्या जीवनात व समाजाच्या प्रगतीसाठी करणे होय. जेव्हा एखादा समाज ज्ञानापासून दूर जातो, तेव्हा त्याला ज्ञानपराङमुख समाज असे म्हटले जाते. हा केवळ ज्ञानाचा अभाव नसून, ज्ञानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची किंवा त्याला महत्त्व न देण्याची एक आत्मघातकी वृत्ती आहे. अशी वृत्ती कोणत्याही समाजाच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी गंभीर धोका निर्माण करते. ज्ञानपराङमुखतेची कारणे अनेक आणि सखोल असतात, त्यांचे परिणाम भयानक आणि दूरगामी असतात. व्यावहारिक, संस्थात्मक आणि धार्मिक झापडे लावलेल्या अज्ञानातून समाजाला बाहेर पडण्यासाठी एकत्रित व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते.
ज्ञानपराङमुखतेची कारणे
ज्ञानपराङमुखता ही एक गुंतागुंतीची सामाजिक समस्या आहे. ती अनेक सामाजिक घटकांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. ज्ञानपराङमुखतेचे मूळ कारण शिक्षणाच्या मूलभूत संरचनेत आणि समाजाच्या धारणेत दडलेले असते. समाजातील मोठ्या लोकसंख्येला, विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना, शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शाळांची कमतरता, शिक्षकांचा अभाव, शिक्षणाचे महागडे स्वरूप यामुळे अनेकांना औपचारिक शिक्षण घेता येत नाही. यामुळे शिक्षणाचा सार्वत्रिक अभाव निर्माण होतो. केवळ शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे असणे पुरेसे नाही, तर तेथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची सत्यता आणि गुणवत्ताही महत्त्वाची आहे. जुनाट अभ्यासक्रम, पारंपरिक शिकवण्याच्या पद्धती, आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी विकसित न करणे यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देशच हरवून जातो. पुस्तकी माहितीचे पाठांतर करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्याचे ज्ञान मिळत नाही. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल साक्षरतेचा अभाव देखील ज्ञानपराङमुखतेला कारणीभूत ठरतो. ज्यांच्याकडे इंटरनेट, संगणक किंवा स्मार्टफोनसारख्या साधनांची उपलब्धता नाही आणि ज्ञानानुमुख अभिवृत्ती नाही ते ज्ञानाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात.
समाजात खोलवर रुजलेल्या काही परंपरा आणि विचारसरणी ज्ञानाच्या प्रसाराला मोठा अडथळा निर्माण करतात. जसे – मुलींना पुरेसे शिक्षण न देणे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि परंपरेचा अतिरेकी अभिमान यामुळे समाजात अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज वाढतात. चमत्कारांवर विश्वास ठेवणे, दैवी शक्तींवर विसंबून राहणे आणि तर्काला फाटा देणे यामुळे वैज्ञानिक ज्ञानाचा स्वीकार केला जात नाही. काही समाज किंवा गट बदल स्वीकारण्यास तयार नसतात. त्यांना त्यांच्या जुन्या विचारसरणीतच सुरक्षित वाटते आणि कोणत्याही नवीन कल्पना किंवा ज्ञानाला ते विरोध करतात. लोकांना अज्ञानी ठेवण्यात काहींचे आर्थिक, सामाजिक हितसंबंध पोसलेले असतात. यामुळे समाजाची प्रगती खुंटते. काही वेळा समाजात ज्ञानालाच धोकादायक, नैतिकतेच्या विरोधात किंवा धार्मिकतेच्या विरोधात मानले जाते. भोंदू बुवा वैज्ञानिक ज्ञानाचा विरोध करतात ते यामुळेच. परंतु अशा विचारांमुळे नवीन ज्ञान मिळवण्यापासून लोक परावृत्त होतात.
आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम ज्ञानार्जनावर होतो. ज्या समाजातील मोठा वर्ग गरिबी, दारिद्र्य आणि पोटापाण्याची समस्या यांच्यासाठी सतत लढत असतो, दारिद्र्यरेषेखाली असतो त्यांना शिक्षणाऐवजी त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे लागते. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी, जास्त किंवा पुरेसे शिकवण्याऐवजी कामावर पाठवले जाते. गरीब देशांमध्ये किंवा समाजांमध्ये त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतो. उच्च शिक्षण, संशोधन आणि विकास यांच्या अभावामुळे समाज मागे राहत्तो. ज्ञानाच्या या पैलूंकडे लोकांचे लक्षही नसते. त्यामुळे नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाही. त्यांची बौद्धिक आत्मनिर्भरता आणि एकंदरित विकास कमी होतो.
