Thursday, 23 November 2017

मैत्रीभावानेचा उदात्त संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्णिमा


सर्व पौर्णिमांप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांची राजा बिम्बिसार यांच्याशी झालेली सुप्रसिद्ध भेट धम्म प्रसाराच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरली. या दिवशी मदांध झालेल्या नालागिरी हत्तीची शरणागती म्हणजे गौतम बुद्ध यांच्या मैत्रीमय व करुणामय व्यक्तित्वाची साक्ष होय. या दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेतील अनुराधापुरम येथे बोधीवृक्षाची लागवड केली. या दिवसाचे सविस्तर महत्त्व पुढीलप्रमाणे...

इसवी सन पूर्व ५४४ ते ४१९ या कालावधीत होऊन गेलेला मगध देशाचा राजा बिम्बिसार हा बौद्ध धम्माचा पहिला आश्रयदाता होता. त्यांच्या महान आश्रयाने बौद्ध धम्माचा मोठा विकास होऊ शकला. गौतम बुद्धाचे वडील राजा शुद्धोदन यांच्याशी राजा बिम्बिसार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गौतम बुद्ध यांच्यापेक्षा ते ५ वर्षांनी मोठे होते. कोलिय आणि शाक्य यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून युद्ध होऊ नये यासाठी सिद्धार्थ यांनी गृहत्याग व राज्यत्याग करून परीव्रज्या स्वीकारली होती. त्या त्यागाची माहिती राजा बिम्बिसार यांना होती. सिद्धार्थ यांना ज्ञानप्राप्ती होण्याआधी ते विरक्त अशा अवस्थेत राजा बिम्बिसार यांची राजधानी राजगृहाजवळील एका टेकडीवर निवासाला होते. तेव्हा राजा बिम्बिसार यांनी सिद्धार्थची भेट घेऊन त्यांना आपले अर्धे राज्य देऊ केले. परंतु आता त्यांचे ध्येय हे संपूर्ण मानवजातीच्या दुःखावर उपाय शोधणे हे असल्याने सिद्धार्थ यांनी बिम्बिसाराचे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. या पहिल्या भेटीचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा हा होता. 

ज्ञानप्राप्ती झाल्यावर गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांसह राजगृह येथे आल्यावर राजा बिम्बिसार आपल्या प्रजेसह त्यांच्या स्वागतासाठी नगरच्या प्रवेशद्वारी गेले होते. त्यांनी बुद्धाचे शिष्यत्व पत्करले व बुद्धाच्या मार्गदर्शनाखाली अर्हत प्रप्तीतील सोतापन्न हे पद प्राप्त केले. कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी बुद्ध व त्यांचे शिष्य यांन वसतीसाठी करन-वेणू-वन नावाचे बांबूचे वन दिले होते. त्यानंतर राजा बिम्बिसार यांनी बुद्धाच्या विचारांच्या प्रसारासाठी आयुष्यभर योगदान दिले.

मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व जयमंगल अठ्ठ गाथेतील तिसऱ्या गाथेत दिसून येते, ते असे...

नालागिरी गजवरं अतिमत्तभुतं|| दावाग्गि चक्कमसनीव सुदारूणन्तं।|
मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो|| तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥

अर्थ:- ज्या मुनीन्द्राने, दावाग्निचक्र आणि वीजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत्त अशा नालागिरी हत्तीला आपल्या मैत्रीरूपी पावसाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.

मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेल्या या प्रसंगामागील घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.

देवदत्त हा शिद्धार्थाचा आतेभाऊ. त्याने भिक्कू संघात प्रवेश मिळवला होता. देवादात्ताने भिक्कुंसाठी स्वतःचे वेगळेच नियम बनवले होते व ते लागू करावेत यासाठी तो आग्रही होता. त्याला संघाचे प्रमुख पद हवे होते. परंतु त्याची ती योग्यता नसल्याने बुद्धाने ते पद महामोग्गलायन आणि सारीपुत्त यांच्याकडे दिले. त्यामुळे तो द्वेष, मत्सर व क्रोध यांनी वेडा झाला आणि त्याने गौतम बुद्ध यांचा खून करायचा निर्धार केला. 

