Monday, 27 November 2017

सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य

सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य (लेख-२)
======================
सावित्रीमाई फुले या मुलींच्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या... इतकीच त्रोटक माहिती आपल्याला दिली जाते. परंतु त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रातील योगदान विविधांगी आणि प्रचंड आहे. सावित्रीमाई फुले यांचे विविध क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान या लेखात संक्षिप्त स्वरुपात देत आहे. या प्रत्येक मुद्द्यांविषयी क्रमाक्रमाने एकेक लेख सविस्तर याच ब्लॉग वर ...

• मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय म्हणजे फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरू केले.
• मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे कार्य स्वीकारून त्यांनी भारतीय महिलांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ केला.
• शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.
• अस्पृश्यांच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या अध्यापिका.
• सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.
• त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.
• त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.
• त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीमाई व जोतिबा यांना जाते.
• पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.
• विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.
• सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.
• शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे याप्रकारचा उपक्रम राबवीत आहे.
• प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. पहिलीपासून इंग्रजी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने अलीकडे सुरु केला आहे.
• विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक केलेले आहे.
• १६-११-१८५२ रोजी फुले दाम्पत्याचा इंग्रज सरकार तर्फे जाहीर सत्कार. सरकार तर्फे आदर्श शिक्षिका म्हणून गौरवलेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
• विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य.
• विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.
• फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
• सावित्रीमाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.
• मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
• आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
• आधुनिक काव्याच्या जनक. (आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुत असल्याचे समजले जाते. परंतु त्यांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित.
• खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.
• अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.
• वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्यानी बाळंतपणही केले. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
• फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.
• विधवांच्या पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी “विधवा पुनर्विवाह सभे”चे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.
• विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस समजला जाणारा मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.
• हुंडाविरहित सामूहिक विवाहाच्या प्रवर्तक.
• रोटीबंदीच्या काळात सर्व-जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक.
• मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.
• विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
• त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
• पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
• १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
• १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरू करण्यास भाग पाडले.
• १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली.
• भारतातील पहिल्या महिला वृत्तपत्र-संपादिका तानुबाई बिर्जे यांना शिकवण्याचे, त्यांच्यात सत्यशोधकी विचार रुजविण्याचे व त्यांना समाजकार्यासाठी तयार करण्याचे बहुमोल कार्य सावित्रीमाई यांनी केले.
• ताराबाई शिंदे यांना पहिल्या स्त्रीवादी लेखिका म्हणून पुढे आणण्याच्या कार्यात सावित्रीमाई यांचा मोलाचा वाट आहे.
• बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
• भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.
• अशा या सावित्रीमाई पुढे अनेकांचे प्रेरणास्थान बनल्या.
-धनंजय आदित्य.