Sunday, 5 November 2017

मोठ्या समस्या, साधे उपाय


एका दर्जेदार साबणाच्या कंपनीत नवीच समस्या निर्माण झाली. साबणाच्या दुकानदारांकडून गंभीर तक्रार आली. साबणाच्या मोठ्या खोक्यात पॅक केलेल्या साबणाचे काही डबे रिकामे असलेले आढळून येऊ लागले. कंपनी ग्राहकांशी चिटिंग करते, 144 साबणाच्या खोक्यात एक दोन छोट्या डब्यात साबणच ठेवत नाही, असे आरोप झाले. वास्तविकत: सर्व साबण आटोमॅटिक पद्धतीने पॅक केले जात. कोणी व्यक्ती मुद्दामहून बदमाशी करण्याची शक्यता नव्हती.

सर्व शक्यता पडताळून पाहिल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले की, दोष मशीनचा आहे. काही कागदी डब्यांत साबण भरायचे राहून जाते. कंपनीने बऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेतला. आकाश पातळ एक केले पण समस्या काही जात नव्हती. शेवटी पॅकिंग साठी दुसरी मशिनरी बसवण्याचे कंपनीने ठरवले.

तेव्हा तेथील एका सफाई कामगाराने मॅनेजरला विचारले,"साहेब, जरा मी सांगतो तसं करून बघता काय?"

साहेबांनी कपाळावर आठ्या आणून विचार केला,"जगप्रसिद्ध तज्ज्ञांनी जिथे हात टेकले तिथे हा अनपढ काय करणार? पण मशिनरी बदलायची आहेच, तेव्हा बघू या हा काय तीर मारतो ते!" आणि त्यांनी त्याला प्रयोग करायला संमती दिली.

त्याने एक मोठा उभट पंखा आणला. ज्या मार्गिके मधून साबणाचे डबे भरून पुढे जायचे त्याच्या बाजूला ठेवला. ... आणि काय आश्चर्य ... रिकामे कागदी डबे वाऱ्याने उडून जाऊ लागले व फक्त साबणाने भरलेले डबेच पुढे जाऊ लागले. समस्या सुटली होती. सारे जण अवाक होऊन पाहात होते!

अशाच प्रकारची दुसरी एक गोष्ट वाचण्यात अली होती.

एका जगप्रसिद्ध कारच्या कंपनीने एका बलाढ्य ग्राहकांसाठी खास स्पेशल अशी गाडी बनवण्याची ऑर्डर घेतली. कर्मचाऱ्यांनी जीव ओतून झकास अशी एकमेवाद्वितीय कार बनवली. पण कार वर्कशॉप मधून बाहेर काढताना एक अडचण निर्माण झाली- कारच्या उंचीपेक्षा दरवाज्याची उंची थोडीशी कमी होती. हा मुद्दा आधी लक्षात आलाच नव्हता. आता करायचे तरी काय?

कोणी म्हणालं- कार बाहेर काढा, टपाला थोडं खरचटेल, त्याला पुन्हा रंग रंगोटी करू. कोणी सांगितलं- दरवाजा वरून थोडा तोडून टाकू, गाडी बाहेर नेल्यावर पुन्हा नीट करू. ... पण मालकाला हे उपाय काही केल्या पसंत पडत नव्हते. सारी घालमेल बघून तेथील रखवालदार म्हणाला,"साहेब, जरा मी सांगतो तसं करून बघता काय?"

मालकाने विचार केला,"इतक्या उच्च शिक्षित तंत्रज्ञां कडून, लोकांकडून काही होत नाहीय, तेथे हा अनपढ काय करणार?"

पण ऐकू या काय म्हणतोय ते, असा विचार करून मालकाने ऐकण्याची तयारी दाखवली. रखवालदार म्हणाला,"साहेब, चाकांतली हवा थोडी थोडी कमी करून बघता काय? गाडीची उंची पण कमी होईल आणि गाडी बाहेर घेतल्यावर पुन्हा हवा भरता पण येईल." उपाय हमखास यशस्वी झाला सर्व जण आश्चर्य चकित झाले.

या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या ते माहित नाही; पण त्यातील मर्म त्यातील बोध खरोखरच विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी निष्णात, तज्ञ, एक्स्पर्ट व्यक्तीचीच गरज असते असे नाही. काही समस्या साध्यासुध्या म्हणा किंवा लेमॅन म्हणा अशा लोकांकडूनही सोडवल्या जाऊ शकतात. आपण अशी उत्तरे शोधण्याचा विचारच सोडून देतो आणि मोठमोठ्या व्यक्ती, मोठमोठ्या शक्यता यांनी प्रसंगांना काळवंडून टाकतो. साधे उपायही मोठ्या समस्या सोडवू शकतात. प्रसंगी साध्यासुध्या वाटणाऱ्या लोकांकडूनही आश्चर्यकारक उत्तरे, उपाय मिळू शकतात.

म्हणून असुरांचे गुरू शुक्राचार्य त्यांच्या शुक्रनितीमध्ये म्हणतात- अयोग्यो पुरुषो नास्ति। योजकः तत्र दुर्लभ:।। कोणामध्ये कोणती बुद्धिमत्ता असेल हे सांगता येत नाही. प्रत्येकाला आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा वापर करण्याची संधी तर मिळायला हवी. भारतातील जाती-वर्ण यावर आधारित व्यवस्थेने अशी संधी येथील बहुजनांकडून हिरावून घेतली. त्यामुळे त्या वंचित बहुजनांचे वाटोळे तर झालेच शिवाय या देशाचाही सत्यानाश झाला. वरच्या स्तरातील मूठभर लोकांची पाचही बोटे तुपात घमसून घमसून बुडालेली राहिली.

त्याप्रमाणेच एकदम मोठ्या शक्यतांचा, संकटांचा विचार करून स्वतः ला काळवंडून घेण्यातही अर्थ नाही. याचा अर्थ दूरदृष्टी नको असा नव्हे. खरे डॉक्टर छोट्या छोट्या शक्यता आधी पडताळून पाहतात. कारण बऱ्याच समस्या छोट्या गुंत्यांनी तयार झाल्या असतात. त्या अपेक्षा खोट्या ठरल्या तर मोठ्या शक्यतांकडे लक्ष दिले जाते.

विशिष्ट प्रसंगी दुसरा कोणताही माणूस आपल्यापेक्षा सरस ठरू शकतो. म्हणून कोणालाही कमी लेखण्यात अर्थ नाही. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रसंगी आपण इतरांपेक्षा सरस ठरू शकतो. त्यामुळे स्वतःला सुद्धा इतरांपेक्षा कमी समजण्यात अर्थ नाही. स्वाभिमान असलाच पाहिजे, त्याबरोबर दुसऱ्यांचा आदरही ठेवला पाहिजे. #adinama

-धनंजय आदित्य