Thursday, 11 January 2018

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!

अलीकडे शिक्षणमंत्री हे जोकरगिरी सुद्धा करतात असे दिसून येत आहे. अलीकडेच राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी असेच एक विधान करून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूर येथील राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसाच्या निमित्त ८ जानेवारी २०१८ रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध न्यूटनच्या हजार वर्षे आधी वराहमिहीर या भारतीय शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे अभ्यासक्रमात न्यूटनच्या जागी ब्रह्मगुप्ताचे नाव लिहायला पाहिजे.” वृत्तपत्रांनी त्यांचे हे म्हणणे “वादग्रस्त विधान” म्हणून प्रकाशित केले, यातच त्यांच्या विधानाचा फोलपणा दिसून आला.
.
वासुदेव देवनानी यांचा हा काही पहिलाच बाष्कळपणा नव्हे. याआधी सुद्धा बेताल विधाने करून ते प्रकाशझोतात येत राहिले. बरोबर एक वर्षापूर्वी त्यांनी गायीच्या संदर्भात बेफाम विधान करून स्वतःचे हसू करून घेतले होते. गाय ही एकमेव अशी प्राणी आहे की जी प्राणवायू घेते व प्राणवायूच सोडते, असे तारे त्यांनी राजस्थानमधील हिंगोनिया गाय पुनर्वसन केंद्रातील भाषणात तोडले होते. एवढ्यावरच ते थांबले नाही तर गायीच्या शेणामुळे किरणोत्सार निष्प्रभ होतात असेही त्यांनी ठोकून दिले होते. किरणोत्सर थांबवण्यासाठी लोखंड, शिसे, कॉन्क्रीट असे जड पदार्थ आवश्यक असतात, पण गायीच्या शेणात नायट्रोजन, कार्बन, फोस्फारस अशी हलकी द्रव्ये असतात- ही गोष्ट इंजिनिअर असलेल्या या मंत्रीमहोदयांना समजू नये, याविषयी सर्व स्तरावर सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. 
.
भारतीय पाठ्यपुस्तकातून पायथागोरस, न्यूटन यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशा आशयाचे विधान सुमारे दोन वर्षांपूर्वी करून त्यांनी धमाल उडवून दिली होती. तज्ञांच्या मते न्यूटनचे कार्य इतके महान आहे की त्याला वगळून जगात कोणालाच भौतिकशास्त्र शिकता येणार नाही आणि शिकवतासुद्धा येणार नाही. पायथागोरसची कथामात्र वेगळी आहे. पायथागोरस हे ब्रह्मगुप्ताच्या सुमारे एक हजार वर्षे आधी होऊन गेले होते. त्यांच्या काही सिद्धांतांचे विश्लेषण ब्रह्मगुप्त यांनी केले आहे असे म्हणतात.
.
सध्याच्या त्यांच्या विधानाचा परामर्श घेताना गुरुत्वाकर्षणाचा इतिहास थोडक्यात बघणे उचित ठरेल. पृथ्वीकडे एखादी वस्तू आकर्षित होते त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात, ही गुरुत्वाकर्षणाची अपूर्ण किंवा चुकीची व्याख्या आहे. वस्तुमान असलेल्या प्रत्येक वस्तूच्या ठायी व त्या वस्तूच्या गुरुत्वाकडे जे आकर्षण बल असते त्याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 
.
वर असलेली, फेकलेली वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होते ही गोष्ट अतिशय प्राचीन काळापासून मानवास अनुभवाने माहीत होती. इसवी सन ३०० दरम्यान होऊन गेलेला ग्रीक तत्वज्ञ आरिसस्टोटल यानेही पृथ्वीकडे वस्तू आकर्षिल्या जातात याचे कारण असलेल्या बलाचे प्रतिपादन केले होते. पण पृथ्वी हे विश्वाचे केंद्र मानून (सूर्यासहित आकाशातील ग्रहगोल व पृथ्वीभोवती फिरतात, असे मानून) आकाशातील सर्वच वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात असे त्यांचे म्हणणे होते. युरोपवर अधिसत्ता गाजवलेल्या दुसऱ्या शतकातील क्लोडियस टोलेमी याचे सिद्धांतसुद्धा पृथ्वीकेंद्रित होते. त्या सिद्धांतावर आता कोणीही विश्वास ठेवत नाही. 
.
आर्यभट्टानेसुद्धा पृथ्वीकेंद्रित गुरुत्वबाळाचे प्रतिपादन केले होते. प्रकाशित लेखांनुसार ब्रह्मगुप्त यांनीसुद्धा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत मान्य केला होता. ब्रह्मस्फुटसिद्धांत या ग्रंथात ब्रह्मगुप्त म्हणतात,”शरीर जमिनीवर पडते कारण त्याला जमीन आपल्याकडे आकर्षित करते. ज्याप्रमाणे वाहून नेणे हा पाण्याचा गुण आहे त्याप्रमाणे आकर्षित करणे हा जमिनीचा गुण आहे.” (श्लोक ६२८ इंग्रजीतून अनुवादित) यावरून त्यांनी फक्त मोघमपणे आकर्षणाचे वर्णन केले होते. ब्राह्मगुप्ताच्या कार्याला व अभ्यासाला अनेक मर्यादा होत्या, हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच शून्य भागिले शून्य बरोबर शून्य असे गणित त्यांनी मांडले होते. ऋण संख्यांचा शोध ब्रह्मगुप्तांनी लावल्याचे काही जण सांगतात. तथापि ऋण संख्यांचा उपयोग इसवी सन पूर्व काळात चीनमध्ये विकसित झालेल्या ‘गणितीय कला’ या पुस्तकातही केलेला आहे.
