मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची चांगली पद्धत कोणती?

फोटो- विकिमेडीया कॉमन्स 

जगभरात मृत्युनंतर मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. या पद्धतीं धार्मिक, सांस्कृतिक, आणि प्रादेशिक परंपरां यावरून तयार झाल्या असतात. जगात प्रचलित असलेल्या अंत्यसंस्काराच्या काही प्रमुख पद्धती आपण येथे पाहणार आहोत. त्यापैकी कोणती पद्धत चांगली व अनुकरण करण्याजोगी आहे, याचाही विचार करायचा आहे. परंतु अंत्यसंस्काराच्या पद्धती धर्माला जोडून असल्यामुळे लोक यावर काय भूमिका घेतील हेही महत्त्वाचे आहे.

दहन (Cremation) अर्थात मृतदेहाला जाळण्याची पद्धत हिंदू, बौद्ध, आणि शीख धर्मात प्रचलित आहे. देह पूर्णपणे जाळल्यावर शरीराची राख नदीत विसर्जित केली जाते किंवा विशेषत: राखेसाठी ठरवलेल्या खास ठिकाणी ठेवली जाते. या पद्धतीत शरीराचे जलद विघटन होते. अंत्यसंस्काराची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते. शरीरातील अनेक जंतू या प्रक्रियेत नष्ट होतात. यामुळे कोरोनाच्या काळात मृत रुग्णाच्या शरीराचे दहन केले जात होते. काही जण राखेला विशेष स्मारकात ठेवतात किंवा विशेष ठिकाणी विसर्जित करतात. या प्रकारात जागेची बचत होते, एकाच ठिकाणी अनेक मृतदेहाचे दहन करता येते. देह पुरण्यासाठी जमीन लागत नाही. तथापि पर्यावरणावर वाईट परिणाम होतात. मृतदेह जळल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. देह जाळण्यासाठी लाकडे लागतात, त्यामुळे वृक्षांची हानी होते.

काही समाजात मृतदेहाला जमिनीत पुरण्याची (Burial) पद्धत आहे. इस्लाम, ख्रिश्चन, यहूदी, आणि काही हिंदू समाजात ही पद्धत प्रचलित आहे. मृतदेह साध्या कपड्यात किंवा कफनात गुंडाळून किंवा शवपेटीत ठेऊन पुरला जातो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या अनुषंगाने ही पद्धत सुरु आहे. मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी मृत्यूच्या तारखेस किंवा इतर दिवशी स्मृतिदिन पाळला जाऊ शकतो. या पद्धतीसाठी जागेची मोठी आवश्यकता असते. विशेषतः शहरी भागात मृतदेह पुरण्यासाठी जागेची टंचाई असते. या प्रकारात मृतदेहाचे विघटन खूप हळू होते, त्यामुळे काही काळ तरी त्या जागेचा पुनर्वापर करणे अवघड होते. यात जमीनीचे प्रदूषण होण्याची शक्यता असते.

काही ठिकाणी मृतदेह अधिक काळ टिकावे यासाठी त्यांना रासायनिक द्रव्यांनी संरक्षित केले जाते. या पद्धतीला विलिनता (Embalming) असे म्हणतात. ही पद्धती प्रामुख्याने अमेरिकेत, ख्रिश्चन समाजात वापरली जाते. यात मृतदेहाचे संरक्षण करण्याची क्षमता जास्त काळ टिकते, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पुरेसा वेळ मिळतो. मृतदेहाला अंतिम दर्शनासाठी अधिक काळ टिकवता येते. या प्रक्रियेमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर होतो. ते पदार्थ पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात. याला खर्च जास्त असतो. मृत शरीराच्या नैसर्गिक विघटनाला अडथळा येतो.

