Saturday, 30 December 2017

इतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्याची साक्षीदार “पौष पौर्णिमा”


भारतात व जगात पौष पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण व उत्सव म्हणून पाळला जातो. या दिवशी मगध गणराज्याचे राजे बिम्बिसार यांनी त्यांच्या प्रजेसह घेतलेली धम्मदीक्षा, तथागत बुद्धाची श्रीलंकेला भेट इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत. या दिवसाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...

तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर इसवी सन पूर्व ५२७ मध्ये पौष पौर्णिमेच्या दिवशी ते राजा बिम्बिसाराची राजधानी राजगृह येथे गेले. बुद्धाचे आगमन झाल्याचे कळताच राजा बिम्बिसार यांनी राज्यातील अनेक नागरिकांसह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जेष्ठ वनात बुद्धांचे प्रवचन झाले. कर्मकांड त्याग्णारा व मानवतेच्या भल्याचा बुद्धाचा उपदेश बिम्बिसार व त्याच्या प्रजेला अत्यंत आवडला. त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्धार करून तथागतांना त्याविषयी विनंती केली. त्यानंतर बुद्धाने त्यांना व त्याच्या प्रजेला दीक्षा दिली. ही इतिहासातील एवढ्या बहुसंख्येने घेतलेली सर्वात मोठी दीक्षा समजली जाते. या वेळी राजा बिम्बिसारासोबत त्याच्या सव्वा लाख नागरिकांनी दीक्षा घेतली असे उल्लेख आहेत. राजा बिम्बिसारामुळे बुद्धांच्या विचारांना पहिल्यांदा राजाश्रय मिळाला होता.(फोटो-राजा बिम्बिसार आणि गौतम बुद्ध यांची भेट. हस्तिदंतावर कोरलेले दृश्य. सौजन्य- विकीपेडिया.)
.

सामूहिक दीक्षा कार्यक्रमानंतर बिम्बिसाराने बुद्धांना भोजनाचे निमंत्रण दिले. राजाच्या महालात भिक्षुसंघासह बुद्धांनी भोजन घेतले. स्वतः राजा बिम्बिसार यांनीसुद्धा भोजन वाढले. भोजनानंतर झालेल्या चर्चेत “मगध देशात बुद्धांनी कोठे निवास करावा” याविषयी विचारविनिमय झाला. ती जागा प्रवासी, येणारे-जाणारे, नागरिक यांच्या सोयीची असावी, नगरपासून फार लांब नसावी इत्यादी दृष्टीने वेळूवन ही जागा योग्य ठरली. त्यामुळे राजा बिम्बिसार याने या पौष पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध संघाला ती जागा दान केली. तेथे भव्य स्तूप-विहार बांधण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच दरवर्षी तेथे पौष पौर्णिमेला उत्सव साजरा केला जाऊ लागला.
.
ज्ञानप्राप्तीनंतर उरुवेला बंधूंना दीक्षा दिल्यावर गौतम बुद्ध पौष पौर्णिमेला श्रीलंकेत गेले होते व या दिवशी त्यांनी महियांगण येथे उपदेश दिला अशी कथा महावंस या ग्रंथात आली आहे. त्या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे केस ठेवलेला “महियांगण राजा महाविहार” नावाचा स्तूप बांधण्यात आला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अर्हंत साराभू थेरा यांनी बुद्धांच्या अस्थी आणवल्या आणि या विहाराचे विस्तारीकरण करून तेथे ठेवल्या. सध्या या स्तुपाला राष्ट्रीय पुरातत्व स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कथेला अनुसरून पौष पौर्णिमेला उरुथी पोया हा सण तेथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
.
तथापि बुद्धांच्या या श्रीलंका भेटीविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली असून ती कथा काल्पनिक आहे असे म्हटले आहे. श्रीलंकेतील महावंसपेक्षा दीपवंस हा ग्रंथ जास्त खात्रीलायक असून त्यात व इतरत्र बुद्धाच्या या भेटीचा उल्लेख नाही असे म्हटले जाते. तरीही पौष पौर्णिमा हा दिवस उरुथी पोया म्हणून तेथे देशभर उत्साहाने साजरा केला जातो, हे वास्तव नाकारता येणार नाही. तेथे वेसाक पौर्णिमेनंतर उरुथी पोया हा दुसऱ्या क्रमांकाचा सण मानला जातो.
.
पौष पौर्णिमेपासून सामान्यतः महायान देशांत नवे वर्ष सुरू होत असते. तथापि हे नववर्ष काहींच्या बाबतीत वेगवेगळे असते. चीन, कोरिया येथे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला नववर्ष सुरू होते, तर तिबेटी नववर्ष त्यानंतर एक महिन्याने सुरू होते.
.
पौष हा भारतीय वर्षातील दहावा महिना. भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे या महिन्याला धनु किंवा धनूस असे म्हणतात. हा महिना डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान येतो. या महिन्यात थंडी बऱ्यापैकी असते; पण ती कमी होऊ लागते. हिवाळा अर्थात हेमंत ऋतूचा दुसरा महिना सुरू असतो. शेतीची कामे वाढलेली असतात. पौष महिन्याच्या काही अंधश्रद्धा सुद्धा या दिवसापासून सुरू होतात. काही लोक या दिवसापासून नदीत पवित्र स्नान घेणे सुरू करतात. त्यामुळे मोक्षप्राप्ती होते असा गैरसमज आहे. तसेच या पौष महिन्यात चांगली कामे सुरू करू नये अशीही अंधश्रद्धा आहे. त्याला काहीही आधार नाही. 
.
इतर सर्व पौर्णिमांप्रमाणे ही पौर्णिमा सुद्धा उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी विहारात विविध कार्यक्रम ठेवले जातात. प्रबोधनात्मक व्याख्याने पण होतात. अनेक लोक जवळपास असलेल्या प्राचीन लेणी वा स्माराकांमध्ये जातात व वंदना आदी कार्यक्रम घेतात. #adinama
-धनंजय आदित्य