Sunday, 31 December 2017

‘सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य’ या पुस्तकाचे प्रास्ताविकमहात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य पूर्णपणे एकजिनसी व अभिन्न आहे. हे दोन्ही महामानव क्रांतिकारी, अत्त्युच्च व श्रेष्ठतम होते. म्हणूनच आदराने जोती-सावित्री असा उल्लेख करण्यात येतो. भारतीय व जगाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ व अद्वितीय असे आहे. परंतु ज्यांनी अखिल समाजाच्या भल्यासाठी अपरिमित हाल सोसले, ज्यांच्या त्यागाची व कष्टाची फळे आपण आज हक्काने खातो... त्या जोती-सावित्री यांच्याविषयी लोकांना पुरेशी माहितीसुद्धा नाही असे दु:खद चित्र दिसून येते.
.
सावित्रीमाई फुले या मुलींच्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या, मुलींना शिकवायला जातांना त्यांच्यावर प्रतिगामी लोकांनी शेण, दगड फेकले, या एक-दोन मुद्द्यांशिवाय त्यांच्याविषयी जास्तीची माहिती बऱ्याच जणांना नसते, असे आढळून आले. तथापि. सावित्रीमाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य इतके पायाभूत, मोठे व प्रचंड आहे की एका व्यक्तीने इतके कार्य केलेले बघून कोणीही अत्यंत आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. 
.
सावित्रीमाईच्या महान कार्याची परतफेड आपल्याकडून होणे शक्य नाही. तथापि त्यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना समाजात जागी राहावी, त्यांच्या कार्यातून आपणास आदर्श व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे कार्य माहीत होणे आवश्यक आहे. सावित्रीमाई नक्की कोण होत्या, त्यांचे कार्य किती मोठे आहे हे जनतेला समजणे आवश्यक आहे. या पुस्तिकेत त्यांच्या कार्याची संक्षिप्त ओळख करून दिली आहे. खरे तर एका छोट्याशा पुस्तिकेत त्यांच्या कार्याचे लेखन होणार नाही. 
.
ऐतिहासिक विषयावर माहिती मिळवितांना पुरेशी माहिती मिळतेच असे नाही. तरीही या पुस्तिकेत सद्हेतूपूर्वक शक्य तेवढी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि काही उणिवा राहून गेल्या असतील तर तसे कळविल्यास पुढील आवृत्तीत त्या दूर करता येतील. यात वापरलेल्या माहितींचे संदर्भ विस्तारभयास्तव देता येत नाहीत. तथापि पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या यादीत संदर्भ पुस्तकांचा समावेश अधिक माहितीसाठी केला आहे. 
.
या पुस्तकाचे वितरण स्वामित्वहक्क राखून ठेवलेले नाहीत. त्यामुळे लेखकाचे नाव कायम ठेऊन त्याच्या प्रती काढणे, वितरीत करणे, त्याचा पूर्ण व अंशात: भाग मुद्रित करणे, भाषांतरित करणे यास परवानगी देण्यात येत आहे. या पुस्तकाच्या मोबाईल आवृत्तीसोबतच ए-४ आकारात पीडीएफ प्रकाशित करीत आहोत. ए-४ आवृत्ती कॉम्प्युटरच्या प्रिंटर वर सहज छापता येईल.
.
ही पुस्तके कोणालाही नेटवरून डाउनलोड करता येतील. त्याच्या लिंक्स फेसबुकच्या “आदिनामा” व “शिक्षकदिन” या पेजवर देण्यात येत आहेत. या पुस्तकावर वाचकांनी स्वतःचे मनोगत शेवटी दिलेल्या लिंकवरून कळवावे ही विनंती. तसेच या पुस्तकाचा जास्तीत जास्त प्रसार करावा व समाजजागृतीस हातभार लावावा ही विनंती. मोबाईलवर सहज वाचता येईल असे pdf प्रकारातील पुस्तक विनामूल्य डाऊनलोड आणि वितरणासाठी पुढील लिंकवर उपलब्ध आहे- https://goo.gl/V9HQwa  #adinama 
-धनंजय आदित्य.