तिबेट आणि मंगोलिया सारख्या प्रदेशात मृतदेहाला विशिष्ट ठिकाणी ठेऊन पक्ष्यांच्या हवाली केले जाते. या पद्धतीला आकाश दफन (Sky Burial) असे म्हटले जाते. पारशी लोकांमध्ये देखील ही पद्धती वापरली जाते. ही एक पर्यावरणपूरक पद्धत मानली जाते. यात मृतदेहाचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होते. ही एक धार्मिक पद्धत म्हणून मान्य आहे. यात जागेची बचतही होते. मात्र या पद्धतीला व्यापक मान्यता नाही. ही पद्धत काही ठराविक प्रदेशात आणि समाजातच मान्य आहे. जिथे शिकार करणारे पक्षी नाहीत तिथे ही पद्धत अमलात आणणे शक्य होत नाही.

मृतदेहाला नदीच्या किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जित करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी प्रचलित होती. याला जलसमाधी (Water Burial) असे म्हणतात. युरोपात नॉर्डिक देशांमध्ये, तिबेटच्या भागात ही प्रथा आहे. भारतात उत्तरेस गंगा नदीत मृतदेह अर्पण करण्याची पद्धती होती. काही समाजांमध्ये याला धार्मिक मान्यता आहे. यात निसर्गाचा देह निसर्गाला म्हणजे पाण्याला आणि पाण्यातील जीवांना अर्पण करण्यात येतो. या पद्धतीत मृतदेहाचे व्यवस्थापन साधे आणि कमी खर्चिक असते. तथापि यात जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. काही जलाशयांमध्ये ही पद्धत पर्यावरणीय दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकते. तसेच काही ठिकाणी कायदेशीर मर्यादा असल्यास ही पद्धत वापरता येत नाही.

रसायनांचा वापर करून मृतदेह द्रव रूपात विघटित केला जातो. त्यानंतर इतर सोपस्कार केले जातात. याला अल्कली हायड्रोलिसिस (Alkaline Hydrolysis) किंवा "अ‍ॅक्वामेशन" असेही म्हणतात. यात रासायनिक अवशेष आणि उत्सर्जन कमी होते. म्हणून ही पद्धत पर्यावरणपूरकही मानतात. मृतदेहाचे निराकरण अधिक जलद आणि स्वच्छ पद्धतीने होते. राहिलेल्या जैविक अवशेषांचा पुनर्वापर करता येतो. परंतु ही पद्धत सर्वत्र उपलब्ध नाही. मात्र अलीकडे ती प्रचलित होत आहे. पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ती खर्चिक असू शकते.

फ्रीजिंग (Cryonics) ही अलीकडील नवीन पद्धती आहे. या पद्धतीमध्ये मृतदेहाला भविष्यकाळात तंत्रज्ञानाच्या मदतीने (शक्य झाल्यास) पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने फ्रीज करून ठेवले जाते. यात भविष्यकाळात पुन्हा जिवंत करण्याच्या आशेने मृतदेहाची अखंडता जतन केली जाते. काहींना यात वैयक्तिकरित्या अधिक समाधान मिळते. तथापि ही पद्धत अत्यंत खर्चिक आहे व साधारण लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. या पद्धतीतील यशाबद्दल म्हणजे मृतदेह जिवंत करण्याच्या उद्देशाबद्दल शास्त्रीय प्रमाण आणि ठोस पुरावे नाहीत. तसेच यात नैतिक व कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