गौतम बुद्ध गृधकुट पर्वताच्या पायथ्याजवळून जात असताना पर्वताच्या उंच भागावरून त्याने काही लोकांच्या मदतीने मोठा दगड बुद्धाच्या अंगावर खाली लोटला. परंतु तो दगड मध्यंतरी लटकला आणि त्याचा लहानसा तुकडा गौतम बुद्धांच्या पायाला लागला व तेथे लहानशी जखम झाली. अशा प्रकारे पहिला प्रयत्न फसला. नंतर त्याने राजा अजातशत्रू याच्याशी संधान बांधून गौतम बुद्धाची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठवले. पण पहिला मारेकरी बुद्धाची करूणा, मैत्रीभावना आणि तेज पाहून हिम्मत हरला. बुद्धाला मारण्याऐवजी तो त्यांचा शिष्य बनला. याप्रकारे देवदत्त याचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला.

त्यानंतर देवदत्ताने अजातशत्रूच्या हत्तीशाळेतील एका माहुताला फितवले. तो प्रारंभी तयार न झाल्याने त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. शेवटी दबावामुळे नाईलाजाने तो हत्येच्या कटास कबूल झाला. त्यांनी तेथील मदमस्त, धिप्पाड व क्रूर अशा नालागिरी नावाच्या हत्तीला भरपूर दारू पाजली. सकाळी गौतम बुद्ध नगरात चारिका करीत असताना त्या हत्तीला त्यांच्यावर सोडून देण्यात आले. त्याला पाहून रस्त्यावरचे लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. गौतम बुद्ध मात्र तेथे शांतपणे उभे राहिले. उदात्त व अथांग करूणा आणि मैत्रीभावना यांच्या साह्याने ते निर्भय व शांत होते. बुद्धांनी त्याला मायेने व प्रेमाने “नालागिरी” म्हणून हाक मारली. तुफान वेगाने येणारा तो नालागिरी हत्ती बुद्धांच्या त्या प्रभावाने व भूमिकेने वरमला. तो शांत तर झालाच शिवाय त्याने पुढचे गुढगे टेकले आणि बुद्धांना अभिवादन केले, बुद्ध त्याला आपुलकीने गोंजारू लागले. याप्रकारे बुद्धाची हत्या करण्याचा देवादात्ताचा तिसरा भयंकर उपाय सुद्धा कुचकामी ठरला. तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा. करूणा, मैत्रीभावना, प्रेम, आपुलकी आणि निर्भयता यांचा उत्कट अविष्कार त्या दिवशी झाला होता. तथागत गौतम बुद्ध यांचा तो महान विजय होता. 

त्यानंतर देवदत्ताने सुमारे ५०० भिक्कू घेऊन स्वतःचा वेगळा संघ निर्माण केला. परंतु त्याच्याकडील भिक्कू वस्तुस्थिती ज्ञात झाल्यावर पुन्हा बुद्धाकडे येऊन मिळाले. कालांतराने देवदत्तला सुद्धा स्वतःच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. म्हणून बुद्धाची माफी मागण्यासाठी तो बुद्धाकडे येत असताना वाटेतच त्याचा करुण मृत्यू झाला. विनयपिटिकाच्या ७ व्या चुलवग्ग भागात ही माहिती आली आहे.

इसवी सन पूर्व २४९ च्या मार्गशीर्ष पौर्णिमेला सम्राट अशोक यांची मोठी मुलगी संघमित्रा यांचे श्रीलंकेत आगमन झाले. त्यांनी गया येथून बोधीवृक्षाची एक शाखा सोबत नेली होती. तेथील अनुराधापुरम येथील महामेघवनम येथे त्याचे राजा तिस्स यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. त्यामुळे हा दिवस “संघमित्रा दिन” म्हणूनही साजरा करण्यात येतो. तो बोधिवृक्ष अजूनही तेथे उभा असून मानवाने लावलेल्या ज्ञात असलेल्या पैकी तो सर्वात जुना असा वृक्ष आहे. संघमित्रा यांनी श्रीलंकेत भिक्कुनी संघाची स्थापना व धाम्माप्रसाराचे मोठे काम केले होते. तसेच या दिवशी श्रीलंकेत उंदूवाप पोया हा सणही साजरा करण्यात येतो.

याप्रकारे करूणा व मैत्रीभावना यांचा संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी भारतभर उपासिकांच्या घरी व विहार आदि मध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात. लोक जवळच्या प्राचीन लेण्यांमध्ये, प्राचीन बौद्ध स्माराकांमध्ये जातात व तेथेही कार्यक्रम घेतात. वरील प्रसंगांच्या स्मरणासाठी आणि त्यांचा संदेश आपल्या जीवनात बिंबविण्यासाठी तसेच मानवतेवर आधारित संस्कृती निर्माण करण्यासाठी या मार्गशीर्ष पौर्णिमेसह सर्व पौर्णिमा साजऱ्या करणे आवश्यक आहे. #adinama
-धनंजय आदित्य