Tuesday, 28 November 2017

सावित्रीमाईंचे शिक्षण

(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-७)
==========================
सावित्रीबाईंना शिक्षणाची ओढ लहानपणापासूनच होती. लग्न होउन सासरी आल्यावर जोतीराव, सगुणाबाई इत्यादींच्या मुळे त्यांनी शिक्षणात भरारी घेतली. तसेच जन्मभर त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य सतत सुरूच ठेवले होते.
लहानपणी एका कार्यक्रमात एका मिशनरी व्यक्तीने सावित्रीबाईंना एक सचित्र पुस्तक भेट दिले होते. शिकल्यावर कधीतरी वाचता येईल या विश्वासाने त्यांनी ते जपून ठेवले होते. लग्नानंतर त्यांनी ते सासरी सुद्धा आणले होते. यावरून असे दिसते की त्यांना शिक्षणाची ओढ लहानपणापासूनच होती. परंतु त्यांचा गावी शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले नव्हते.
.
लग्न होउन सासरी आल्यावर जोतीरावांचे पुस्तके वाचणे, त्यावर व सामाजिक समस्यांवर विचार विनिमय करणे यामुळे त्यांचे वेगळ्या धाटणीचे शिक्षण होऊ लागले होते. सगुणाबाईंच्या इंग्रजी बोलण्यामुळे व त्यांच्याशी चर्चेमुळे सुद्धा सावित्रीबाईंचे आगळे-वेगळे शिक्षण होत होते.
.
जोतीराव व सावित्रीबाई दोघेही शेतात कामाला जात. दुपारच्या वेळी जेवण झाल्यावर त्यांना काही वेळ उसंत मिळे. त्या वेळेत शेतातील आंब्याच्या झाडाखाली जमिनीवर काडीने रेघोट्या मारून जोतीराव सावित्रीबाईना व सगुणाबाईंना लिहायला-वाचायला शिकवीत असत. त्यातून अक्षरओळख, आकडेमोड, वाचन-लेखन इत्यादी कौशल्ये त्या दोघींनी आत्मसात केली. त्यानंतर सावित्रीबाई घरी असलेली पुस्तके वाचू लागल्या. 
.
औपचारिक शिक्षणासाठी सगुणाबाई व सावित्रीबाई यांना जोतीरावांनी पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये पाठवले. तेथील शाळा-प्रमुख यांनी त्यांची परीक्षा घेऊन त्यांना सरळ तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला.
.
तेथील शिक्षण आटोपल्यावर या दोघींनाही अहमदनगरला मिसेस फेरोर बाईंच्या शाळेत अध्यापक प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यांच्यासोबत जोतीरावांचे बालमित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही ते प्रशिक्षण पूर्ण केले. जोतीरावांचे सहकारी केशवराव भवाळकर यांची पुण्यात सरकारी शाळेत नेमणूक झाली होती. त्यांच्याकडूनही सावित्रीबाईनी अध्यापनाच्या संदर्भात नवनवीन गोष्टी शिकून घेतल्या. 
.
याप्रकारे आदर्श शिक्षिका बनण्यासाठी सावित्रीबाईनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारे मिळेल तसे शिक्षण पूर्ण केले. यानंतरही त्यांनी जन्मभर वेगवेगळी पुस्तके वाचून, भाषणे ऐकून, चर्चा करून आपले शिक्षणाचे कार्य सतत सुरूच ठेवले होते. (क्रमशः) #adinama
-धनंजय आदित्य.