प्रोमेशन (Promession) ही अंत्यसंस्काराची, मानवी अवशेषांची विल्हेवाट लावण्याची एक नवी पद्धत आहे यात शरीराला भुकटीत/ पावडरमध्ये रुपांतरीत करण्यासाठी फ्रीझ-ड्रायिंग तंत्रज्ञान वापरले जाते. दहनाच्या तापमानापेक्षा कमी तापमानाचा वापर करून शरीरातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यात येते. स्वीडिश जीवशास्त्रज्ञ Susanne Wiigh-Mäsak यांनी 1990 च्या उत्तरार्धात ही संकल्पना विकसित केली आणि "प्रॉमिस" (प्रोमेसा) या इटालियन शब्दावरून प्रोमेशन हे नाव दिले. विशिष्ट पद्धती वापरून मृतदेहाची भुकटी/ पावडर तयार करून छोट्या पण जैव-विघटनकारक (biodegradable ) पेटीमध्ये ठेवून मातीत पुरले जाते. काही महिन्यांत, ती पेटी आणि त्यातील सामग्री कंपोस्टमध्ये विघटित होते आणि मातीमध्ये मिसळून जाते. ही पर्यावरणपूरक पद्धत आहे. यात विघटनाची प्रक्रिया वेगाने होते. तसेच अत्यंत कमी जागेची आवश्यकता असते. ही नवीन आणि कमी प्रचलित पद्धत असल्याने सर्वत्र उपलब्ध नाही. ती पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत जास्त खर्चिक आहे.

नैसर्गिक दफन अर्थात प्राकृतिक अंत्यसंस्कार (Natural Burial) या पद्धतीत मृतदेहामध्ये कमीत-कमी हस्तक्षेप करून पर्यावरणपूरक पद्धतीने पुरले जाते. हा प्रकार म्हणजे प्राचीन दफन विधींचा आधुनिक अवतार मानला जातो. यात मृतदेहाला सुशोभित केले जात नाही, एम्बॅल्मिंग केले जात नाही. मृतदेहाला घातलेले कपडे हे नैसर्गिक धाग्यांनी बनलेले असतात. यात बायोडिग्रेडेबल नसलेल्या वस्तू वापरल्या जात नाहीत. रासायनिक प्रक्रिया न केलेली मऊ लाकडाची शवपेटी वापरली जाते. दफन करण्याची जागा सेंद्रियदृष्ट्या सक्रिय मातीने भरलेली असते. दफनानंतर मृत शरीरातील सर्व घटक हळूहळू विघटीत होतात आणि आसपासच्या माती आणि वनस्पतींद्वारे शोषले जातात. ही पर्यावरणपूरक पद्धत आहे, कारण मृतदेहाचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होते, यात रासायनिक पदार्थांचा वापर टाळला जातो, अंत्यसंस्कारासाठी साधनसामग्री कमी लागते. परंतु शहरी भागात जागेची उपलब्धता कमी असल्यामुळे ही पद्धत अंमलात आणणे कठीण होते.

वरील सर्व पद्धतीपेक्षा अलीकडे वैद्यकीय संस्थांना, इस्पितळांना मृतदेह दान करण्याची किंवा मृतदेहातील काही अवयव दान करण्याची पद्धत जगात सर्वत्र वाढते आहे. या पद्धतीत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना काहीही खर्च येत नाही. दान केलेल्या मृत देहाचे वेगवेगळे अवयव गरजू व्यक्तींसाठी वापरले जातात. ते अवयव वापरणाऱ्यांच्या माध्यमातून मृत व्यक्ती वेगळ्या अर्थाने पुन्हा जीवन जगात असते. देहदानाचे बरेच फायदे आहेत; परंतु ही प्रथा रुजवण्यात अडथळे सुद्धा अनेक आहेत. आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी अंधश्रद्धाळू कल्पनांमुळे आणि त्यांच्याशी संबंधित कालबाह्य रूढी व परंपरा यामुळे देहदानाची किंवा अवयव दानाची पद्धती वापरण्यास लोक कचरतात. मृत्युनंतरचे देहदान आणि अवयवदान (Organ Donation) हे दोन्ही अत्यंत महत्वपूर्ण आणि मानवतेला लाभदायक उपक्रम आहेत. यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते, आणि संशोधनासाठी देखील महत्त्वपूर्ण मदत होते. याबद्दल सविस्तर माहिती पुढील लेखात घेऊ या.

- धनंजय आदित्य

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!