Tuesday, 28 November 2017

जोती-सावित्रीला सगुणाबाईची साउली

(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-६)
======================
सगुणाबाई या जोतीरावांच्या मावस बहीण होत. जोतीराव व सावित्रीबाई यांना घडविण्यात सगुणाबाईचा मोलाचा वाटा होता. सगुणाबाईविषयी सावित्रीबाई काव्यात्मकतेने लिहितात... "मूर्तिमंत जणु | विद्यादेवी || ऱ्हदयी आम्ही | तिला साठवी ||" 
.
त्या पुण्याजवळील धनकवडी गावाच्या पाटलाच्या कन्या. त्यांचे सासरचे नाव सगुणाबाई क्षीरसागर होते. त्यांना अकाली वैधव्य आले होते. त्यांना सासरी व माहेरी कोणी आधार नव्हता. निराधार व कठीण परिस्थितीत त्यांनी जॉन नावाच्या मिशनरी व्यक्तींची मुले सांभाळण्याचे काम पत्करले होते. तेथील सहवासाने त्या अशिक्षित असूनही इंग्रजी बोलणे शिकल्या होत्या.
.
जोतीराव ८-९ महिन्याचे असतांना २५ डिसेंबर १८२७ रोजी त्यांच्या मातोश्री चिमणाबाई यांचे निधन झाले होते. या लहानग्याचे संगोपन कोण करणार, ही चिंता गोविंदरावांना लागली होती. तशा परिस्थितीत ती जबाबदारी सगुणाबाई यांनी स्वत:च्या शिरावर घेतली. त्या पुण्याला गोविंदरावांकडे राहून जोतीरावांचे संगोपन करू लागल्या. जोतीराव प्रेमाने त्यांना आऊ म्हणून हक मारीत असत. इंग्रज अधिकाऱ्याप्रमाणे जोतीरावानी सुद्धा शिकून मोठे कोणीतरी व्हावे असे त्यांना मनोमन वाटे.
.
१९३२ साली जोतीराव पाच वर्षांचे असतांना सगुणाबाईनी गोविंदरावांना त्यांच्या शिक्षणाविषयी प्रवृत्त केले. त्यानुसार गोविंदरावांनी विनायक जोशी नावाच्या एका शिक्षकास जोतीरावांना शिकवण्यास ठेवले होते. त्यानंतर जोतीरावांना मिशनरी शाळेत दाखल करण्यासाठी सगुणाबाईनी गोविंदरावांना तयार केले. त्यामुळे १९३३ साली जोतीरावांना ‘चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन’ या शाळेत दाखल करण्यात आले. 
.
गोविंदराव फुले यांचा हिशेबनीस कृष्णाजी देव याने ‘ब्राह्मणाशिवाय इतरांनी विशेषत: शूद्रांनी शिक्षण घेणे महापाप असते’ असे गोविंदराव यांना काहीबाही सांगून १८३९ साली जोतीरावांना शाळेतून काढून घेण्यास भाग पाडले. यामुळे सगुणाबाईना फार वाईट वाटले. १८४० साली सगुणाबाईंनी मध्यस्थी करून जोतीराव व सावित्रीबाई यांचा विवाह घडवून आणला. लग्नानंतरही शेती-मळ्याच्या कामानंतर मिळालेल्या वेळेत जोतीराव प्रचंड वाचन करीत असत. शिक्षणाच्या ओढीमुळे त्यांचे औपचारिक शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सगुणाबाई यांनी घेतला. त्यांनी गोविंदरावांचे शेजारी गफार मुन्शी बेग व लिजीटसाहेब यांना सांगून गोविंदरावांचे मन जोतीरावांच्या शिक्षणासाठी वळविले. 
.
बुधवार वाड्यातील इंग्रजी शाळा प्रसिद्ध होती. पण त्या शाळेत कलेक्टर किंवा सरकारी एजंट यांच्या सहीशिवाय प्रवेश मिळत नसे. सगुणाबाईंच्या विनंतीवरून गफार मुन्शी बेग यांनी स्वत:चे वजन वापरून कलेक्टरचे शिफारस पत्र आणले. त्यामुळे जोतीरावांचे शिक्षण पुन्हा १८४१ मध्ये सुरू झाले.
.