.
बाराव्या शतकातील गणिततज्ञ भास्कराचार्य यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याचे आधी म्हटले जाई. त्यांनी त्यांच्या सिद्धांतशिरोमणी नावाच्या ग्रंथात आकाशातील ग्रहगोल किंवा पृथ्वीकडे आकर्षित होतात असे म्हटले आहे. त्यावरून गुरुत्वाकर्षणाचे श्रेय त्यांना द्यायचे असा खल पुराणपंथीयांकडून केला जात असे. कर्नाटकातील सह्याद्रीच्या खोऱ्यात जन्मलेला हा शास्त्रज्ञ राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांना रुचला नसावा. त्यामुळे त्यांनी राजस्थानातील ब्रह्मगुप्त यांचे नाव राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी समोर केले असावे.
.
सोळाव्या शतकातील गलिलिओ, ब्राहे, केप्लर यांनी सूर्यकेंद्रित ग्राहमालेची कल्पना मांडली. त्यानंतर सर्वच आकाशीय गोलांमध्ये आकर्षण असते ही गोष्ट समोर येऊ लागली. न्यूटनने गलिलिओ, ब्राहे, केप्लर यांच्या प्रतीपादानाचे विश्लेषण गणितीय आधारावर केले. फक्त पृथ्वीच नाही तर सर्व वस्तूमध्ये आकर्षणबल असते याचा शोध लावला. विश्वात ज्या ज्या ठिकाणी वस्तुमान असते त्या त्या ठिकाणी आकर्षणबल असते, त्याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. गुरुत्वाकर्षण फक्त पृथ्वीकडेच असते असे नव्हे. म्हणून न्यूटनच्या सिद्धांताला गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत असे म्हटले जाते. न्यूटनने त्याची सूत्रे तयार केली, त्याचे सिद्धांत सुद्धा मांडले. असे कार्य त्याआधी कोणीही केले नव्हते. त्यामुळे जगभर त्याला या शोधांचे श्रेय देण्यात येते. पुढे या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला अल्बर्ट आईनस्ताईन यांनी सापेक्षतावादाची जोड देऊन त्याचा अधिक विकास केला.
.
भारतीय इतिहासात ब्रह्मगुप्त यांचे स्थान निश्चितच गौरवास्पद आहे. इसवी सन ५९८ ते ६६८ दरम्यान होऊन गेलेले ते एक महान गणिततज्ञ आणि खगोलतज्ञ होते. शून्याचे अंकाच्या स्वरूपातील स्थान, ऋण संख्यांवरील गणिते, गणिती सिद्धांतांचे खगोलशास्त्रात उपयोजन, चक्रीय वर्तुळाचे क्षेत्रफळ, पायचे अंदाजे मूल्य (१.१६, वास्तविक १.१४), त्रिकोणमितीतील काही सूत्रे इत्यादीविषयी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा व त्यांच्या कार्याचा समावेश अभ्यासक्रमात नक्कीच करण्यात यावा. 
.
तथापि, अतिरेकी राष्ट्रवादाच्या आततायी भूमिकेतून चुकीच्या गोष्टी मांडल्या जाऊ नयेत. अन्यथा विज्ञानाचा विकास कसकसा होत गेला हे विद्यार्थ्यांना कळणार नाही व विज्ञान विकासाची अंतर्दृष्टी निर्माण होणार नाही. वैज्ञानिक दृष्टीकोण अधिकाधिक विकसित होण्यासाठी विज्ञानाचा इतिहास ज्ञात होणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा आपण विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नावावर काहीबाही शिकवतो त्यामुळे जगात आपली व आपल्या शिक्षणाची बदनामी होत राहील. जे शोध आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी लावले नाहीत त्यावर आधारित गोष्टी वापरायच्या नाहीत, असे आपण करत नाहीत. विज्ञानाच्या बाबतीत आपण देशाच्या, धर्माच्या भिंती सहजपणे पार करून जातो. “वसुधैव कुटुंबकम” हे ब्रीद वास्तवात आणण्यासाठी विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोण यांच्याशिवाय पर्याय नाही. असे मानवीय विज्ञानयुग ज्यांनी आपल्याला दिले त्या सर्व शास्त्रज्ञ व संशोधक यांच्या बौद्धिक संपदेचा उचित सन्मान व्हायला पाहिजे.
.
भारतात उदयास आलेले ज्ञान नंतरच्या काळात विशिष्ट वर्णाच्या, विशिष्ट जातीच्या दावणीत बंदिस्त कारण्यात आले. वर्ण व जात यांच्या उतरंडीतील खालच्या लोकांना ज्ञानाचा अधिकार नाकारण्यात आला. त्यामुळे एकेकाळी आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, चरक, सुश्रुत इत्यादी महान संशोधकांना निर्माण करणारा हा देश जगात मागे पडला. हे सुद्धा लहान-मोठ्यांना शिकवणे आवश्यक आहे. #adinama
- धनंजय आदित्य