मानवता, नैतिकता नसलेल्यांच्या हाती विज्ञान देणे समाजाला हानिकारक. भन्ते नागार्जुन यांची गोष्ट.
![]() |
Photo- Wikipedia |
प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे विद्वान शास्त्रज्ञ होऊन गेले. ते म्हातारे झाल्यावर राजाला म्हणाले “राजा ! प्रयोगशाळेच्या कामात बरीच प्रगती झाली आहे. एवढी सर्व कामे मी सांभाळू शकत नाही. तसेच माझ्या कामाचा उत्तराधिकारी मला नेमायचा आहे. त्यामुळे मला माझ्या कामासाठी सहाय्यकाची गरज आहे.”
राजाने नागार्जुनाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि थोडा वेळ विचार केल्यावर राजा म्हणाला “उद्या मी तुमच्याकडे दोन विद्वान, हुशार, कुशल आणि कर्तबगार तरुण पाठवीन. तुम्ही त्यापैकी एकाची तुमचा सहाय्यक म्हणून निवड करावी.”
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तरुण नागार्जुन यांच्याकडे पोहोचले. नागार्जुनने त्याला जवळ बसवले आणि त्याच्या पात्रतेबद्दल व अनुभवाबद्दल विचारले. दोन्ही तरुणांची पात्रता व अनुभव भरपूर होता. आता नागार्जुनसमोर प्रश्न उभा राहिला की त्याने आपला सहाय्यक म्हणून कोणाची निवड करावी?
बराच विचार केल्यावर नागार्जुनने त्या दोघांना एक पदार्थ दिला आणि म्हणाला – “हे काय आहे याबद्दल मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. तुम्ही स्वतः ते ओळखा आणि मग तुमच्या इच्छेनुसार त्याचा उपयोग करून एक उपयोगी औषधी रसायन तयार करा. यानंतर मी ठरवेन की तुम्हा दोघांपैकी कोणाला माझा सहाय्यक आणि उत्तराधिकारी करायचा?”
दोन्ही तरुण तो पदार्थ घेऊन उभे राहिले. तेव्हा नागार्जुन म्हणाले – “ हा पदार्थ घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा. मी दोन दिवसांनी परवा सायंकाळी तुमची वाट पाहीन. घरी जाण्यासाठी तुम्हाला राज्याच्या महामार्गावरून जावे लागेल.”
त्यांचे म्हणणे ऐकून दोघेही तरुण आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की आचार्य त्यांना महामार्गावरून जाण्यास का सांगत आहेत? मात्र त्यांनी आचार्य यांना याबाबत कोणताही प्रश्न विचारला नाही आणि तेथून निघून गेले.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दोन्ही तरुण वेळेवर नागार्जुनकडे पोहोचले. त्यातील एक तरुण खूप आनंदी दिसत होता आणि दुसरा गप्प होता. नागार्जुनने प्रथम त्या आनंदी तरुणाला विचारले, “ तुम्ही ते रसायन तयार केले आहे का?”
त्या तरुणाने लगेच उत्तर दिले – “होय!” मी तो पदार्थ ओळखला आणि त्यापासून एक औषधी रसायन तयार केले.”
त्यावर नागार्जुनाने त्याला विचारले, “काही अडचणी आल्या काय?” त्यावर तो तरुण म्हणाला, "मी वेगाने घरी गेलो. माझ्या आईला ताप होता, वडिलांना पोटदुखी होती आणि माझा भाऊ पडून जखमी झाला होता. तरीही मी रसायन बनवण्याचे काम थांबवले नाही आणि एकाग्रतेने ते पूर्ण केले."
त्यानंतर नागार्जुनने तयार केलेल्या रसायनाची चाचणी केली आणि त्या तरुणाला काही प्रश्न विचारले. तरुणाने अचूक उत्तरे दिली.
तेव्हा नागार्जुनने दुसऱ्या तरुणाला विचारले – “तू तुझे तयार केलेले रसायन का आणले नाहीस?”
