Wednesday, 1 November 2017

स्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची करुण कहाणी...

मुलींच्या शिक्षणास कडवा विरोध असूनही शिकतच असलेल्या डॉ. विश्राम घोले यांच्या ९ वर्षांच्या मुलीला काही नतद्रष्टांनी लाडूतून कुटलेल्या काचा वगैरे खाऊ घातल्या. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. समाज-परिवर्तनाच्या कार्यात बळी गेलेल्या एका अजाण बालिकेची करुण आणि अंगावर शहारे आणणारी ही कहाणी...
डॉ. विश्राम रामजी घोले (१८३३ ते १९००) हे यादव गवळी समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित शल्यविशारद आणि समाजसुधारक होते. ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्षसुद्धा होते. १८५७ च्या युद्धात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देण्याचे उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांनी मागास जातीतील लोक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरसुद्धा विशेष कार्य केले होते. त्यांच्या मोठेपणामुळे पुण्यातील मॉडर्न हायस्कूलजवळच्या रस्त्याला घोले रोड असे नाव देण्यात आले आहे. ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. ते महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या चळवळीचे कार्यकर्ते होते. ते क्रांतिकारी फुले दांपत्याच्या स्त्री-शिक्षणाच्या विचारांनी भारून गेले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलींना पण चांगले शिकवायचे असे त्यांनी ठरविले.
त्यानुसार त्यांनी त्यांची मोठी मुलगी काशीबाई हिला इंग्रजी शिक्षण देणे सुरु केले. तिला घरात लाडाने बाहुली म्हणण्यात येत असे. सुंदर व चुणचुणीत अशी ही बाहुली अतिशय हुशार होती व शिक्षणात तिची चांगलीच प्रगती दिसून येत होती. मुलींना शिकवण्यास त्याकाळी लोकांचा, समाजाचा अत्यंत विरोध होता. मुलींना शिकवल्यामुळे त्या बिघडतील, धर्म भ्रष्ट होईल इत्यादी अनेक गैरसमजुती पसरल्या होत्या. डॉ. घोले यांना मुलीच्या शिक्षणाविषयी कितीही आस्था असली तरी कुटुंबातील व्यक्तींना ते पसंत नव्हते. डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्नै अनेकदा जातीतील मान्यवरांनी केला. मुलीचे शिक्षण थांबवावे यासाठी त्यांच्या लोकांनी, नातेवाईकांनी भरपूर त्रास देणे सुरू केले. विविध प्रकारे छळ केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही विरोधांना भीक घातली नाही.
अखेरीस त्यांच्या काही नतद्रष्ट नातेवाईकांनी क्रूर निर्णय घेतला. त्यांनी लाडूमध्ये काहीबाही मिसळून बाहुलीला खायला घातले. काहींच्या मते त्यात काचा कुटून तिला लाडूतून खाऊ घातल्या. त्यामुळे त्या कोवळ्या बालिकेला शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. साऱ्या जगाला जीवदान देणारे डॉ. घोले स्वतःच्या मुलीच्या बाबतीत हतबल ठरले. शेवटी त्या रक्तस्त्रावाने त्या ९ वर्षांच्या बालिकेचा १८७७ साली मृत्यू झाला.
मात्र या घटनेनंतरही ते खचले नाहीत तसेच त्यांनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही त्या वेळच्या रूढीप्रमाणे अगदी बालपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी केले. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी भारतीय धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते. त्यांनी येथील धर्मातील अंधश्रद्धांवरही कठोर टीकाही केली.
बाहुलीच्या अकाली व अनैसर्गिक मृत्यूमुळे डॉ. विश्राम घोले यांच्या मनावर खोल जखम झाली. त्यांनी तिच्या स्मरणार्थ १८८० साली पुण्यात शुक्रवार पेठेतील कोतवाल चावडी भागात एक हौद बांधला. त्या काळी पुणे शहराला कात्रज तलावातून पाणीपुरवठा होत असे. ते पाणी या हौदात येत असे. तेथून सर्व जाति-धर्माच्या लोकांनी ते घ्यावे व त्यानिमित्ताने बाहुलीची आठवण जागृत राहावी या उद्देशाने तो हौद बांधण्यात आला होता. हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे. त्या हौदास बाहुलीचा हौद असे म्हणण्यात येते. सुरुवातीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असे नाव होते. त्या हौदावर बाहुलीचे एक शिल्प (मूर्ती) उभारण्यात आले होते. कालांतराने ती मूर्ती तेथून नाहीशी झाली. त्या काळात पुण्यात जातीभेद प्रचंड प्रमाणात होता. तथापि, त्या हौदाचे उद्घाटन मातंग समाजातील एक सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी करण्यात आले. हा हौद सुरुवातीपासून सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुला ठेवला. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. 
समाज परिवर्तनाच्या लढ्यात अशा अनेकांना आपले प्राणही द्यावे लागले आहेत. त्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन. #adinama
-धनंजय आदित्य 
(टीप- या विषयी एक पोस्ट उल्का मो*** या महिलेच्या नावे काही ठिकाणी फिरविली जात आहे. त्यात बाहुलीचा म्हणून जो फोटो देण्यात आला आहे तो बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांची मुलगी इंदिरा देवी यांचा आहे, तर बाहुलीचा हौद म्हणून जो फोटो देण्यात येत आहे तो नागपूर येथील भोसलेकालीन बाहुली प्रकारच्या विहिरीचा आहे.त्याविषयी फोटोसहित अधिक स्पष्टीकरण माझ्या पेजवरील दुसऱ्या पोस्ट मध्ये दिलेले आहे.)
संदर्भ- 
एकोणिसाव्या शतकातील समन्वयवादी, लेखक- पराग पाटील, लोकसत्ता रविवार १२ ऑक्टोबर २००३
सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, लेखिका- अरुणा ढेरे, राजहंस प्रकाशन २००२ (दुय्यम)
मराठी विकीपेडिया, विश्राम घोले, ५ मे २०१७ ची आवृत्ती. 
मराठी विकीपेडिया, बाहुलीचा हौद, ५ मे २०१७ ची आवृत्ती, नंतर ही गोष्ट त्यातून काढून टाकण्यात आली.
काही नोंदी...