Monday, 27 November 2017

सावित्रीमाई लहानपणापासूनच अन्यायाच्या विरोधात

(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-४)
======================
सावित्रीमाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी १८३१ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीमाई या भावंडांत सर्वात मोठ्या होत्या. त्यांना सदूजी, सखाराम व श्रीपती ही तीन धाकटी भावंडे होती.
.
नेवासे पाटील यांच्या घराण्याला थोर ऐतिहासिक परंपरा लाभली होती. देवगिरीचा राजा रामदेवराय यांच्या सैन्यात नेवासे पाटलांचे पूर्वज १३ व्या शतकापासून मानाचे काम करीत होते. शिवशाहीत सुद्धा त्यांना मान्यता मिळाली होती, ती पेशवाई व नंतरही टिकून राहिली.
.
चांगले किंवा विशेष काम करणाऱ्याना राजा किंवा सरकार कडून पारितोषिक म्हणून जमीन वगैरे इनाम दिले जाई. ही इनामदारी नेवासे पाटलांच्या घराण्यात परंपरागत चालत आली होती. गावामध्ये पाटील हे मुख्य अंमलदाराचे महत्त्वाचे पद होते. खंडोजी नेवासे पाटील यांच्याकडे इनामदारी आणि गावाची पाटीलकी ही दोन्ही महत्वाची पदे होती.
.
जातपंचायत बोलावणे, जातीचे व गावाचे तंटे-भांडणे सोडवणे, अपराध्यांना शिक्षा करणे, लोकांच्या अडचणी सोडवणे, अन्नदान करणे इत्यादी कामे खंडोजी नेवासे पाटील करीत असत. अशा परिस्थितीत सावित्रीमाईंचे अनुभव विश्व समृद्ध होत होते. त्यामुळे परोपकार, न्यायदान, निरपेक्षता, जनतेविषयी कणव, नि:पक्षपातीपणा, धाडस, कणखरपणा, करारी वृत्ती इत्यादी गुण त्यांच्यात बालपणीच विकसित होत होते. लहानपणी सावित्रीमाई वडिलांबरोबर शेतात जाणे, शेतीतील कामे करणे, जनावरांची देखभाल करणे, घरी आईला घरकामात, स्वयंपाकात मदत करणे, इत्यादीत आनंदाने पुढाकार घेत असे. मुलां-मुलींबरोबर खेळणे, त्यांची भांडणे सोडविणे हा तिचा आवडता छंद होता. ती धीट व उद्योगी होती. विविध कामे ती आनंदाने व आग्रहाने मागून घेत असे.
.
त्यांना बालपणापसूनच अन्यायाच्या विरोधात चीड होती. एकदा साप एका पक्ष्याची अंडी खात असल्याचे बघून त्यांनी त्या सापाला काठीने ठेचून मारले होते. दुसऱ्या एका प्रसंगात एक लहान मुलगा झेंडूची फुले घेऊन जात होता. त्याच्या हातातून ती फुले दुसरा मोठा मुलगा हिसकावून घेऊ लागला. त्यावेळी सावित्रीबाईंनी मोठ्या मुलाच्या पाठीत जोरदार धपाटा मारुन ती फुले छोट्या मुलास परत केली. यावरुन दुर्बल घटकांच्या विषयी सुद्धा त्यांच्या मनात कळवळा होता हे दिसून येते. (क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.