Monday, 27 November 2017

क्रांतीयुगाची पायाभरणी करणारे फुले दाम्पत्य

सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य (लेख-१)
======================
जोतीराव व सावित्रीबाई यांचे कार्य पायाभरणीचे, समाजाला पहिली चालना देणारे होते. म्हणून ते अतिकठीण होते. त्याला पराकोटीची मेहनत, अतोनात त्रास घ्यावा लागला होता. एकदा ते कार्य सुरु झाल्यावर त्या मार्गावरून जाणाऱ्या इतरांना मात्र तेवढा त्रास झाला नाही, तेवढी मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांच्या वाटेवरून चालणाऱ्या आपणा सर्वाना अनेक गोष्टी त्यांच्या कष्ट व त्यागामुळे आयत्या व विनासायास मिळाल्या आहेत.
.
कित्येक वर्षे असे समजले जात असे की, एक मैल अंतर चार मिनिटापेक्षा कमी वेळेत धावणे मानवाला पूर्णतया अशक्य आहे, ती मानवी क्षमतेच्या पलीकडील बाब आहे. मात्र १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर नावाच्या एका तरुणाने जुनी समजूत तोडण्याची हिम्मत बांधली आणि तीन मिनिटे एकोणसाठ सेकंदात त्याने एक मैल अंतर पार केले. जुन्या समजुतीस तडा घातला. १९६४ मध्ये जिमऱ्हान नावाच्या एका तरुणाने एक मैल अंतर चार मिनिटांच्या आत पार केले. ते काम शक्य आहे हे पटल्यावर नंतर अनेकांनी तितके अंतर चार मिनिटांच्या आत धावून पार केले.
.
२९०२९ फूट उंचीच्या जगातील सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट या हिमालयातील शिखरावर जाणे निव्वळ अशक्यप्राय समजले जात असे. परंतु २९ मे १९५३ रोजी शेरपा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांनी प्रचंड अभ्यास, सराव व मेहनतीने एव्हरेस्ट सर केले. माणूस तेथे पोचू शकतो हे दाखवून दिले. त्यांच्यानंतर मात्र अनेक जणांना एव्हरेस्टवर जाऊन येणे शक्य झाले. 
.
जे लोक पायाभरणी करतात त्याना जास्त कष्ट घ्यावे लागतात. मग ती पायाभरणी एखाद्या इमारतीची असो की एखाद्या समाजकार्याची. एकदा भक्कम पायाभरणी झाली की तिच्यावर इमारत उभारणी करणे सोपे जाते. पेट्रोल-डिझेलवरील गाडी चालू करताना सुरुवातीला जास्त इंधन लागते. पहिल्या गिअरमध्येही जास्त इंधन लागते. एकदा गाडीने वेग घेतला की ती कमी मेहनतीत, तुलनेने कमी इंधनात जास्त चांगली पळते. 
समाजकार्याचेही तसेच आहे. जो एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो त्याला जुनी बंधने, जुन्या समजुती तोडण्यासाठी मोठा लढा द्यावा लागतो, जास्त मेहनत घ्यावी लागते. एकदा ते कार्य पूर्ण झाले की त्यानंतरच्या लोकांना बऱ्याच गोष्टी सोप्या जातात.
.
त्याचप्रमाणे जोतीराव आणि सावित्रीबाई यांच्या आधी भारतीय व्यक्तींनी मुलींच्या शाळा, अस्पृश्यांच्या शाळा, रात्रशाळा, प्रौढांसाठी शाळा काढणे अशक्यप्राय समजले जात असे. स्त्रिया आणि शूद्रांनी शिक्षण घेणे व त्यांना शिक्षण देणे हे अधर्म व पाप समजले जायचे, तेव्हा हे अधर्म व पाप करायला कोण धजणार- अशी परिस्थिती होती. तसेच बालहत्या-प्रतिबंधक-गृह काढणे, विधवांची संघटना तयार करणे, शूद्र महिला मंडळ चालविणे, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह घडवून आणणे, दुसऱ्या जातीच्या मुलाला दत्तक घेणे इत्यादी कार्याची कल्पनाही जोतीराव आणि सावित्रीबाई यांच्याशिवाय इतरांनी करणे शक्य नव्हते. अन्यायग्रस्त व पिचलेल्या बहुजनांसाठी सत्यशोधक समाजासारखी चळवळ राबविणे ही तर अशक्य कोटीतली गोष्ट होती. सावित्रीबाई व जोतीराव यांनी तन-मन-धन व सर्वस्व पणाला लावून अशा अनेक अशक्य वाटणारी कार्ये त्यावेळी केली. बहुजनांना रस्ते तयार करून दिलेत. त्यांच्यानंतर अशा उपक्रमांनी आणि चळवळींनी वेग घेतला आणि समाजाचे रुपरंग बदलवून टाकले.
.
जोतीराव व सावित्रीबाई यांचे कार्य पायाभरणीचे, समाजाला पहिली चालना देणारे होते. म्हणून ते अतिकठीण होते. त्याला पराकोटीची मेहनत, अतोनात त्रास घ्यावा लागला होता. एकदा ते कार्य सुरु झाल्यावर त्या मार्गावरून जाणाऱ्या इतरांना मात्र तेवढा त्रास झाला नाही, तेवढी मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांच्या वाटेवरून चालणाऱ्या आपणा सर्वाना अनेक गोष्टी त्यांच्या कष्ट व त्यागामुळे आयत्या व विनासायास मिळाल्या आहेत. म्हणून आपण त्यांचे आभारी आणि ऋणी असायला हवे. #adinama
-धनंजय आदित्य.