Wednesday, 1 November 2017

सयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले?

महात्मा जोतीबा फुले यांचे मित्र व उपचारकर्ते डॉ. विश्राम रामजी घोले यांची मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचा म्हणून जो फोटो मिडीयावर फिरतो आहे तो वास्तविक रित्या बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड (३ रे) यांची मुलगी इंदिरा देवी यांचा फोटो आहे. तसेच पुण्यातील बाहुलीचा हौद म्हणून जो फोटो त्यासोबत जोडला जात आहे तो वास्तविकत: नागपूर येथील बाहुली या प्रकारच्या विहिरीचा फोटो आहे. अशा विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असत.

इंदिरा देवी यांची कहाणी सुद्धा विशेष अशी आहे. त्यांच्याविषयी माहिती अशी-
त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १८९२ रोजी बडोदे येथे झाला होता. ती सयाजीराव गायकवाड आणि महाराणी चिमणादेवी यांची एकुलती मुलगी होती. तिला भाऊ मात्र अनेक होते. तिचे लग्न ग्वालियरचे राजे माधव राव शिंदे यांच्या बरोबर करण्याचे ठरले होते. त्या दरम्यान ती १९११ साली ७ ते १६ डिसेंबर दरम्यान भरवण्यात आलेल्या “दिल्ली दरबार” मध्ये गेली. (आपले भारतावरील स्वामित्व सिद्ध करण्यासाठी इंग्रजांतर्फे हा कार्यक्रम/मेळावा घेण्यात येत असे.) त्या मेळाव्यात तिचे प्रेम पश्चिम बंगाल येथील कूच बिहारचे युवराज जितेंद्र नारायण यांच्यावर जडले व त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. या वेळी इंदिराचे वय १८ वर्षांचे होते. आपल्या या निर्णयामुळे वादंग माजेल, वडिलांना धक्का बसेल असे तिला वाटले. त्याचे एक कारण म्हणजे जितेंद्र नारायण हे ज्येष्ठ अपत्य नव्हते व त्यांना वडिलांच्या पश्चात राजेपद न मिळण्याची शक्यता जास्त होती. आपल्या निर्णयाविषयी वडिलांना सांगण्याऐवजी तिने ग्वालियरच्या महाराजांना पत्र लिहून आपण त्यांच्याबरोबर लग्न करू शकत नाही असे कळवले. महाराजांनी इंदिराच्या वडिलांना सयाजीरावांना लगेच तर केली व नंतर पत्र समजुतदारपणे पत्र लिहिले व त्याखाली “तुमचा पुत्र” असे लिहून सही केली. 

तथापि सयाजीराव यांना जितेंद्र नारायण हे जावई म्हणून आवडले नव्हते. तो बेफिकीर युवक आहे अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी जितेंद्रला इंदिरा सोबत लग्न करण्यापासून परावृत्त होण्यास बजावले. परंतु दोघेही लग्न करण्यावर अडून बसले होते. त्यामुळे सयाजीराव यांनी आपण लग्न लावून देणार नाही त्यांनी इंग्लंडला जावे व तेथे लग्न लावून घ्यावे असा मधला मार्ग सुचविला. त्यानुसार त्यांनी लंडन येथील एका हॉटेलमध्ये ब्राह्मो समाजाच्या रिवाजाप्रमाणे लग्न लावून घेतले. त्या लग्नास इंदिराच्या कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित नव्हते.

लग्नाच्या वेळी जितेंद्र नारायण यांचा मोठा भाऊ राजेंद्र नारायण अति मद्यपानामुळे अतिशय आजारी पडला व त्याचा काही दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे जितेंद्र नारायण हे कूच बिहारचे राजे बनले. त्यांना पाच मुले पण झालीत. तथापि लग्नानंतर सुमारे १० वर्षांनी म्हणजे १९२२ साली जितेंद्र नारायण यांचाही अति मद्यपानाने मृत्यू झाला. 

त्यानंतर तिच्यावर राज्याच्या प्रशासक पदाची (महाराणी पदाची) जबाबदारी येऊन पडली. मोठा मुलगा जगदीपेंद्र याच्या नावाने ती राज्य करू लागली. थोड्याच काळात तिने चांगली प्रशासक म्हणून नाव-लौकिक मिळवला. १९३६ मध्ये जगदीपेंद्र राजा झाला व त्यानंतर इंदिराने आपले बरेचसे आयुष्य युरोपात घालवले. (प्रसिद्ध अभिनेत्री मून मून सेन या इंदिरा यांच्या इला नावाच्या मुलीची सून होय.) आयुष्याचे अखेरचे दिवस त्या मुंबईत होत्या. तेथेच ६ सप्टेंबर १९६८ रोजी निधन झाले. #adinama

-धनंजय आदित्य.
(टीप- डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या मुलीची कहाणी सुद्धा खरी असून त्या करुण घटनेविषयी लवकरच लिहीत आहे. येथे सांगायचे हे की प्रस्तुत फोटो खरे नाहीत.)