तरुणाने उत्तर दिले – “आचार्य! मी रसायने तयार करून आणू शकलो नाही, याचे मला खूप वाईट वाटते. मात्र, तुम्ही मला दिलेला पदार्थ मी ओळखला. त्यापासून तीन-चार औषधी रसायने तयार होऊ शकतात हेही माझ्या लक्षात आले.”
“तरीही तू नवीन रसायन बनवले का नाही?” नागार्जुनने विचारले.
तरुणाने उत्तर दिले – “महोदय, तुमच्या आदेशानुसार मी महामार्गावरून जात असताना एका झाडाखाली एक म्हातारा आजारी माणूस वेदनेने ओरडत आणि पाणी मागत असलेला मला दिसला. त्या वृद्धाची अवस्था मला सहन झाली नाही. मी त्याला उचलून माझ्या घरी नेले. तेथे आमचा एक शेजारी घरावर छताचे काम करीत असतांना खाली पडला. त्याच्या हाताचे हाड तुटले. माझा सगळा वेळ त्यांच्या उपचारात आणि सेवेत गेला. आता ते बरे होत आहेत. त्यामुळेच तुम्ही दिलेल्या पदार्थाचे रसायन मला तयार करता आले नाही. कृपया मला माफ करा व दोन दिवसांची मुदत वाढवून द्या. मी नक्की चांगले रसायन बनवून देईन.”
यावर नागार्जुन हसले आणि दुसऱ्या तरुणाला म्हणाले – “मी तुला माझा सहाय्यक म्हणून नियुक्त करतो.” पहिल्या तरुणाला आश्चर्य वाटले. त्याने राजाकडे तक्रार केली. राजाने दुसऱ्या व्यक्तीसोबत नागार्जुन यांना दरबारात बोलावले.
दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन नागार्जुन राजाला भेटला व सर्व हकीगत सांगितली. तेव्हा राजाने आश्चर्याने विचारले – “आचार्य! रसायने तयार करून आणलेल्या तरुणाऐवजी रसायने तयार करू न शकणाऱ्या तरुणाला तुम्ही तुमचा सहाय्यक म्हणून का नियुक्त केले हे मला अजूनही समजले नाही?”
तेव्हा नागार्जुन म्हणाले – “राजा! ज्या तरुणाने नवीन रसायन बनवले नाही परंतु ते त्याला बनवता येत होते. त्याने मानवता दाखवली व दोन्ही गरजू लोकांची सेवा केली. दोन्ही तरुण त्याच वाटेने गेले, पण एक जण आजारी म्हाताऱ्यावर उपचार करायला थांबला. घरी पोचल्यावर सुद्धा दुसऱ्या माणसाची मदत केली. दुसऱ्या व्यक्तीने त्या आजारी माणसांकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेला. त्याने त्याच्या घरच्या माणसांना सुद्धा आजारात मदत केली नाही. त्यावरून त्याच्यात मानवता हा गुण नाही असे दिसते. अनेक लोक औषधे व रसायने तयार करू शकतात; परंतु सेवाभावी वृत्तीचे मानवतावादी लोक समाजाला आवश्यक आहेत. मानवता हा गुण नसलेल्या माणसांच्या हातात विज्ञान व वैज्ञानिक सुविधा गेल्या तर तो त्यांचा उपयोग निव्वळ पैशांसाठी व स्वार्थासाठी करेल. त्यांच्यामुळे जनतेचे नुकसानच होईल.”
नागार्जुनचे हे अभ्यासपूर्ण आणि शहाणपणाचे बोल ऐकून राजा त्याच्यापुढे श्रद्धेने नतमस्तक झाला.
----====-----
नागार्जुन यांचा कालावधी इ.स. १५० ते त्यांचे निर्वाण इ.स. २५० हा होय. ते भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते, प्रख्यात बौद्ध आचार्य व विद्वान बौद्ध भिक्खू होते. ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते. इतिहासात नागार्जुन नावाचे अजून काही लोक सापडतात.
***
#adinama #nagarjuna #humanity #Science #आदिनामा #नागार्जुन #मानवता #विज्ञान