स्वत:च्या शिक्षणाबरोबरच जोतीराव यांनी सावित्रीबाई व सगुणाबाई यांना शिकवणे सुरू ठेवले होते. त्यानंतर रे. जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल यांनी स्थापन केलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये सावित्रीबाई व यांना अध्यापक प्रशिक्षणासाठी दाखल केले. तेथे प्रवेश-परीक्षा घेतल्यावर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना सरळ तिसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला. १८४७ मध्ये त्यांनी शिक्षक-प्रशिक्षण पूर्ण केले व त्या ट्रेंड मिस्ट्रेस (प्रशिक्षित अध्यापिका) म्हणून तयार झाल्या. भारतातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका म्हणून तयार होण्याचा मान त्यांना मिळाला. सासू आणि सून यांनी एकत्रित पणे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करण्याची ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली घटना असावी.
.
१५ मे १८४८ रोजी सावित्रीबाई व जोतीरावांनी महारवाड्यात अस्पृश्यांसाठी एक शाळा सुरु केली. तेथे शिकवण्याचे काम सगुणाबाईनी आनंदाने स्वीकारले. त्याच्या मोबदल्याची वा पगाराची अपेक्षाही मुळीच ठेवली नाही. उलट जॉन साहेबांकडे काम करून मिळणारे पैसेही जोतीरावांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्या देत असत.
.
संत चोखामेळा मंदिरातही महार-मांग, कुणबी अशां मुलांसाठी शाळा काढली होती. तेथेही त्यांनी शिकवण्याचे काम निरपेक्ष वृत्तीने केले होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि समाजातील अज्ञानामुळे ती शाळा काही दिवसांत बंद पडली. या निमित्ताने शिक्षनंचे महत्त्व पालकांना पटवून देण्याची आत्यंतिक गरज त्यांना जाणवू लागली.
.
विश्रामबाग वाड्यात सरकारतर्फे जोतीराव व सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक शैक्षणिक कार्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रकारे सरकार तर्फे शिक्षण कार्याविषयी भारतीयांचा झालेला तो पहिला सत्कार होता. सत्कारानंतर जोतीराव व सावित्रीबाई यांनी गोविंदराव व सगुणाबाई यांना वाकून नमस्कार केला. हा सत्कार बघून सगुणाबाईस धन्य झाल्यासारखे वाटले. 
.
सावित्रीबाई व जोतीराव यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या अशा या महान विभूतीचे निधन पुण्याजवळ फुरसुंगी येथे कॉलऱ्याच्या साथीत ६ जुलै १८५४ रोजी झाले. त्यामुळे जोतीराव व सावित्रीबाई यांना दु:खाचा मोठा धक्का बसला.
.
जोतीराव व सावित्रीबाई यांना घडविण्यात सगुणाबाईचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे “निर्मिकाचा शोध” हे पुस्तक जोतीरावांनी सगुणाबाईला अर्पण केली आहे. त्या अर्पण-पत्रिकेत जोतीराव लिहितात-

“सातास्वरूप सगुणाबाई भ्र. खंडू क्षीरसागर हिस, तुम्ही मला नुसते जगविलेच नसून माणूस बनविले. दुसऱ्याच्या मुलांवर प्रेम कसे करावे हे मी तुमच्याकडून शिकलो. याबद्दल कृतज्ञतापूर्वक हे पुस्तक तुम्हास ग्रंथकर्त्याने नजर केले असे.
.
सावित्रीबाईनी “आमची आऊ” या कवितेत सगुणाबाईविषयी आपले मनोगत अत्यंत आपुलकीने व्यक्त केले आहे. ते पुढीलप्रमाणे-
.
आमची आऊ | फार कष्टाळू
प्रेमळ होती | होती दयाळू 
सागर वाटे | उथळ क्षणी 
आभाळ ठेंगणे | तिच्याहुनी
आऊ आमच्या | घरी आली 
टाक होऊनी | पहा बैसली 
मूर्तिमंत जणु | विद्यादेवी 
ऱ्हदयी आम्ही | तिला साठवी 
(क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.