सरकारची आणि प्रशासनाची धोरणे देखील ज्ञानपराङमुखतेला कारणीभूत ठरू शकतात. शासनाने शिक्षण, संशोधन आणि ज्ञानप्रसार यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न करणे हे ज्ञानपराङमुखतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्या समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसते, जिथे विचार मांडण्यावर बंधने असतात- तेथे ज्ञानाची वाढ खुंटते. भीतीपोटी लोक नवीन कल्पना मांडण्यास किंवा प्रश्न विचारण्यास कचरतात. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, नियुक्त्यांमध्ये होणारा गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदी यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावतो. ज्ञानाच्या प्रसाराला बाधा येते.
आधुनिक युगात माहितीची उपलब्धता प्रचंड वाढली असली तरी, तिचा गैरवापरही ज्ञानपराङमुखतेला कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली खरी वा खोटी माहिती, अफवा आणि निराधार दावे यामुळे लोक गोंधळतात आणि सत्यासत्यता पडताळण्याची त्यांची क्षमता कमी होते. तात्पुरती आणि वरवरची माहिती वाचण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. व्यक्तीच्या आवडीप्रमाणे वर्गीकृत केलेला एककल्ली माहितीचा ओघ व्यक्तीकडे पाठवला जातो. यामुळे सखोल ज्ञान आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय कमी होत आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्याच विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहतात. याला 'एकाकीकरण' (एको चेम्बर्स) असे म्हणतात. त्यामुळे त्यांचे विचार अधिक संकुचित होतात आणि त्यांना इतर दृष्टिकोन स्वीकारणे कठीण होते. त्यांच्या माहितीपेक्षा व विचारापेक्षा वेगळे काहीतरी अस्तित्वात आहे, हे त्यांच्या ध्यानीमनीसुद्धा नसते.
ज्ञानपराङमुख समाजाचे गंभीर परिणाम
ज्ञानपराङमुखतेचे परिणाम केवळ तात्पुरते नसून, ते संपूर्ण समाज आणि देशाच्या भविष्यावर दूरगामी नकारात्मक प्रभाव टाकतात. यामुळे प्रगती आणि विकासाला खीळ बसते. आर्थिक विकासावरही नकारात्मक परिणाम होतो. ज्ञानाशिवाय नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत नाही, उद्योगांना चालना मिळत नाही आणि उत्पादकतेत वाढ होत नाही. विकासाचे वेगवेगळे मार्ग खुलत नाहीत. यामुळे आर्थिक विकास खुंटतो आणि समाज दारिद्र्यातच राहतो. निरुपयोगी कर्मकांडे, कालबाह्य व्रते, निरर्थक आचार-विचार अशा नको त्या ठिकाणी उगीच खर्च वाढतो. आजचे जग हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आहे. ज्ञानपराङमुख समाज जागतिक स्पर्धेत मागे पडतो. विचार, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान यांसारख्या मानवी विकासाच्या निर्देशांकांमध्ये असा समाज मागे राहतो.
वैज्ञानिक विचारांचा अभाव असल्याने समाजात अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी-परंपरा आणि त्यावर आधारित शोषण वाढते. याचा सर्वाधिक फटका महिला, मुले आणि दुर्बळ घटकांना बसतो. त्यामुळे सामाजिक कलह आणि असहिष्णुता वाढते. अज्ञानामुळे लोकांमध्ये संकुचित विचारसरणी, धर्मांधता, जातीयवाद, प्रादेशिक आणि खुरटलेल्या अस्मिता वाढतात व टोकदार होतात. यामुळे समाजात संघर्ष, द्वेष आणि असहिष्णुता वाढते, सामाजिक सलोखा बिघडतो. अज्ञान आणि बेरोजगारी यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. शिक्षणाच्या अभावी लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. उद्योग, नोकऱ्या निर्माण न झाल्याने बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढते. यामुळे व्यक्तींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल ज्ञानाचा अभाव असल्याने लोक अस्वच्छ वातावरणात राहतात. तसेच अनेक रोगांना बळी पडतात.
शिक्षित आणि जागरूक नागरिक लोकशाहीचा आधारस्तंभ असतात. ज्ञानपराङमुख समाजात लोक अजाणतेपणे किंवा भावनांच्या आहारी जाऊन चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडतात, ते चुकीची धोरणे राबवतात. परिणामी लोकशाही कमकुवत होते. प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी ज्ञान आणि दूरदृष्टी आवश्यक असते. ज्ञानपराङमुख समाजात प्रशासनात अकार्यक्षमता वाढते आणि चुकीच्या धोरणांमुळे आणि धोरणे राबवण्याच्या उणिवांमुळे जनतेला त्रास होतो.
