Sunday, 31 December 2017

जोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

फुले दांपत्याच्या शाळांमध्ये लेखन, वाचन, गणित, व्याकरण, कथाकथन, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय शिकवले जात. तत्कालीन शिक्षणमंडळाचे अध्यक्ष जॉन वॉर्डन यांनी सुद्धा या शाळांची प्रशंसा केली होती. शाळांसोबतच तरुण विवाहित स्त्रियांचा प्रशिक्षण वर्गही चालवला जायचा असे त्यांनी जाहीर व्याख्यानात सांगितले होते. 
.
तेव्हाचे सरकारी शाळांचे पर्यवेक्षक दादोबा तर्खडकर यांनी १६ ऑक्टोबर १८५१ रोजी मुलींच्या शाळेला भेट देऊन ‘मुलींची प्रगती लक्षणीय होती’ असा अभिप्राय देऊन समाधान व्यक्त केले होते. या शैक्षणिक उपक्रमाची कीर्ती थेट युरोपपर्यंत पोचली होती. फुले दाम्पत्य अत्यंत मोलाचे शैक्षणिक कार्य करीत असल्याचा अभिप्राय गव्हर्नरनी लंडनला कंपनी सरकारकडे कळवला होता. फुले दांम्पत्याच्या कार्याचा गौरव मेजर कँडी यांच्या हस्ते करण्यासाठी १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यात जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला गोविंदराव व सगुणाबाई जातीने हजर होत्या. सरकार तर्फे देण्यात आलेला हा पहिलाच आदर्श शिक्षक पुरस्कार!
.
१२ फेब्रुवारी १८५३ रोजी फुलेंच्या शाळांमधील मुलामुलींची एकत्र जाहीर परीक्षा विश्राम बागेत घेण्यात आली. ती परीक्षा पाहाण्यास सुमारे 3 हजार लोक गोळा झाले होते. परीक्षेसाठी मोठा मंडप घातला होता. अनेक वर्तमानपत्रांनी या परीक्षेच्या बातम्या देऊन कौतुकही केले. अशी जाहीर रीतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगी परीक्षा पुण्यात त्यापूर्वी केंव्हाही झाली नव्हती.  #adinama
-धनंजय आदित्य