Monday, 27 November 2017

अंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय

सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य (लेख-३)
======================
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला पुणे व आसपासच्या परिसरात पेशवाईने उच्छाद मांडला होता. जातीभेद, अंधश्रद्धा व सामन्यांचे अपरिमित शोषण यांनी कळस गाठला होता. खालच्या स्तरातील लोकांना अत्यंत हालहाल सहन करून वरिष्ठ जातींच्या दयेवर कसेतरी जगावे लागत होते.
.
आपली सावली सवर्णांवर पडू नये यासाठी शूद्र-अतिशूद्र याना अंग दुमडून चालावे लागे. इतरांना विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधून फिरावे लागे. स्त्री व अस्पृश्य हे समाजातील अत्यंत उपेक्षित घटक होते. अशा परिस्थितीत १८१८ साली भीमा कोरेगावच्या जगप्रसिद्ध युद्धामुळे जातीयवादी व अन्यायकारक पेशवाई संपून पुणे परिसरावर इंग्रजांचे राज्य सुरु झाले होते.
.
इंग्रजांचे राज्य आले तरी येथील जातीयता, भेदाभेद, अंधश्रद्धा संपले नव्हते. उलट अत्यंत चिवटपणे ते समाजाला विळखा घालून पिळत होते. धर्मशास्त्रानुसार स्त्रिया व शूद्र यांना शिक्षण घेण्यास बंदी होती. त्यांना शिकवणे हा गुन्हा होता. त्यांनी शिकणे म्हणजे धर्मद्रोह आणि महापाप मानले जात असे. येथील समाजव्यवस्था त्यांना माणूस म्हणूनही जगू देत नव्हती. त्यांना पशुपेक्षाही हलाखीचे जीवन जगावे लागत होते. अस्पृश्य समाजाला जीवनावश्यक गोष्टीही नाकारण्यात आल्या होत्या. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरायलाही त्यांना बंदी होती. आपली सावलीसुद्धा वरिष्ठ जातीच्या लोकांवर पडू नये याची त्यांना काळजी घ्यावी लागत होती. त्यांनी नवीन कपडे वापरू नयेत, संपत्ती गोळा करु नये, वेदमंत्र ऐकू नयेत म्हणू नयेत इत्यादी बंधने अस्पृश्यांवर होती. किल्ले किंवा मोठे बांधकाम करताना त्याच्या पायात त्यांना चिणून गाडण्यात येई.
.
अज्ञान, दारिद्र्य अशा विकारांनी समाज किडून गेला होता. अशा भयानक व जर्जर अंधारयुगात महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा उदय झाला. त्यांनी एकाहून एक आश्चर्यकारक कार्ये करून महान आदर्श सर्व भारतीयांसमोर ठेवला. त्यांच्या कार्यामुळे भारतात नव्या मानवतावादी युगाचा आरंभ झाला. त्यामुळे जोतीराव हे युगपुरुष ठरतात; तर सावित्रीमाई या युगस्त्री ठरतात. . (क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.