Sunday, 31 December 2017

जोतीराव-सावित्रीमाई यांचा गृहत्याग

गोविंदरावांचे जोतीराव व सावित्रीमाईवर मनापासून प्रेम होते. गुणाचा मुलगा व गुणसंपन्न सून मिळाल्याचा त्यांना अभिमान होता. परंतु जोतीराव व सावित्रीमाई यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यामुळे सनातनी धर्ममार्तंड आणि काही स्वकीय यांनी गोविंदरावांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे उपद्व्याप चालविले होते.
.
त्या काळी महिलांनी विशिष्ट कामांव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी उंबरठा ओलांडून घराबाहेर पडणे हे अनिष्ट व अनैतिक समजले जात होते. त्यामुळे बाया बिघडतील अशी भीती पसरविण्यात आली होती. धर्मशास्त्रानुसार स्त्रिया व शूद्र यांना शिक्षण घेण्यास सक्त बंदी होती. अशा परिस्थितीत सावित्रीमाई स्वत: महिला असूनही शिकते, त्यासोबतच मुलींना शिकवायला जाते, त्यामुळे सून बिघडेल, असे जोतीरावांना सांगण्यात येत होते. अशा प्रकारे अधार्मिक कार्य सुरूच ठेवले तर पुढील बेचाळीस पिढ्यांना नरकात जावे लागेल अशी भीतीही घातली जात होती. काही अज्ञानी स्वजातीय लोकांनी सावित्रीमाईंच्या अध्यापनाच्या कार्यामुळे कुळाची अब्रू जात असल्याची आवई उठवली होती.
.
एवढेच नाही तर शेतमळ्यात येऊन गोविंदरावांना काहीबाही सांगणे, दम भरणे, मारामारीची भाषा करणे, टोचून बोलणे, धमकावणे असे प्रकार सुरु झाले होते. तशा मन:स्थितीत त्यांनी जोतीराव व सावित्रीमाई यांना स्त्रीशिक्षण बंद करण्याविषयी समजावून पहिले. पण त्याचा उपयोग झाला नाही. नतद्रष्ट लोकांकडून होणारा त्रास अपरिमित वाढल्याने शेवटी नाईलाजाने त्यांनी जोतीराव व सावित्रीमाई यांना निर्वाणीचा इशारा दिला की, “एकतर शाळा सोडा, नाहीतर घर सोडा.” निदान या टोकाच्या भूमिकेमुळे तरी त्यांचे मन:परिवर्तन होईल आणि किमान सावित्रीमाईंचे घराबाहेर शिकवायला जाणे बंद होईल, असा त्यांचा अंदाज होता. 
.
पण सावित्रीमाई व जोतीरावांचा निर्धार पक्का होता. त्यांनी घर सोडण्याचा पर्याय स्वीकारला. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. स्वत:च्या घरात राहिल्याने निदान निवास व खाण्यापिण्याचा खर्च येत नव्हता. आता सर्वच स्वत: करावे लागणार होते. शिवाय शाळांच्या अडचणी कमी नव्हत्या. पुरोहितशाही त्यांच्यासमोर नित्य नवीनवी संकटे व अडचणी उभ्या करण्यास टपलेलीच होती. त्यातच हे नवे संकट उभे राहिले होते. 
.
तथापि ठाम निर्धाराने जोतीराव अंगावरील कपड्यानिशी व सावित्रीमाई दोन चोळ्यालुगडी घेऊन घरातून बाहेर पडले. जातांना त्यांनी गोविंदरावांना वाकून नमस्कार केला. अशा कठीण परिस्थितीत त्यांचे मित्र उस्मान शेख व त्यांची बहीण फातिमा शेख यांनी त्यांना आपल्या घरात रहायला जागा दिली, कपडे व आवश्यक ती भांडीकुंडी सुद्धा दिली. 
.
घर सोडताना सगुणाबाई परगावी गेल्या होत्या. त्या परत आल्यावर त्यांना खूप वाईट वाटले. गोविंदरावांनी दिलेल्या वस्तू, कपडे, भांडी व धान्य घेवून त्या जोतीरावांकडे भेटायला आल्या. ते सर्व सावित्रीमाईंना दिले व यासोबतच स्वत:च्या कष्टातून मिळवलेली रक्कमही त्यांना देऊ केली.
.
सोन्याला आगीत अधिकच झळाळी येते. त्याप्रमाणे आलेल्या संकटांच्या आगीतून जोतीराव व सावित्रीमाई यांचे व्यक्तिमत्व अधिक झळाळून, चमकून बाहेर येत होते. #adinama
-धनंजय आदित्य