सामान्य लोकांची असामान्य कृती
२ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि धोरणाचे प्रणेते महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.
हिंसेला नकार -
15 जून 2007 च्या सर्वसाधारण सभेच्या ठराव A/RES/61/271 नुसार महात्मा गांधी यांच्या व अहिंसेच्या स्मरणार्थ मंजूर केला, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा "शिक्षण आणि जनजागृतीसह अहिंसेचा संदेश प्रसारित करण्याचा" एक मार्ग आहे. हा ठराव "अहिंसेच्या तत्त्वाची सार्वत्रिक प्रासंगिकता" आणि "शांतता, सहिष्णुता, समजूतदारपणा व अहिंसेची संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन करतो.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेत ठराव सादर करताना, भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्री आनंद शर्मा म्हणाले की, ठरावाचे व्यापक आणि वैविध्यपूर्ण प्रायोजकत्व हे महात्मा गांधी आणि त्यांच्याबद्दलच्या सार्वत्रिक आदराचे प्रतिबिंब आहे. हा दिवस त्यांच्या तत्वज्ञानाची शाश्वत प्रासंगिकता दर्शवतो. अहिंसा ही मानवजातीच्या समस्या निराकारणाची सर्वात मोठी शक्ती आहे. ती माणसाच्या बुद्धीने तयार केलेल्या विनाशाच्या सर्वात शक्तिशाली शस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे".
महात्मा गांधींचे जीवन आणि नेतृत्व
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे गांधी हे जगभरातील नागरी हक्क आणि सामाजिक बदलांसाठी अहिंसक चळवळींचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात, गांधी जाचक परिस्थितीतही कठीण आणि अजिंक्य आव्हानांना तोंड देत अहिंसेवर वचनबद्ध राहिले.
गांधीजींची कृती 1930 च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहा प्रमाणेच ब्रिटीश कायद्याच्या मोठ्या सविनय कायदेभंग आंदोलनास प्रोत्साहन देणारी ठरली. त्याच्या मते शांततामय समाज साधण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्याचा प्रयत्न करणे तर्कहीन आहे. त्यांचा असा विश्वास होता की भारतीयांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंसा किंवा द्वेषाचा वापर करू नये.
अहिंसेची व्याख्या
अहिंसेच्या तत्वाला अहिंसक प्रतिकार देखील म्हणतात. अर्थात सामाजिक किंवा राजकीय बदल साध्य करण्यासाठी शारीरिक हिंसेचा वापर नाकारणे. याचे "सामान्य लोकांचे राजकारण" (the politics of ordinary people) असे अनेकदा वर्णन केले जाते, सामाजिक संघर्षाचे हे स्वरूप सामाजिक न्यायाच्या मोहिमांमध्ये जगभरात मोठ्या संख्येने स्वीकारले आहे.
अहिंसक प्रतिकारावरील अग्रगण्य विद्वान प्रोफेसर जीन शार्प हे त्यांच्या- अहिंसक कृतीचे राजकारण (The Politics of Nonviolent Action) या पुस्तकात अहिंसेची खालील व्याख्या करतात:
"अहिंसक कृती हे एक तंत्र आहे ज्याद्वारे जे लोक निष्क्रियता आणि समर्पण नाकारतात. ज्यांना संघर्ष आवश्यक आहे असे वाटते, ते हिंसेशिवाय संघर्ष करू शकतात. अहिंसक कृती म्हणजे संघर्ष टाळण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नाही. हा समस्येला केलेला एक प्रतिकार आहे. राजकारणात प्रभावीपणे कार्य करणे, विशेषत: आपली शक्ती प्रभावीपणे चालवायची याची पद्धती आहे."
अहिंसक प्रतिक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत:
• मोर्चे आणि जागरणांसह निषेध आणि जनतेचे मन वळवणे;
• असहकार; आणि
• अहिंसक हस्तक्षेप, जसे की नाकेबंदी आणि व्यवसाय.
अहिंसा हा वारंवार शांततावादासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जात असताना, विसाव्या शतकाच्या मध्यापासून अहिंसा हा शब्द सामाजिक बदलासाठी अनेक चळवळींनी स्वीकारला आहे.
अहिंसेचा एक महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की राज्यकर्त्यांची शक्ती लोकसंख्येच्या संमतीवर अवलंबून असते आणि म्हणून अहिंसा जनतेची संमती आणि सहकार्य सोबत घेऊन अशा अन्यायी राजकीय शक्तीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करते.
युनेस्कोच्या साईट वरील "जागतिक शांतता दिना'' निमित्त लेखाचे मराठी रुपांतर.
===X===