...तरीही मूल का हसतं?


सर्वच शाळांमध्ये कोणालाही निर्विवादपणे मनापासून आवडणारी सर्वांगसुंदर गोष्ट असते ती म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हसू! ते हसू र्निव्याज असतं... उत्स्फुर्त असतं... प्रामाणिक असतं! त्यात दिखाऊपणा नसतो... बनावटगिरी नसते... कोणताही अंतःस्थ विपरित हेतू नसतो! शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या साऱ्यांनाच या स्वर्गीय हास्याची मूर्तीमंत संपत्ती भरभरून मिळत असते. कोणा बालकाला कालपरवा रागावलं, मारलं, कोणाला हिणवलं, दुखावलं... तरीही दिवस पालटल्यावर म्हणा... किंवा घटिका लोटल्यावर म्हणा... पुन्हा ते मूल फुलासारखं टवटवित बनून, आपलं निखळ हास्य घेऊन स्वतःभोवती नंदनवन साकारीत असतं!

कोणतंही दुःख असो, वेदना असो, घात असो वा आघात असो, हेवेदावे असो की द्वेषमत्सर असो... साऱ्या किल्मिषांना तत्परतेनं बाजुला सारून मुक्त हास्याची उधळण करण्याची दिव्य कला या बालकांना निसर्गतःच बेमालूमपणे साधलेली असते. जन्मतःच टॅहँऽऽ टॅहँऽऽ चा आलाप करीत, रडत आक्रंदत या मर्त्य जगात प्रवेश करणारा बालक आश्चर्यकारकपणे त्याच्या बालपणात मात्र हास्यानं फुललेलं विशाल हृदय घेऊन मनमुराद जगत असतो!

आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदचि अंग आनंदाचे।

या ओळींची स्फूर्ती तुकोबांना बालकांच्या झपूर्झामय हास्यातूनच मिळाली असावी असे हलकेच वाटून जाते!

सुखी, संपन्न, सधनतेत हसणारं, खिदळणारं बालक एकवेळ समजून घेता येईल; पण दुःखी, दारिद्री, विपन्नावस्थेतही मनमोकळेपणे हसणारं बालक बघितलं की या दिलखुलास अविष्काराविषयी मन स्तंभित होऊन जातं! असं हसरं मूल, साजरं फूल शाळेत येतं... कळत न कळत शाळा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते आणि ते शाळेचा अविभाज्य भाग बनतं. शाळा नावाच्या एका विशाल सामाजिक संरचनेमध्ये आपल्या जीवनाचा कच्चा माल ढकलून त्याचं नक्की कोणतं उत्पादन भविष्यात बनवलं जाणार आहे, याविषयी पूर्णपणे बेखबर असलेलं मूल वर्तमानाच्या लहरींवर स्वार होऊन हसत हसत नाचत असतं, बागडत असतं.

कत्तलखान्यात येणाऱ्या जनावरांच्या सुखदुःखाशी, भूत-भविष्याशी कसायाला काही देणं-घेणं नसतं. त्याला आपला धंदा दिसत असतो... तो व्यवहारीपणे नफ्या-तोट्याची आकडेमोड करण्यात मग्न असतो. तसच शाळांच्या बहुतांश संचालकांनाही फक्त त्यांच्या धंद्याचं सैरसुतुक पडलेलं असतं... उठता बसता नफा-तोट्याच्या बेरीज-बजाबाकीत ते मग्न असतात... फी ची वसुली आणि सरकारी अनुदान यांच्या व्युहात धावाधाव करीत आपला मोठ्यात मोठा हिस्सा काढून घेत असतात. एकीकडे बिनापावतीची घसघशीत रोकड लाखान भरुन नोकरी बळकावलेले किंवा दुसरीकडे तोकड्या अथवा भिकारड्या पगारावर स्वतःच्या नशिबाला दोष देत ओढाताण करीत आयुष्य खेचणारे अध्यापकवर्ग शिकवण्याच्या नावावर पाठ्यपुस्तकातील तथाकथित अभ्यासक्रमाच्या पाट्या टाकीत असतात. शिक्षणक्षेत्रातील अधिकारी वर्गाला टेबलावरून-खालून चिरमिरी घेऊन वरकमाई करण्याची नशा चढलेली असते. अशाच प्रकारच्या चाकोरीतून गेलेला अशाच प्रकारच्या मुशीतून घडलेला पालकवर्ग... आपला पाल्य शिकला नाही तरी घवघवीत मार्क घेऊन आला की हर्षवायूने वेडेपिसे होत असतात. आणि त्याच्या विपरित घडलं की कयामतचा दिवस आल्यागत ऊर बडवून घेतात. शिक्षणाचा हा सारा पाताळयंत्री कारोबार कमी पडला असे वाटले की मुलांना शिकवणी नामक चरकात ढकलून त्याची चिपाडं बाहेर काढण्याची सोय बिनदिक्कत करून ठेवतात. येथील व्यवस्थेने व ती राबवणाऱ्या सन्माननीय कथित महामानवांनी साकारलेल्या सापळ्यानी तथाकथित वैयक्तिक विकासाचा वेगळा पर्याय सहसा ठेवला नसतो. या साऱ्या बजबजपुरीपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्यामुळं बालक मात्र दिलखुलासपणे हसत राहातं.