ज्ञानपराङमुखतेवर उपाय
ज्ञानपराङमुखतेच्या या गंभीर चक्रातून बाहेर पडण्यासाठी बहु-आयामी आणि दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रत्येक मुलाला आणि व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन त्याची संधी सर्वांना उपलब्ध होईल याची खात्री करणे, शाळांची संख्या वाढवणे, शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देणे आणि शिक्षणाचे माध्यम स्थानिक भाषेत उपलब्ध करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचे सतत आधुनिकीकरण करीत राहणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी व्यावहारिक कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचारसरणी आणि सृजनशील व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर द्यायला हवा. डिजिटल साक्षरता व प्रगत डिजिटल कौशल्ये हा अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी त्याचे योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. केवळ बालपणातच नव्हे, तर आयुष्यभर शिकण्याची वृत्ती विकसित झाली पाहिजे. प्रौढ साक्षरता कार्यक्रम, प्रौढ शिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षणे आणि ऑनलाइन अभ्यासक्रम यांची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजात मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. मुलांना आणि लोकांना- अनेक बाजू/आयाम असलेले विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास, तर्क करण्यास आणि माहितीची सत्यता पडताळण्यास प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृतीचे सतत पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. गावागावात आणि शहरात सार्वजनिक ग्रंथालये, वाचनालये आणि सामुदायिक अभ्यास केंद्रे स्थापन व्हावेत. ऑडिओबुक्स आणि इतर ई-पुस्तके यांची उपलब्धता आणि उपयोग वाढवण्याविषयी जाणीव निर्माण व्हावी. प्रसारमाध्यमांनी (वृत्तपत्रे, टीव्ही, सोशल मीडिया) ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करावेत. खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कडक नियम, जनजागृती आणि मानसिकता निर्माण करावी. लोकांना इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करावा, योग्य माहिती कशी ओळखावी आणि माहितीचा गैरवापर कसा टाळावा याचे प्रशिक्षण देणे म्हणजेच डिजिटल साक्षरता वाढवणे आवश्यक आहे.
या सर्वांसाठी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती असणे, ही खूप महत्त्वाची आणि कठीण गोष्ट आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना या संबंधीच्या धोरणांची मागणी आपण किती तीव्रतेने करतो? गम्मत म्हणजे लोकप्रतिनिधी यासाठीही असतात हेच मुळी अनेकांना माहीत नसते. सरकारने शिक्षण, संशोधन आणि विकास यासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणून भ्रष्टाचार थांबवणे सुद्धा जरुरीचे आहे. त्यासाठी समाजात नीतिमूल्ये, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे आणि नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण आणि संस्कार महत्त्वाचे आहेत. केवळ सरकारच नव्हे, तर स्वयंसेवी संस्था, समुदाय आणि व्यक्तींनीही ज्ञानप्रसारासाठी पुढाकार घ्यावा. स्थानिक पातळीवर गटचर्चा, कार्यशाळा आणि ज्ञानोत्सव आयोजित करावेत. प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून नवीन गोष्टी शिकण्याची, वाचन करण्याची आणि आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची स्वयं-शिक्षणाची सवय लावायला हवी.
ज्ञानपराङमुख समाज म्हणजे केवळ निरक्षरता नाही, तर ज्ञानाला नाकारण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची एक मानसिकता होय. या समस्येचे मूळ आपल्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत दडलेले आहे. विशिष्ट लोकांना हजारो वर्षे मिळालेला ज्ञानाचा मक्ता या समाजावर प्रदीर्घ परिणाम करून गेला आहे. यावर मात करण्यासाठी शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाचन संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर यासारख्या अनेक स्तरांवर एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती ज्ञानाचे महत्त्व समजून घेईल आणि ते आत्मसात करण्याची इच्छा बाळगेल तेव्हा आपला समाज ज्ञानसंपन्न बनेल. ज्ञान ही केवळ शक्ती नाही, तर तो समाजाला प्रगतीच्या, समृद्धीच्या आणि सौहार्दाच्या दिशेने घेऊन जाणारा तेजोमय दीपस्तंभ आहे. याची ज्योत अखंड तेवत ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
- धनंजय आदित्य.