Tuesday, 28 November 2017

पहिल्या शाळेचे महाकठीण ऐतिहासिक कार्य

(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-८)
=====================
मुलींसाठी शाळा काढणे हे त्यावेळी अत्यंत कठीण किवां अशक्यप्राय कार्य होते. स्त्रियांच्या शिक्षणाविषयी समाजात अनेक गैरसमज व अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या काळी मुलींसाठी शाळा काढणे हे अत्यंत कठीण काम होते. परंतु जोतीराव व सावित्रींमाईनी ते काम मोठ्या कौशल्याने व धैर्याने तडीस नेले होते.
स्त्रियांची गणना शुद्रांमध्ये करण्यात येत असे. शूद्रांना शिक्षण घेण्यास धर्माशास्त्राने मनाई केली होती. त्यामुळे स्त्रियांना, मुलींना शिक्षण देणे म्हणजे घोर अधर्म करणे होय असे तेथील धर्ममार्तडांचे ठाम मत होते. तसेच मुली शिकल्या तर त्या लवकर विधवा होतात, त्यांनी शिजवलेल्या अन्नात किडे पडतात, देव दैवतांचा भारी कोप होतो असे गैरसमजही समाजात पसरवले गेले होते. त्यामुळे लोक भिऊन मुलींना शाळेत पाठविण्याचे धाडस करीत नव्हते. 
.
जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी आपली पहिली शाळा सुरु केली होती त्या शाळेसाठी जोतीरावांचे मित्र तात्या साहेब भिडे यांनी आपल्या वाड्यात जागा देऊ केली होती. ही जागा त्यांनी बिनभाड्याने देऊ केली होती. शिवाय १०१ रुपये देणगी देऊन दरमहा ५ रुपये देण्याची इच्छाही प्रगट केली होती. तसेच सदाशिवराव गोवंडे, केशवराव मवाळकर, जगन्नाथ सदाशिवरावजी, अण्णा सहस्त्रबुद्धे, बापुरावजी मांडे, विष्णू मोरेश्वर भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर , विष्णुशास्त्री पंडित, विष्णुपंत थत्ते या सहकार्यांनी ही शैक्षणिक कामात जोतीरावांना मोलाची मदत केली होती. भारतीय व्यक्तींनी भारतात मुलींसाठी काढलेली ही पहिली शाळा होती. 
.
त्या काळात मुलींना शिकवण्याचा विरोधात प्रचंड दहशत होती. १८३० साली मिसेस विल्सन यांनी शनिवारवाड्यात गुप्तपणे मुलींची शाळा चालविण्याचा प्रयत्न केला होता. १८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलैंड मिशनने मंगळावर पेठेत मुलींची शाळा काढण्याचा प्रयात्न केला होता. पण तेथील धर्ममार्तंडांच्या धाकामुळे आणि समाजातील अज्ञान व अंधाश्राद्धांमुळे त्या शाळा लवकरच बंद कराव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जोतीराव फुले यांनी सनातन्यांचा गड असलेल्या पुण्यात मुलींसाठी शाळा काढणे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाचीच आयाळ धरण्यासारखे धाडस करणे होते.
.
पहिली शाळा काढून जोतीराव व सावित्रीबाई स्वस्थ बसले नाहीत. तर ३ जुलै १८५१ रोजी त्यांनी मुलींसाठी दुसरी शाळासुद्धा काढली. एका वर्षात पाच शाळा त्यांनी काढल्या. त्यामुळे सनातनी लोक चांगलेच बिथरले. त्यांनी जोतीरावांच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या विष्णुपंत थत्ते यांना धमक्या देऊन, दहशत पसरवून अध्यापकाची नोकरी सोडायला भाग पाडले. सावित्रीबाई भिडेवाड्यातील पहिल्या शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागल्या होत्या. जाता-येता त्यांच्यावर दुष्ट प्रवृत्तीचे सनातनी लोक दगड मारणे, पान खाऊन अंगावर थुंकणे, शेण फेकणे, असले बीभत्स प्रकार करीत होते. शिवीगाळ करणे, शिव्याशाप करणे, टिंगल-तवली करणे असेही प्रकार होऊ लागले. तरीही न घाबरता, न डगमगता सावित्रीबाई शिकवायला शाळेत जात असत. त्या शाळेत जातांना एका पिशवीत चांगले कपडे घेऊन जात असत. त्या शाळेत गेल्यावर अंघोळ करून चांगले कपडे घालीन व शेणा-मातीने भरलेले खराब कपडे धुवून वळायला ठेवत. मग शिकवायला सुरुवात करीत.
.
एकदा मात्र अतीच घडले. सावित्रीबाई शाळेत जात असतांना सनातनी प्रवृत्तीच्या उपद्रवी टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवले. त्यापैकी एक धटिंगण पुढे आला. त्याने सावित्रीबाईना धमकावून शिकवण्याचे काम बंद करावयास सांगितले. अन्यथा भर रस्त्यात अब्रूचे धिंडवडे उडविण्याची धमकीही दिली. सावित्रीबाईनी त्याला सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. तो धटिंगण पुढे-पुढेच येत आहे असे पाहून सावित्रीबाईनी पावित्रा घेतला. तो पुरेसा जवळ येताच त्याच्या थोबाडीत सणसणीत ठेवून दिली. त्या अनपेक्षित प्रतिसादाने तो बदमाश घाबरून पळून गेला. त्याचा साथीदारांनीही पोबारा केला. रस्त्यातले इतर बघे लोक तोंडात बोटे घालून बघतच राहिले. 
.
या प्रसंगामुळे सावित्रीबाईचा पुण्यामध्ये दरारा निर्माण झाला. हा प्रसंग समजल्यावर जोतीरावांना वाईट वाटले. त्यांनी सावित्रीबाईना धीर दिला. शिवाय तेव्हापासून त्यांना शाळेत पोचवायला व घरी परतायला सुरक्षेसाठी शिपायाची नेमणूक करण्यात आली. (क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.