‘शिक्षण म्हणजे उचित ज्ञानात्मक, बौद्धिक, भावनात्मक आणि सृजनात्मक विकास व त्यातून होणारे वर्तनबदल ’ ही वैश्विक व्याख्या शाळेच्या आवारात वेडगळपणाची, अव्यवहार्य, अतिआदर्शवादी आणि अस्सल पुस्तकी ठरवून धाब्यावर बसवलेली असते. मार्कांच्या मोजपट्टीने शिक्षणाचे फलित मोजण्याची भयानक स्पर्धा चालत असते. त्यातूनच मार्कांची गलेलठ्ठ गाठोडी सांभाळणारी विचारहीन श्वापदे तयार करण्याची अकमहिकाच जणू सुरू असते! विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, सरकार, विचारवंत, नादिष्ट, गप्पीष्ट, टप्पीष्ट... सारेच त्या पट्टीवरुन दौडण्यात व इतरांना दौडवण्यात जीवनाची इतिश्री पावलेपावली साजरी करण्याच्या धुंदीत असतात. मोठ्यांच्या बेगडी शिकवण्यातून धोपटलं जाणारं मूल आपापल्या सवंगड्यांकडून मात्र बरेच काही शिकत राहातं, एक दुसऱ्यांना शिकवत राहातं, असं शिकता शिकता होणाऱ्या उल्हासानं हसत राहातं.

बालकाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्याचे मूलभूत ध्येय शाळेने शासकीय औपचारिकतेत बेमालूमपणे दफन केलेले असते. सर्वांगीण विकासासाठी म्हणायला का होईना सहशालेय नावाच्या बिरुदावलीचे सरधोपट उपक्रम ताटातील लोणच्याच्या प्रमाणात मुलांच्या आयुष्यात शिंपडले जातात. या धबडघाईत बालपण दडपण्याचा, फूलपण ओरबडण्याचा पुरजोर प्रयत्न चोहीकडून होत असतो. पण या साऱ्या कुडबुडींना झुगारून देत मूल जमेल तितकं स्वतः घडत जातं आणि कधी या तर कधी त्या कारणांनी निष्पापपणे हसत राहातं.

ज्याला त्याला आपल्या साच्यातलं मूल घडवायचं असतं... मुलाच्या स्वत्वानुसार घडू द्यायचं नसतं. मग घडवाघडवीची बळजबरी करण्यासाठी साऱ्या धुरीणांचे अड्डे भरतात. शब्दांच्या, विचारांच्या, योजनांच्या फैरी झडत राहातात. मेनूकार्ड नजरेसमोर ठेऊन सुपारी घेतल्यागत कारस्थानं शिजवली जातात. कोणाला आपली संस्कृती लादायची असते, कोणाला आपला धर्म जिरवायचा असतो, कोणाला आपलं तत्वज्ञान ठुसायचं असतं, कोणाला एकली देशभक्ती तर कोणाला शॅविनिझम घुसडायचा असतो. कितीतरी खऱ्याखोट्या, कृत्रिम, बनावट गोष्टी काहीनाकाही गोंडस नावावर घुसवायच्या असतात. त्या साऱ्यांना शाळेच्या आवारात सारं काही हिरवं हिरवं, कोवळं कोवळं दिसत असतं. ते बघून त्यांच्या लवलवणाऱ्या जिभेतून लाळही टपाटपा ठिबकत असते. आपल्याच धुंदीतली कमनीय मूर्ती घडवण्याच्या नादात जो तो आपापल्या लहरीनुसार ठोकाठोक करीत असतो व शेवटी ओबाडधोबड खडक बनला तर नव्या पीढीवर दोषारोपांच्या फैरी झाडतो. या साऱ्या उठाठेवीचं राजकारण अबोध मुलांच्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. हे सारं काही असच चालत असतं, असच चालवायचं असतं अशी समायोजनाची चपखल समजूत करून घेऊन मूल आपल्याच मश्गुल तरंगांवर झुलत झुलत बिनधास्त हसत असतं.

अब्रहम मास्लोचं मानवतावादी मानसशास्त्र (ह्युमॅनेटरीयन सायकालॉजी) सांगतं ‘माणूस मुळातच (बेसिकली) चांगला असतो. तो चांगल्या गोष्टी पटकन शिकतो. वाईट गोष्टी मोठ्या मुश्किलीने शिकतो, विपरित परिस्थितीत शिकतो, नाइलाजानं शिकतो.’ हे मात्र शाळा नामक व्यवस्था खरं करून दाखवत असते. मुलांना बिघडवण्याचे इतके सारे उपद्व्याप करूनही मुले इतकी चांगली कशी निपजतात याचं कोडं मास्लोने बऱ्यापैकी सोडवलय. त्या चांगुलपणाची साक्ष म्हणून की काय मुले बेमालूम हसत राहतात.

मुलांच्या बालपणी खुलेआम चाललेले असे तमाशे, फार्स, सावळेगोंधळ इत्यादी आदळआपट बघून संवेदनशील जाणकरांचं हृदय मात्र पिळवटत राहातं, धाय मोकलून अव्यक्त हुंदक्यांनी घडीघडीला ठेचून निघतं! पण सारं काही आलबेल असं मानून असंवेदनशील जगाचं रहाटगाडगं निबर मनान निर्धास्तपणे फिरतच राहातं! हळूहळू मुलं अचकट धुरीणांच्या विचकट अपेक्षेगत कथितरीत्या परिपक्व, मॅच्युअर होत जातात आणि त्यांच हसणं पायरीपायरीन विरळत जातं; पण तोपर्यंत मात्र ती आपल्याच नादात, अनाकलनीय हास्यात मनसोक्त विहरतच राहातात!!

- धनंजय आदित्य

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!