Monday, 27 November 2017

जोतीसावित्री: एका वादळाला दुसऱ्या वादळाची सोबत...

(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-५)
====================== 
त्या काळी मुलींची लग्ने साधारणपणे ६ वर्षांच्या आत तर मुलांची लग्ने १० वर्षांच्या आत होत असत. त्या मानाने सावित्रीबाईंचे लग्नाचे वय उलटून गेले होते. त्यांचे वय नऊ वर्षांचे होऊनही त्यांच्या वडिलांना कोणतेही स्थळ पसंत पडत नव्हते. त्यामुळे मुलीचे काय होणार याची चिंता लक्ष्मीबाईना लागली होती.
.
अशातच पुण्याचे गोविंदराव फुले यांची मावसबहीण सगुणाबाई यांनी गोविंदरावांचा मुलगा जोतीराव यांच्यासाठी सावित्रीमाईचे स्थळ सुचविले. सगुणाबाई यांचे खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरच्यांशी चांगले नाते-संबंध होते. खंडोजी नेवासे पाटील यांनी जोतीरावांना आधी पाहिलेसुद्धा होते. त्यामुळे त्यांनाही लग्नासाठी स्थळ पसंत पडले.
.
त्यावेळच्या रितीरिवाजाप्रमाणे सगुणाबाई, गोविंदराव व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजाराम असे तिघे जण नायगावला आले. पाहताक्षणीच गोविंदरावांना सून पसंत पडली. त्यावेळी वर पक्षाने वधू पक्षाला काही १०० ते ५०० रुपये द्यावे लागत. त्यास व्याज म्हणत. पण असे हुंड्यासारखे देणे घेणे न करता ज्याने त्याने आपआपला मानपान करावा व गोविंदरावांनी गावजेवण द्यावे असे ठरले.
.
त्यानंतर फाल्गुन वद्य पाच शके १७६२ रोजी इ. स. १८४० मध्ये हा विवाह पार पडला. लग्नसोहळा ४ दिवस सुरू होता. नायगावच्या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने लग्नसमारंभास हजार होते. 
.
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. 
.
फुले यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे त्यांचे मूळ गाव. तेथे जोतिरावांचे पणजोबा बलुता होते. पिकाची पहाणी करुन शेतसारा वसूल करण्याचे बलुता काम करीत असे. त्यांची मालमत्ता तेथील गाव-कुळकर्णी यांनी अन्यायाने बळकावली होती. त्यातून वाद निर्माण झाला. अन्यायाच्या विरोधात त्यांना चीड होतीच. त्यामुळे चिडलेल्या पणजोबांनी त्या कुळकर्णीचे मुंडकेच छाटले होते. पण त्यामुळे ते गाव सोडून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावात आले. तेथे त्याना एक मुलगा झाला. त्याचे नाव शेटीबा असे ठेवले. शेटीबा हे पुणे येथे स्थलांतरित झाले. त्यांना तीन मुले होती- राणोजी, कृष्णा आणि गोविंदा. हे फुलांच्या माळा, सजावटी, चटया इत्यादी बनविण्यात निष्णात होते. त्यामुळे पेशव्यांनी त्यांना फुले पुरविण्याचे काम दिले. त्यामुळे लोक त्यांना फुले म्हणू लागले. हेच आडनाव नंतर शेवटपर्यंत राहिले.
.
जोतीराव ८-९ महिन्याचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे २५ डिसेंबर १८२७ रोजी निधन झाले. त्या दरम्यान गोविंदरावांच्या मावस बहिणीचे (सगुणाबाईंचे) सासर व माहेरचे सर्व जण मरण पावल्याने त्यांना आधार म्हणून घरी आणले. राजाराम व जोतीराव यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. सगुणाबाई यांनी जोतीरावांवर महत्त्वाचे संस्कार तर केलेच शिवाय त्यांचे लग्न, शिक्षण, सामाजिक कार्य यात महत्त्वाची भूमिकाही पार पाडली.
.
गोविंदरावांनी १८३२ साली जोतिरावांना घरी शिकवण्यासाठी विनायक जोशी या शिक्षकांना ठेवले होते. जोतिरावांची हुशारी बघून त्यांना शाळेत पाठवण्याचा सल्ला जोशींनी दिला होता.जोतीराव सात वर्षांचे असतांना गोविंदरावांनी त्यांना मराठी शाळेत टाकले. मुळात हुशार असलेल्या जोतीरावांनी ४ वर्षात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी गोविन्दरावांच्या घरी हिशेबानिसाचे काम करणाऱ्या कृष्णा देव यांनी शिक्षणाच्या विरोधात गोविन्दरावांचे कान भरले. त्यामुळे जोतीरावांचे शिक्षण सुटले.
.
१८४० मध्ये जोतीरावांचे लग्न सावित्रीमाई यांच्याशी झाले. एका वादळाला दुसऱ्या वादळाची सोबत मिळाली. दरम्यान जोतीरावांचे वाचन सुरूच होते. त्यातच त्यांनी सावित्रीमाई व आत्या सगुणाबाई यांना शेतात आंब्याच्या झाडाखाली धुळीवर अक्षरे गिरवून शिकवणे सुरू केले. 
.
सगुणाबाई व शेजारी राहणारे गफारबेग मुन्शी आणि मेजर लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने गोविन्दरावांचे मन वळले आणि १८४१ मध्ये जोतीरावांना इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले. वयाच्या २० व्या वर्षी म्हणजे १८४७ साली जोतीराव मैट्रिकची परीक्षा पास झाले. तशातच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर किंग, बुकर टी. वॉशिंगटन इत्यादींची चरित्रे, थोमस पेन्स यांचा ‘राईटस ऑफ मेन’ तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, सर विल्यम जोन्स यांची पुस्तके इत्यादी वाचून काढली.
.  
जोतीरावांना त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राने लग्नात बोलावले. त्याच्या वरातीत ते सर्वांबरोबर चालत असलेले पाहून तेथील वऱ्हाडी मंडळींचा पारा चढला. त्यांनी जोतीरावांना शूद्र संबोधून अपमानित केले. त्यामुळे खजील व अंतर्मुख होऊन ते घरी परतले. या व आजुबाजूच्या घटनांचा सखोल विचार करून समाजातील विषमतेचा बिमोड करून मानवतेची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी पुढील आयुष्य वेचायचे ठरवले. सावित्रीमाई व जोतीरावांनी पुढील सामाजिक कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. (क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.